औरंगाबाद- आदिशक्ती, आदिमाया अंबाबाईच्या अनेक रूपांची पूजा केली जाते. देवी उपासकांसाठी नवरात्रोत्सव म्हणजे आराधना करण्यासाठी महत्त्वाचे दिवस असतात. यानिमित्त शहरातील सर्वच मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. शहरातील कर्णपुरा, हर्सूल, संग्रामनगर, एन-९ येथील देवी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते.
त्यासाठी मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या असून घटस्थापनेची तयारी पूर्ण झाली आहे.
नवरात्रोत्सवानिमित्त कर्णपुऱ्यातील तुळजाभवानी मंदिर, हर्सूल येथील हरसिद्धीमाता मंदिर, सिडको एन - ९ येथील रेणुकामाता मंदिर, कोकणवाडीजवळील कोर्टाची देवी, बीड बायपास संग्रामनगर येथील रेणुकामाता मंदिर, जयभवानीनगर येथील भवानीमाता मंदिर, विष्णुनगर येथील दुर्गामाता मंदिर आदी सर्वच मंदिरांत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात काकडा आरती, महानैवेद्य, भजन, कीर्तन, गोंधळ, नवचंडी आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कर्णपुरा यात्रेसाठी रहाटपाळणे सज्ज
शहराचे आराध्य दैवत म्हणून ओळख असलेल्या कर्णपुरा येथील हरसिद्धी देवीच्या यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. या परिसरात रहाटपाळणे, डिंग डाँग झुला, मिनी रेल्वे या खेळांसह विविध खेळांचे स्टॉल, पूजेच्या साहित्यासोबत विविध उपयोगी वस्तूंची दुकाने सजली आहेत. औरंगाबाद, फुलंब्री, गंगापूर, पैठण यासह इतर जिल्ह्यांतूनही भाविक येथील यात्रेत दर्शनासाठी येतात. त्यासाठी मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरक्षिततेच्या दृष्टीने पूर्ण तयारी करण्यात आली आहे.
प्रतिमाहूर झाले सज्ज
प्रतिमाहूर अशी ओळख असलेल्या सिडको एन-९ येथील रेणुकामाता मंदिरात विविध सांस्कृतिक कार्यकमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरात देवीचा तांदळा या सोनई येथील अण्णा महाराजांनी तयार करून प्राणप्रतिष्ठा केली आहे. या मंदिराला ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. या वर्षी विश्वस्त मंडळाच्या वतीने मुख्य गाभारा १७५ किलो चांदीच्या कलाकुसरीने सुशोभित करण्यात येत आहे. आतापर्यंत ११५ किलो चांदीची कलाकुसर करण्यात आली आहे. उत्सवात सकाळी ६ ते ७.३० महापूजा, दुपारी १२ वाजता आरती व महानैवेद्य, दुपारी ३ ते ५ भजन, सायंकाळी स्तोत्रपठण, ७.३० वाजता महाआरती तसेच साई दरबार, भरतनाट्यम, गोंधळ असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सतीश वैद्य यांनी दिली.