आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजमहालची प्रतिकृती उभारणारे हात वर्तमानात गरीब-अनाथांचे भविष्य घडवित आहे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - प्रेमाने प्रेम वाढते, चांगुलपणाने चांगुलपण.दिल्याने देणारे हात वाढतात, तर परोपकाराने परोपकार..पण प्रेम घेऊन पहिला हात पुढे यावा लागतो. साधारण तीन दशकांपूर्वी अशाच चांगुलपणाला परोपकाराची जोड मिळाली आणि हजारावर गरीब,अनाथांना आधार मिळाला. आज हेच लोक सक्षम झालेत आणि त्यांनीही इतरांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे, हे विशेष. कबीर मठाने ही सुरुवात केली..‘और कारवाँ बनता गया..’

नवाबपुर्‍यातील संत कबीर मठाला 350 वर्षांचा इतिहास आहे. तीन दशकांपूर्वीपासून गरीब, अनाथ आणि होतकरू मुलांना हा मठ मायेचा आधार देत असून त्यांना मोफत निवास, शाळा-कॉलेजची फीस, शैक्षणिक साहित्य आदींची व्यवस्था करायला सुरुवात केली. या उबदार मुशीतून तयार झालेल्या विद्यार्थ्यांनी उन्नतीची नवनवी दालने पादाक्रांत केली आहेत. आता हेच लोक मठाच्या समाजकार्यात सहभागी झाले आहेत. वर्तमानात लोकांचे आयुष्य घडवणार्‍या लोकांनी इतिहासात ताजमहाल बनवण्यात हातभार लावला होता.

मुघल सम्राट औरंगजेबाचा मुलगा आझम खान याने 1679 मध्ये आई रबिया दुर्राणी हिच्या स्मृतीप्रीत्यर्थ शहरात ताजमहालाची प्रतिकृती म्हणजेच बीबी का मकबरा उभारला. या कामासाठी ताजमहाल उभारण्यात सहभागी असणारे अनेक कारागीर आग्य्राहून आले होते. त्यात शेकडो कबीरपंथी होते. त्यांना नवाबपुर्‍यात राहण्यासाठी जागा देण्यात आली होती. काम संपल्यावर काही कारागीर आग्य्राला परतले, तर काहींनी शहरातच राहणे पसंत केले. त्यांच्या मागणीवरून तत्कालीन शासकांनी ही जागा कबीर मठासाठी दिली.

इनामी जमीन गणोरीला

मकबर्‍याचे चांगले काम केल्यामुळे मुघलांनी या कारागिरांना गणोरी गावात 7 एकर, तर शहराजवळील गांधेली येथे 47 एकर जागा बक्षीस (इनामी) म्हणून दिली. पैकी गणोरीच्या जागेची कागदपत्रे उपलब्ध असल्यामुळे ती मठाला मिळाली.

काशीहून होते मठाधिपतींची निवड

मठाचे मुख्यालय काशी येथे आहे. तेथूनच देशभरातील मठांच्या मठाधिपतींची नियुक्ती होते. नवाबपुर्‍यातील मठाचे प्रमुख बाबा शांतिदास सुखदेवदास धर्मरत्न शास्त्री आहेत. 1976 पासून त्यांना या पदाचे अधिकारपत्र म्हणजेच पंजा बहाल करण्यात आला आहे. त्यांनी मठाची व्याप्ती केवळ धार्मिक कार्यापुरती र्मयादित न ठेवता त्याला समाजहिताची जोड दिली. यामुळेच शहरातील हा मठ गोरगरीब, वंचित आणि अनाथांसाठी वरदान ठरत आहे.

मठाचा झाला कायापालट

बाबा शांतिदास यांची नियुक्ती होण्यापूर्वी मठाची अवस्था अतिशय जीर्णशीर्ण झाली होती. बाबा शांतिदास यांची ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दादासाहेब गणोरकर यांच्याशी ओळख झाली. गणोरकर यांनी तत्कालीन मंत्री अब्दुल अजीम यांना मठाला मदत करण्याचे आवाहन केले. त्यांच्या मदतीमुळे 1985 मध्ये या मठाचा आणि मंदिराचा जीर्णोद्धार होऊ शकला. बाबा शांतिदास यांनी कबीरांच्या शिकवणीप्रमाणे आपण समाजाचे काही देणे लागतो, या तत्त्वावर काम करण्यास सुरुवात केली.

सेवेकरीच झाले शिक्षक

शाळेत डीएड, बीएड झालेले 5 शिक्षक असून ते कबीरांचे भक्त आहेत. ज्ञानदान करण्यासाठी ते मठाकडून एक रुपयाही घेत नाहीत. वास्तवीक पाहता त्यांना शिक्षणाच्या जोरावर कोणत्याही शाळेत नोकरी मिळू शकते, पण ते ही शाळा सोडण्यास तयार नाहीत.

इतर समाजकार्य

डोळ्यांवर शस्त्रक्रिया- संत कबीर जयंतीनिमित्ताने मठातर्फे 566 गरजूंचे डोळे तपासून पैकी 55 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.

> शालेय साहित्य वाटप- तब्बल 10 वष्रे गरजूंना वह्या, पुस्तके आणि गणवेश वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला.

> सामूहिक विवाह सोहळा- 7 वर्षे मठाने सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले.

असा भागतो खर्च

मठाला एवढय़ा कामासाठी मोठय़ा प्रमाणात पैसा लागतो. मठाची गणोरी येथे शेती असून त्यातून निघणार्‍या उत्पन्नातून थोडा खर्च भागतो. उर्वरित खर्च समाजातील दानशूरांच्या मदतीने उचलला जातो.

येथे घडले शिक्षक, प्राध्यापक आणि मॅनेजर

मठात राहून विविध क्षेत्रात चमकणारी ही आहेत मुले

प्रा. सुदाम शास्त्री- संस्कृत प्राध्यापक-कन्नड
प्रा. कृष्णा घायट- संगीताचे प्राध्यापक
प्रा. राजू सोनवणे-प्राध्यापक-एमजीएम नाट्यशास्त्र विभाग
सोनू सोनवणे-सेल्स ऑफिसर-अँक्सिस बँक
दिगंबर जाधव-शिक्षक, जि.प. शाळा, गणोरी
विठ्ठलराव जाधव, शिक्षक, जि.प. शाळा
ज्ञानेश्वर जाधव, डिझायनर, दैनिक सामना

हे आहेत कबीर शाळेतील शिक्षक
विजया तांदळे ( मुख्याध्यापक)
नवनीत राऊत, राजू कबीरपंथी, मथुरा औताडे,
दिलीप भादवे ( सर्व शिक्षक)