आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलींच्या नाराजीचेच पोलिसांनी केले शस्त्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अपत्यप्राप्तीमुळे कार्यकर्ते कौटुंबिक सुखात रममाण होऊन नक्षली चळवळीपासून दूर जाऊ नयेत म्हणून विवाहापूर्वीच त्यांची नसबंदी करण्याचा दंडक दलम कमांडरने घालून दिला आहे. त्यामुळे विवाहित नक्षलवाद्यांमध्ये निर्माण होत असलेल्या नाराजीलाच शस्त्र बनवून नक्षली चळवळीविरोधात वापरण्याची नवी योजना महाराष्ट्र आणि छत्तीसगड पोलिसांनी आखली असून तिला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी विवाहित नक्षलवाद्यांसाठी ‘नसबंदी रिओपनिंग फॉर्म्युला’ तयार केला आहे.

‘नक्षलवादी करतात जबरीने नसबंदी, करू आत्मसमर्पण पोलिसांकडे उघडून नसबंदी, जीवन होईल आनंदी’ असे घोषवाक्यच पोलिसांनी बनवले आहे. त्यामुळे विवाहानंतर अपत्यप्राप्तीची इच्छा बळावलेले तरुण नक्षलवादी पोलिसांकडे आत्मसमर्पण करू लागले आहेत. नुकतेच म्हणजे 31 मे 2014 रोजी नसबंदी उघडून अपत्यप्राप्ती इच्छिणार्‍या पहिल्या जोडप्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. त्यातील महिला गडचिरोली जिल्ह्यातील असून पती छत्तीसगडमधील आहे.

पोलिसांनी ओळखले मर्म : नक्षलवाद्यांचे दलम कमांडर प्रेमात पडलेल्या नक्षली जोडप्यांना आधी नसबंदी व नंतरच विवाहाची परवानगी दिली जाते. अशा विवाहित नक्षली जोडप्यांना नंतर अपत्यप्राप्तीचे सुख हवे असते. त्यामुळे त्यांच्यात आता अंतर्विरोध सुरू झाला आहे. त्यामुळेच पोलिसांनी ही योजना आखली आहे.

संदीप-शीलाचे उदाहरण
संदीप ऊर्फ महेंद्र केरामे (26, रा. राजनांदगाव, छत्तीसगड) आणि शीला ऊर्फ लता गोटा (20, रा. कोरची, गडचिरोली) असे आत्मसमर्पण केलेल्या जोडप्याचे नाव आहे. सध्या त्यांचा मुक्काम पोलिस कॅम्पमध्येच आहे. संदीपची नसबंदी उघडण्यात आली आहे. त्यांचे उदाहरण इतरांना सांगून त्यांनाही आत्मसमर्पणास तयार केले जात आहे.

शराणागती पत्करल्यास पुनर्वसन करणार
आम्ही अनेक अभियाने राबवली, मात्र तुलनेने हे अभियान अधिक यशस्वी होताना दिसते आहे. विवाहित नक्षल्यांना आता संततीसुख हवे आहे. मात्र, चळवळीचा त्यांच्यावर दबाव असल्यामुळे त्यांना आम्ही मदतीचा हात देत आहोत. आत्मसमर्पण केलेल्यांचे आम्ही संपूर्णपणे पुनर्वसनही करणार आहोत - रवींद्र कदम, विशेष पोलिस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र.

(डेमो पिक)