आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीत पोलिसांच्या मदतीला एनसीसीचे विद्यार्थी !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड - जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदान केंद्रांची संख्या वाढल्याने पोलिस बळ अपुरे पडत असल्याने एनसीसीच्या विद्यार्थ्यांसह राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनाही बंदोबस्तात सहभागी करून घेण्याचा विचार पोलिस प्रशासन करीत आहे. महाराष्ट्रात सगळीकडेच निवडणुका असल्याने स्थानिक पातळीवरच बंदोबस्ताची व्यवस्था करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून पोलिस अधिका-यांना देण्यात आल्या आहेत.
सिल्लोड तालुक्यात आठ जिल्हा परिषद गट व सोळा पंचायत समिती गणांसाठी तीनशे सहा मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. तीनशे सहा मतदान केंद्रांसाठी किमान पाचशे पोलिस कर्मचारी अधिका-यांची आवश्यकता आहे. सिल्लोड ग्रामीण व अजिंठा पोलिस स्टेशनअंतर्गत मतदान केंद्र येत असल्याने बंदोबस्तासाठी व्यवस्था त्यांना बघावी लागणार आहे. त्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वनाथ जटाळे, अजिंठा पोलिस स्टेशनचे दिनेश आहेर व सिल्लोड ग्रामीणचे संदीप गुरमे सध्या बंदोबस्ताच्या नियोजनात व्यग्र आहेत. तालुक्यात सध्या सिल्लोड शहर, ग्रामीण व अजिंठा पोलिस स्टेशन मिळून 136 कर्मचारी आहेत, तर 110 होमगार्ड असे 246 कर्मचारीच उपलब्ध आहेत. यातील पन्नास कर्मचारी विविध कारणांमुळे बंदोबस्त करू शकणार नाहीत. त्यामुळे पोलिस प्रशासनास किमान 300 जणांची आवश्यकता भासणार आहे. पोलिसांच्या दप्तरी असलेल्या नोंदीनुसार पिंपळगावपेठ, भराडी, शिवना, उंडणगाव, अंभई, घाटनांद्रा, आमठाणा, अंधारी व बोरगाव सारवणी ही गावे संवेदनशील असल्याने येथे जास्तीचा बंदोबस्त ठेवावा लागणार आहे.
बाहेरून आलेली विशेष पोलिस पथकांची कुमक अशा गावांमध्ये बंदोबस्तासाठी द्यावी लागणार आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन एनसीसी व रासेयोच्या स्वयंसेवकांना मतदानाच्या आधीचा व मतदानाच्या दिवसासाठी सहभागी करून घेण्याचा विचार करीत आहे.
बंदोबस्तासाठी विद्यार्थी घेणार - मतदान केंद्रांवर बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचा-यांची संख्या अपुरी पडत असल्याने पोलिस दलाशिवाय अन्य विभागांची व एनसीसीच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्याची चाचपणी सुरू आहे. यामध्ये दारूबंदी, वन खाते, माजी सैनिक ज्याच्याकडे गणवेश आहे व अठरा वर्षावरील एनसीसीचे विद्यार्थी व गणवेश असल्यास रासेयो विद्यार्थ्यांचा समावेश करून घेण्याचा विचार सुरू आहे. एका मतदान केंद्रावर आमचा एक कर्मचारी व दोन अन्य विभागांचे मदतनीस देण्याचे नियोजन सुरू आहे. - विश्वनाथ जटाळे, उपविभागीय पोलिस अधिकारी
होमगार्डांचीही मदत - सध्या आमच्याकडे एकशेदहा होमगार्ड असून निवडणुकीच्या कामासाठी 100 जण मदतीस येऊ शकतात. नवीन 34 जणांची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे; परंतु अद्याप त्यांचे सोळा दिवसांचे प्रशिक्षण झालेले नाही. ते झाल्यास हे 34 होमगार्डही निवडणुकीच्या कामासाठी उपयुक्त ठरू शकतात.
रवींद्र पाटील, तालुका समादेशक - येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी एनसीसीच्या विद्यार्थ्यांबाबत प्राथमिक चर्चा झाली. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे पुढील काम करू. - संदीप गुरमे,साहाय्यक पोलिस निरीक्षक सिल्लोड ग्रामीण