आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हक्काच्या पाण्यासाठी राष्ट्रवादी रस्त्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राज्यातील सत्तेत निम्मा वाटा असतानाही जायकवाडी धरणात पाणी आणण्यात अपयश आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने स्वपक्षीय मंत्र्यांच्या विरोधात शड्ड ठोकले आहे. विभागीय आयुक्तालयासमोर गुरुवारी सकाळी निदर्शने करताना 8 सप्टेंबरपासून आघाडीच्या एकाही मंत्र्याला शहरात प्रवेश दिला जाणार नाही, सर्वांच्या गाड्या अडवल्या जातील, असा स्पष्ट इशारा दिला.

जायकवाडीत पुरेसे पाणी येईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करतानाच नगर जिल्ह्यातील दुधावर नागरिकांनी बहिष्कार घालावा, असे आवाहनही नागरिकांना करण्यात आले. जायकवाडीत पाणी सोडण्याऐवजी वरील धरणाच्या परिसरातील तळी भरून घेतली जात आहेत, असा आरोप या वेळी करण्यात आला. नियमानुसार जायकवाडी 70 टक्के भरल्याशिवाय वरील धरणात पाणी अडवू नये अशी आग्रही मागणीही करण्यात आली. आंदोलनात शहराध्यक्ष मुश्ताक अहेमद, भाऊसाहेब चिकटगावकर, माणिकराव शिंदे, अभिजित देशमुख, रामनाथ पाटील, बाबूराव पवार, उदयसिंग राजपूत, वीणा खरे, छाया जंगले, गणेश वडकर, सीमा थोरात, प्रभावती पाटील, धैर्यर्शील पवार आदी सहभागी झाले होते.

आठ तारखेपर्यंत जायकवाडीत पाणी सोडले नाही तर शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, पालकमंत्री बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कोणत्याही मंत्र्याला शहरात येऊ दिले जाणार नाही. तसेच जायकवाडीत पाणी आल्याशिवाय हे आंदोलन सुरू राहील असे जिल्हाध्यक्ष सोनवणे आणि शहर कार्याध्यक्ष विनोद पाटील यांनी स्पष्ट केले.

पाण्याच्या याचिका मुंबईत वर्ग
गोदावरी खोर्‍यातील पाण्यासंबंधी औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका मुंबई येथील उच्च न्यायालयात वर्ग करण्यात आल्या. यासंदर्भात कारभारी मारुती आगवण व इतरांनी अर्ज केला होता. यावर सुनावणी झाली व मुख्य न्यायमूर्तींनी याचिका मुंबईला वर्ग केल्या. पुढील सुनावणी आता मुंबई उच्च न्यायालयात 21 सप्टेंबरला होईल. प्रकरणात याचिकाकर्त्यांनी उत्तरादाखल 17 सप्टेंबरपर्यंत शपथपत्र दाखल करावयाचे आहे.

आवाज उठवलाच पाहिजे
हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे. पाणी वळवून अन्याय होत असेल तर राष्ट्रवादीकडून मोठी आंदोलने होतील. अजित पवार यांच्याकडे हा विषय मांडणार.’’ राजेश टोपे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री.

अजित पवार यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करावे. त्यांच्या आदेशानेच हक्काचे पाणी सोडले जात नाही.’’ अंबादास दानवे, शिवसेना जिल्हाप्रमुख.