आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापूर तालुक्यात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र, भाजपचे स्वबळ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीत फाटाफूट झाली असताना कॉँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने निवडणुकीत सत्ता काबीज करण्यासाठी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी 12 जागांवर तर कॉँग्रेस 9 जागांवर आघाडीवर राजी झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रवादीने आघाडीसाठी कॉँग्रेसला 16 जानेवारीची मुदत दिली होती. त्यानुसार दोन्ही पक्षांतील नेतेमंडळींची जागावाटपावर बोलणी झाली असता आघाडीचा निर्णय झाल्याचे पदाधिका-यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रमोद नांगरे यांनी आघाडीचे जागावाटपाचे समीकरण जुळल्याचे सांगितले. 18 जानेवारीला पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या उपस्थितीत येथीळ धुमाळ मंगल कार्यालयात राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल, असेही नांगरे यांनी सांगितले.
आघाडीबाबत मंगळवारी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर लगेच इच्छुकांच्या मुलाखत होणार होतील. कॉँग्रेसकडून मात्र याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
युतीला पुन्हा तडा - जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत भाजप-सेना युतीचा धागा जुळेल अशी अपेक्षा होती. तथापि शिवसेनेने भाजपची तालुक्यातील राजकीय ताकद कमी असल्याने युतीला प्रतिसाद दिला नसल्याचे समजते. त्यामुळे नगरपालिकेपाठोपाठ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही महायुतीत फाटाफूट पडली आहे.
मनसेचेही स्वबळ - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत 21 जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय मनसेने घेतला असल्याची माहिती जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत सदाफळ यांनी दिली. मंगळवारी वाजता पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील शिंदे यांच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया मनसे कार्यालयात घेण्यात येणार आहे.
आ. वाणींमुळे फुटली युती - जि. प. व पं. स. निवडणुकीतील एकूण 21 जागा भाजप स्वबळावर लढणार असल्याची माहिती भाजपचे नेते एकनाथराव जाधव यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. भाजप या निवडणुकीत शिवसेनेशी युती करण्यास तयार असताना आमदार आर. एम. वाणी युती करण्यास इच्छुक नाहीत.
न. प. निवडणुकीप्रमाणे जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आहे. 17 जानेवारीला औरंगाबाद येथील भाजपच्या विभागीय कार्यालयात तालुक्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार वाणी हे मी, माझा शिवसेना पक्ष आहे अशा भूमिकेतून पक्षाचा कारभार हाकत असल्याचा आरोपही जाधव यांनी बोलताना केला.
आज मनसेची बैठक - पिराची पिंपळवाडी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात येणार आहे. यात प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील शिंदे, तालुकाध्यक्ष अप्पासाहेब सोलार, उपाध्यक्ष विजय चव्हाण, रोजगार व स्वयंरोजगार सेनेचे तालुकाध्यक्ष भगवान खाटीक आदींची या वेळी उपस्थिती असणार आहे.