आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादवर राष्ट्रवादीचा डोळा, सतीश चव्हाण - सुधाकर सोनवणे लोकसभेसाठी इच्छूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादीची पावले आक्रमकपणे पडताना दिसत आहेत. मागील 22 वर्षांत लोकसभेच्या सहापैकी पाच निवडणुकांत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. शिवसेना-भाजप युतीने विजयाची हॅट्ट्रिक नोंदवली. आता आणखी एक पराभव पदरी पाडून घेण्यापेक्षा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे द्या, आम्ही निर्विवाद विजय मिळवतो, असा दावा होत आहे. 19 ऑगस्टला निवडणूक होणार्‍या औरंगाबाद-जालना स्वराज्य संस्था मतदारसंघावरही राष्ट्रवादीने दावा केला आहे.

काँग्रेसचे रामकृष्णबाबा पाटील यांनी 1998 मध्ये शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांचा पराभव केला होता. त्यानंतर तीन वेळा शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांनी विजय मिळवला. त्याआधी 1996 आणि 91 मध्ये अनुक्रमे प्रदीप जैस्वाल आणि मोरेश्वर सावे या शिवसैनिकांनी संसदेत प्रवेश केला होता. गतवेळी शांतीगिरी महाराज मैदानात उतरल्याने खैरे पराभूत होतील, अशी अटकळ बांधण्यात येत होती. परंतु उलट खैरे यांना फायदाच झाला.

सतीश चव्हाण, सोनवणे इच्छुक
औरंगाबादेत पुन्हा पराभवाला सामोरे जाण्यापेक्षा अदलाबदलीत औरंगाबाद मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घ्यावा, अशी मागणी पुढे येत आहे. जिल्ह्यातील मराठा मतदारांचे वर्चस्व, नव्याने पक्षात येणारे कार्यकर्ते यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार सहज विजयी होईल, असा स्थानिक नेत्यांचा होरा आहे. पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण लोकसभेत जाण्यासाठी इच्छुक असल्याचे समजते. तर आमदार होता आले नाही म्हणून काय झाले, खासदार झाले तरी बरे, अशी जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे यांची अपेक्षा आहे.

एकही आमदार नाही, सर्वत्र दुसर्‍या स्थानी
औरंगाबाद मतदारसंघात काँग्रेसचे दोन आमदार (पूर्व व फुलंब्री) आहेत. राष्ट्रवादीचा एकही आमदार नाही. पैठणमध्ये आमदार असला तरी हा मतदारसंघ औरंगाबाद लोकसभेत येत नाही. महापालिकेत काँग्रेसचे 18, तर राष्ट्रवादीचे 11 सदस्य आहेत. जिल्हा परिषदेतही काँग्रेसचे 16, तर राष्ट्रवादीचे 10 सदस्य आहेत. गंगापूरचे अपक्ष आमदार प्रशांत बंब हे राष्ट्रवादीसोबत असल्याचा दावा तेवढा केला जातो.

मागील सहा निवडणुकांचे चित्र
वर्ष विजयी पराभूत
2009 चंद्रकांत खैरे (शिवसेना) उत्तमसिंग पवार (काँग्रेस)
2004 चंद्रकांत खैरे (शिवसेना) रामकृष्ण बाबा (काँग्रेस)
1999 चंद्रकांत खैरे (शिवसेना) ए. आर. अंतुले (काँग्रेस)
1998 रामकृष्ण बाबा (काँग्रेस) प्रदीप जैस्वाल (शिवसेना)
1996 प्रदीप जैस्वाल (शिवसेना) सुरेश पाटील (काँग्रेस)
1991 मोरेश्वर सावे (शिवसेना) सुरेश पाटील (काँग्रेस)