आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीशी चर्चेनंतरही पदाधिकारी संभ्रमात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूर - फेब्रुवारीमध्ये होणा-या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी केली असून त्यादृष्टीने इच्छुक उमेदवारांच्या बैठका घेऊन उमेदवारांच्या याद्या अंतिम टप्प्यात आहेत. शिवसेना उमेदवारांच्या मुलाखती पुढील दोन दिवसांत झाल्यानंतर भारतीय जनता पक्षासोबत युतीबाबत निर्णय होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस व आमदार प्रशांत बंब यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांशी मुंबईत चर्चा झाली असून फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला ठरला असून निवडणूक राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढण्याच्या आग्रहामुळे आमदार बंब हे दोन दिवसांत निर्णय देणार असल्याची माहिती समोर आली असल्याने अद्याप संभ्रम कायम आहे.
निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष व इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून शिवसेना व काँग्रेसच्या काही इच्छुक उमेदवारांना वरिष्ठांनी कामाला लागण्याच्या सूचना केल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांनी आपापल्या पद्धतीने मतदारांच्या व पक्ष कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीस सुरुवात करून प्रचाराला अप्रत्यक्ष सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्यातील काही नेते हे आमदार प्रशांत बंब यांच्याशी आघाडी न करता काँग्रेसशी आघाडी करणे किंवा स्वबळावर लढण्याच्या बाजूचे आहेत, तर काही आमदार बंब यांच्याशी आघाडीस अनुकूल आहेत.यासंबंधी 16 जानेवारी रोजी मुंबईत राष्ट्रवादीचे नेते कृष्णा पाटील डोणगावकर, जिल्हा सरचिटणीस शिवाजी पाटील बनकर व कुंडलिकराव माने यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करून आमदार बंब यांच्याशी आघाडी करण्यास विरोध दर्शवला होता. मात्र, काल पुन्हा राष्ट्रवादीचे जिल्हा संपर्कमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत आमदार बंब व राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत आघाडी करण्याबाबत दोन्ही बाजूंनी अनुकूल मत व्यक्त करून गंगापूर खुलताबाद जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युल्यावर चर्चा झाली. फक्त जिल्हा परिषदेच्या 12 पैकी 7 जागांवर राष्ट्रवादीने दावा सांगितला असून आमदार बंब यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी अट घातली असून त्याबाबतचा निर्णय आमदार बंब हे एक-दोन दिवसांत घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी पाटील बनकर यांनी दिली.
काँग्रेसचे नेते किरण पाटील डोणगावकर यांच्याशी राष्ट्रवादीशी आघाडीबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीच्या वेळेपर्यंत राष्ट्रवादीकडून कुठलाही प्रस्ताव किंवा भूमिका स्पष्ट झालेली नव्हती त्यामुळे काँग्रेसने तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 9 व पंचायत समितीच्या 18 जागांवर स्वबळावर उमेदवार उभे करण्याची तयारी पूर्ण झाली असून उमेदवारांच्या याद्या अंतिम टप्प्यात आहेत.
शिवसेनेचे माजी आमदार अण्णासाहेब माने यांनी सांगितले की, 19 व 20 जानेवारीला उमेदवारांच्या मुलाखतीनंतर भारतीय जनता पक्षासोबत जिल्हापातळीवर निर्णय होणार आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी व आमदार बंब यांच्यात आघाडीबाबत शेवटपर्यंत अनिश्चितता होती व ऐनवेळी दोघांना स्वतंत्रपणे लढावे लागले व त्याची किंमत राष्ट्रवादीला मोजावी लागली होती. त्यामुळे राष्ट्रवादीचे स्थानिक नेते या वेळेस काळजी घेण्याच्या मन:स्थितीत आहेत. काँग्रेस नगरपालिकेतील बहुमताचा फायदा घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्याची शक्यता असून राष्ट्रवादी काँग्रेस व आमदार बंब यांनी आघाडीबाबतची अनिश्चितता लवकर संपवल्यास त्यांच्या उमेदवारांना लवकर कामाला लागता येईल.