आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅश, कास्ट आणि क्राइमचे लोकशाहीला ग्रहण- अरुण गुजराथी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- भारतीय लोकशाही जगात सवरेत्तम आहे, पण सध्या लोकशाहीला कॅश, कास्ट आणि क्राइमचे ग्रहण लागल्याचे रोखठोक मत विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अरुण गुजराथी यांनी व्यक्त केले. ‘संसदीय कामकाज कार्यपद्धती’ या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते.

देवगिरी महाविद्यालय आणि महाराष्ट्र राज्य विधानमंडळ वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे दोनदिवसीय कार्यशाळेचे मंगळवारी (5 मार्च) उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस मधुकरराव मुळे होते. गृह खाते, भ्रष्टाचार आणि वैयक्तिक प्रश्नांनाच तारांकित प्रश्नांमध्ये उपस्थित करण्याची पद्धत वाढली आहे. विधिमंडळ जनतेचे प्रश्न सोडवण्याचे लोकशाहीतील सशक्त व्यासपीठ आहे, याचे भान सर्वांना राहिले नाही. वस्तुत: ज्यांना लिहिता-वाचता येत नाही, ज्यांना आपले प्रश्न आणि समस्या मांडता येत नाही, त्यांचे प्रश्न उपस्थित करण्याचे काम आमदारांनी करावे, अशी माफक अपेक्षा गुजराथी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, उपस्थित प्रश्नांची त्याच वेळी सोडवणूक व्हावी. शैक्षणिक पात्रता नसली तरीही सभागृहात आमदार म्हणून प्रवेश करता येतो; पण त्यांना राजकाराणाचा अनुभव असणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांत विधिमंडळाचे कामकाज ठप्प करण्याची पद्धत रुजू झाली आहे, पण प्रत्येक मिनिटाला 15 हजार रुपयांचा खर्च येतो, याचे सर्वांनी भान राखावे. शासन, प्रशासनातील भ्रष्ट कारभारामुळे लोकशाही व्यवस्थेला कीड लागल्याने नवी आव्हाने उभी ठाकली आहेत. वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक नागेश केसरी, प्राचार्य डॉ. शिवाजीराव थोरे, उपप्राचार्य डॉ. अशोक तेजनकर, उपप्राचार्य डॉ. उत्तम पांचाळ यांची उपस्थिती होती. डॉ. अशोक नाईकवाडे यांनी सूत्रसंचालन केले.

प्रसिद्धीसाठी विडंबन चिंताजनक
संसदीय लोकशाहीमध्ये निर्वाचित सदस्यांना चर्चेचे उत्तम व्यासपीठ असताना सभागृहाबाहेर अंगविक्षेप अथवा विडंबन करून माध्यमांचे लक्ष स्वत:कडे केंद्रित करण्याचे प्रकार वाढले आहेत. या प्रकारांना आळा बसणे गरजेचे असून सभागृह हे सभ्य माणसांच्या चर्चेचे व्यासपीठ आहे, असे मत वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक नागेश केसरी यांनी व्यक्त केले. उद्घाटकीय सत्रानंतर त्यांचे बीजभाषण झाले.

विधिमंडळ आणि परिसरात सवंग प्रसिद्धीसाठी कपडे काढणे, पेंढय़ा जाळणे, बॅनर लावणे, बॅनरचे कपडे परिधान करून बातम्या छापून आणण्यात सदस्य धन्यता मानतात. मात्र, अशी कृती करणे अयोग्य असून विधिमंडळ जागृत लोकांचे सभागृह आहे. नियमाप्रमाणे सभागृहाच्या कामकाजाचे संचालन करणे सभापतींचे काम आहे आणि नीटनेटके कपडे घालून येण्याची जबाबदारी सदस्यांची आहे. सदस्य ही जबाबदारी पाळत नसल्याने विधिमंडळ परिसरात धरणे, अंगविक्षेप आणि आंदोलन करण्यास आता बंदी घालण्यात आल्याचेही केसरी यांनी सांगितले.