आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेला त्रास देणा-या राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरातील उच्चभ्रू वसाहतीमधे राहणार्‍या महिलेचा छळ सिल्लोड तालुक्यातील राष्ट्रवादी कॉँग्रेसचा एक नेता करत आहे. याच प्रकरणात तो जामिनावर सुटला. त्यानंतर पुन्हा त्याचा उद्योग सुरू झाला. पोलिसांकडे दुसर्‍यांदा तक्रार केली. मात्र ‘तपास सुरू आहे’ अशी टेप वाजवली जात होती. प्रकरणातील सत्य उजेडात आणून तक्रारदार किंवा आरोपीला न्याय मिळेल यादृष्टीने तपास करण्याऐवजी टाळाटाळ करण्यात आली. तक्रारदार महिलेने केलेले आरोप अतिशय गंभीर आहेत. त्यामुळे डीबी स्टारने तपासाअंती महिलेसह 12 मे रोजी आयुक्तालय गाठले. आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर अखेर गुरुवारी राष्ट्रवादी कॉँग्रेसचा नेता ठगन देवराव भागवत पाटील याच्यावर अश्लील संभाषण, शिवीगाळ, धमकावणे याबाबत गुन्हे दाखल झाले.
काय आहे प्रकरण
शहरातील एका उच्चभ्रू वस्तीत उच्चशिक्षित व्यक्ती,पत्नी आणि कुटुंबासह राहतात. तीन वर्षांपूर्वी ठगन देवराव भागवत पाटील (सिल्लोड) कामधंदा करावा या उद्देशाने शहरात आला. जुनी ओळख म्हणून पती राजेश (नाव बदलले आहे) यांनी ठगनला काही दिवसांसाठी राहण्यासाठी जागा दिली. त्याला आर्थिक मदतही केली; पण ठगन पाटील यांने राजेश यांच्या पत्नीचे स्नानगृहातील फोटो काढून घेतले. त्या आधारावर ब्लॅकमेल करत असल्याचा महिलेचा आरोप आहे.
धमकावणे सुरू
ठेकेदारीच्या व्यवसायात ठगन पाटलाचा जम बसल्याने त्याने राजकीय पक्षाशी जवळीक साधली. यासाठी लागणारा पैसा त्याने राजेश यांच्याकडून घेतला. पुढे तो आणखी पैसे मागायला लागला. महिलेला अश्लील फोटोचा धाक दाखवून ब्लॅकमेल करण्याचा सपाटा लावला.
मारहाण, विनयभंगाची तक्रार
अशाच प्रकारे 18 सप्टेंबर 2012 रोजी ठगनने पैशांची मागणी केली. नकार दिल्याने त्याने सोन्याची पोत हिसकावत मारहाण केल्याची तक्रार दांपत्याने मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात दिली. या प्रकरणी ठगनवर विनयभंग व चोरीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
जामीन मिळताच पुन्हा तेच.
या प्रकरणी ठगनची जामिनावर सुटका होताच आरोपीने तक्रार मागे घेण्यासाठी धमकावणे सुरू केले. घरात मारहाणीपर्यंत हे प्रकरण गेले. मुलगी लग्नाची असल्याने बदनामीच्या भीतीने महिला गप्प राहिल्याचे तिने पोलिसांना सांगितले. ठगनने महिलेला रात्री-अपरात्री मोबाइलवरून मेसेज करून फोटो इंटरनेटवर टाकण्याची धमकी दिल्याचे सांगितले. त्यानंतर 10 फेब्रुवारी रोजी मारहाण केल्याची तक्रार मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात 11 फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आली.
तपास गुलदस्त्यात
कोणत्याही प्रकरणात तक्रार आल्यानंतर त्याचा तपास करणे पोलिसांची जबाबदारी आहे. या प्रकरणात महिलेने केलेले आरोप तर गंभीर स्वरूपाचे आहेत. आरोपांची सत्यता पडताळून पुढील कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, दोन महिने उलटूनही मुकुंदवाडी पोलिसांनी तक्रारीचा ना तपास केला ना विचारपूस. अनेक वेळा खेट्या घालूनही महिलेला ठाण्यात कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नाही. अखेर त्यांनी डीबी स्टारकडे कैफियत मांडली.

पीडित महिला
दोन महिन्यांपूर्वी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात या महिलेने तक्रार दिली होती. तेव्हा या संपूर्ण प्रकणाची चौकशी करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक आर. एस. तांदळे यांच्याकडे दिली होती. मात्र चौकशी सुरू आहे, माझ्यामागे इतर कामे आहेत, तुम्ही उद्या या, अशी उत्तरे देत असल्याचे महिलेने सांगितले. डीबी स्टारने शहानिशा केली असता तपासाला सुरुवातच करण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर चमूने पोलिस निरीक्षक जयकुमार चक्रे यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी तक्रार लॉ आफिसरकडे पाठवली आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर कारवाई करू, असे सांगितले. शिवाय निवडणुका असल्याने कारण पुढे केले. मात्र, लॉ ऑफिसरकडे आवश्यक माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे आहे त्या माहितीच्या आधारे त्यांनी अहवाल दिला. या प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस दोषी असल्याचे स्पष्ट होते. महिलेने 12 मार्च 2014 रोजी देखील पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह यांची भेट घेतली होती. त्यांनी आदेश देऊनही तपास पुढे गेला नाही. डीबी स्टारने गांभीर्य लक्षात घेता पुन्हा पोलिस आयुक्तांपुढे प्रकरण मांडले. त्यानंतर ठगन देवराव भागवत पाटील (सिल्लोड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
हे प्रकरण नेमके काय आहे, ठगन नावाची ही व्यक्ती कोण, याचा संपूर्ण तपास चमूने केला. तेव्हा अनेक बाबी समोर आल्या. त्या पुढीलप्रमाणे..
3महिलेच्या मोबाइलवर आलेले धमकीचे एसएमएस ठगनच्या नावावर असलेल्या बीएसएनएल मोबाइलवरून पाठवण्यात आले आहेत.
3ठगन पाटील हा सिल्लोड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका विधानसभा अध्यक्ष असल्याचे सांगतो. डीबी स्टारने याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे यांना विचारले असता तो पक्षाचा सक्रिय सदस्य असून सिल्लोड तालुका विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यभार त्याच्याकडे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.