आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ncp Mla Satish Chavan Speaking Issue At Aurangabad, Divya Marathi

मराठवाड्यात नरेंद्र मोदींची लाट नाही - आमदार सतीश चव्हाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभरात मोदींची लाट सर्वांनी अनुभवली. मात्र, मराठवाड्यात ही लाट रोखण्यात आली. नांदेड, हिंगोलीची जागा काँग्रेस-राष्ट्रवादीने राखली आणि आता तर मराठवाड्यात मोदींची लाट नाही, असा दावा पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार सतीश चव्हाण यांनी केला.
चव्हाण यांच्या प्रचारानिमित्त काँग्रेस व राष्ट्रवादीच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी हडकोतील राष्ट्रवादी भवनात झालेल्या या बैठकीत चव्हाण म्हणाले की, भाजपकडे मराठवाडा पदवीधर मतदारसंघात मोदींचा फोटो व जाहिरातींवर भर देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांची गैरव्यवहाराची अनेक प्रकरणे आहेत. ती आता निवडणुकीच्या काळात भाजपमधील त्यांचे सहकारीच बाहेर काढणार असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

20 जून रोजी निवडणूक असून इतक्या अल्पावधीत बोराळकर 78 तालुके व आठ जिल्ह्यांत कसे पोहोचतील, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. क्रांती चौकातील शिवाजी महाराजांचा पुतळा उंच करण्यासाठी दोन कोटींचा निधी दिला, परंतु मनपाच्या उदासीन धोरणामुळे काम करता आले नाही, असा आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये चांगला समन्वय असल्याचे सांगितले. औरंगाबाद व जालना लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने लढवले असले तरीही राष्ट्रवादीने मनापासून प्रचार केल्याचेही ते म्हणाले.

यावेळी वेळी शहराध्यक्ष मुश्ताक अहेमद, राष्ट्रवादी ज्येष्ठ नागरिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब जाधव, काँग्रेसचे मिलिंद पाटील, मनोज पाटील, नगरसेविका रेखा जैस्वाल, राष्ट्रवादीचे बाबूराव पवार, जि.प. सदस्या अनुराधा चव्हाण, उल्हास उढाण, विलास चव्हाण, डॉ. गफ्फार कादरी, मनमोहनसिंग ओबेरॉय, वीणा खरे, इक्बालसिंग गिल, पवन डोंगरे, आत्माराम बोराडे, अफसर खान, मेहराज पटेल आदींची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन राष्ट्रवादी शिक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष संजय जाधव पाटील यांनी केले. नगरसेवक काशीनाथ कोकाटे यांनी आभार मानले.

आमदारांची बैठकीला दांडी
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संयुक्त बैठकीस फुलंब्रीचे आमदार डॉ. कल्याण काळे, आ. एम. एम. शेख, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार, पैठणचे आमदार संजय वाघचौरे, गंगापूरचे आमदार प्रशांत बंब आदी उपस्थित राहणार असल्याचे प्रसिद्धिपत्रकाद्वारे सांगण्यात आले होते, परंतु बैठकीला आमदारांपैकी कुणीच उपस्थित नव्हते. काँग्रेससह जिल्ह्यातील एकमेव राष्ट्रवादी आमदार वाघचौरे यांनीही बैठकीला दांडी मारली होती.