आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप कार्यकर्त्यांकडून विद्यापीठात तोडफोड; आंबेडकर अनुयायांनी उधळला कार्यक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शनिवारी आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय पुण्यतिथीचा कार्यक्रम आंबेडकर अनुयायांनी उधळून लावला. त्यावर संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी विद्यापीठात तोडफोड केली. कार्यक्रमात व्यत्यय आणणाऱ्यांना मारहाणही केली.

या पुण्यतिथीनिमित्त विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘एकात्म मानव जीवन दर्शन’ या विषयावर डॉ. अशोक मोडक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचे भाषण झाल्यानंतर दबा धरून बसलेल्या आंबेडकर अनुयायी कार्यकर्त्यांनी भाजपविरोधी घोषणा देण्यास सुरुवात केली. सुमारे आठ ते दहा कार्यकर्त्यांनी  निषेधाचे फलक झळकावत कार्यक्रम उधळून लावला.

त्यानंतर  डॉ. मोडक यांनी भाषण करण्याऐवजी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करण्याचा मनोदय व्यक्त केला. आनंद लोखंडे, सचिन शिंदे, कमलेश चांदणे, प्रकाश नवतुरे आणि दिनेश चांदणे आदी कार्यकर्त्यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. नंतर ते कुलगुरू आणि डॉ. मोडक यांच्याशी चर्चा करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहात गेले. यादरम्यान भाजपचे कार्यकर्ते तथा विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य डॉ. गजानन सानप यांनी मोबाइलवरून संपर्क करून भाजपच्या कार्यकर्त्यांना विद्यापीठात येण्यास सांगितले. भाजयुमोचे शहराध्यक्ष सचिन झवेरी, सरचिटणीस मयूर वंजारी, सागर पाले, दीपक ढाकणे, कुणाल मराठे आदींनी व्यवस्थापन परिषदेचे दार लाथा मारून तोडण्याचा प्रयत्न केला. दार आणि खिडक्यांच्या काचा तोडून बळजबरीने आत प्रवेश केला. डॉ. मोडक आणि कुलगुरूंशी चर्चा सुरू असताना आंबेडकर अनुयायी कार्यकर्त्यांवर हल्ला करून त्यांना मारहाण केली.  सचिन शिंदे यांना जबर मारहाण करण्यात आली.  विद्यापीठात तोडफोड केल्यानंतरही कुलगुरूंनी डॉ. मोडक यांचे व्याख्यान सुरू करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. त्यामुळे शहरातील रिपाइं कार्यकर्त्यांनी विद्यापीठात येऊन भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस आयुक्त रवीकांत बुवा, पोलिस निरीक्षक सलीम शेख आणि उपनिरीक्षक आर.एम बांगर यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. चौकशीनंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे बांगर यांनी सांगितले.
 
सीसीटीव्ही फुटेज तपासणार
सीसीटीव्हीचे सविस्तर फुटेज तपासून तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याच्या सूचना कुलगुरूंनी पोलिस निरीक्षक सलीम शेख यांना फोनवरून दिल्या. बेगमपुरा ठाण्यात दोन तक्रार अर्ज आले असून यातील एक विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने सुरक्षा अधिकाऱ्यांनी तर दुसरा अर्ज सचिन शिंदे यांनी दाखल केला आहे. ‘आम्ही कार्यक्रमात असताना काही तरुणांनी आम्हाला शिवीगाळ करत मारहाण केली,’ असे शिंदे यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे. 

पुढील स्लाइडवर पाहा, औरंगाबाद विद्यापीठातील तोडफोडीचे फोटोज...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...