आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे भीक मांगो आंदोलन, थकीत शिष्यवृत्ती त्वरित वितरीत करण्याची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मागील 2 वर्षांपासून थकीत असणारी दलित, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्वरित वितरीत करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने विभागीय समाजकल्याण कार्यालयावर आज गुरुवारी आक्रोश मोर्चा व भीकमांगो आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वळवलेला दलित व आदिवासींचा विकास निधी तात्काळ परावर्तित करावा, ओबीसी विद्यार्थ्यांची बंद केलेली शिष्यवृत्ती तात्काळ चालू करावी, आदी प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. 

गुरुवारी दुपारी क्रांतीचौक ते विभागीय समाजकल्याण कार्यालय परिसर, खोकडपूरापर्यंत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने रॅली काढण्यात आली. यादरम्यान भीक मागो आंदोलनही करण्यात आले. विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत म्हणून आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय विभागाचे साहाय्यक आयुक्त यांना मागण्यांचे निवेदन दिले व भीक मागून गोळा केलेली रक्कम त्यांच्याकडे सुपूर्द केली.
 
विद्यार्थ्यांनी उशीरा शुल्क भरल्यास त्यांना दंड आकारण्यात येतो. त्याचप्रमाणे शासनाने २ दोन वर्षांपासून ईबीसी, स्कॉलरशीपपोटी थकवलेल्या रकमेचे व्याज विद्यार्थ्यांना द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांनी यावेळी केली. आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष संकेत ढवळे, प्रदेश सचिव अक्षय पाटील, शहराध्यक्ष मयूर सोनवणे, जिल्हाध्यक्ष फिरोज पठाण, शहर कार्याध्यक्ष अमोल दांडगे, दीपक बहिर, ऋषीकेश देशमुख,  दीक्षा पवार, यशोदीप पाटील, संदीप फाजगेसह बहुसंख्य कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता.
 
आंदोलनात करण्यात आलेल्या इतर मागण्या
- चालु शैक्षणिक वर्षाचे शिष्यवृत्ती अर्ज स्विकारुन रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करावी. 
- ओ.बी.सी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद केलेली आहे. ती पुर्ववत सुरु करुन अर्ज स्विकारावेत.
- सामाजिक न्याय विभागांतर्गत् असलेल्या विविध वसतिगृहात योग्य त्या सोयी-सुविधा शासन नियमाप्रमाणे तात्काळ पुरविण्यात याव्यात. 
- वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दर्जेदार जेवणासह नियमित पाणी व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी.
- ई.बी.सी विद्यार्थ्यांना ई.बी.सी सवलत द्यावी. 
- खेळाडू विद्यार्थ्यांना सवलत देण्यात यावी. 
 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...