आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Need New Intellectual Movement For Casteless Society : Dr. Yashwant Sumant

जातविरहित समाजरचनेसाठी नवी वैचारिक चळवळीची गरज : डॉ यशवंत सुमंत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जातविरहित समाजरचना निर्माण करण्यासाठी सामाजिक न्यायावर आधारित नवी वैचारिक चळवळ उभारणे गरजेचे असल्याचे मत पुणे विद्यापीठातील प्राध्यापक आणि विभागप्रमुख डॉ. यशवंत सुमंत यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने सोमवारी (18 मार्च) मोईन शाकीर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प त्यांनी गुंफले, त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी लोकप्रशासनशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. पारस बोरा होते.

‘समकालीन विचारसरणीचे विश्व’ या विषयावर बोलताना डॉ. सुमंत म्हणाले, समाजातील विविध घटकांचा अभ्यास करत असताना सामाजिक शास्त्रांच्या विद्याशाखेतील अभ्यासकांनी समाजातील प्रश्न सुटतील असेच संशोधन करावे. जातविरहित समाजरचना निर्माण करण्याचा संकल्प डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह देशातील अनेक महापुरुषांनी केला होता. त्या दृष्टीने मात्र आपली पावले पडत नसल्याचे सांगून ते म्हणाले, जातिअंताच्या लढाईसाठी सामाजिक न्यायावर आधारित नवी वैचारिक चळवळ उभारण्याची गरज आहे.

फुले-शाहू-आंबेडकर आणि मार्क्‍स या समाजसुधारकांनी त्यासाठी प्रयत्न केला होता. त्यांच्या नावानेच विचारसरणीने जन्म घेतला. आता मात्र स्त्रीवादी विचारांसारख्या नव्या विचारसरणीचा अभ्यास करताना अभ्यासक दिसत नसल्याबद्दल डॉ. सुमंत यांनी खंत व्यक्त केली. देशाला हजारो वर्षांची परंपरा लाभलेली असून बहुसांस्कृतिकवादाची नवी संकल्पना आपल्याला का निर्माण करता येत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. व्यासपीठावर व्याख्यानमालेचे संयोजक आणि राज्यशास्त्राचे विभागप्रमुख डॉ. बी. एस. वाघमारे आणि सहसंयोजक डॉ. श्रीराम निकम यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ. वाघमारे यांनी केले. डॉ. बोरा यांनी अध्यक्षीय भाषण केले. सूत्रसंचालन करून आभार हनुमंत वाघमारे यांनी मानले. या वेळी ज्येष्ठ विचारवंत फक्रुद्दीन बेन्नूर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. प्रतिभा पाटील, अधिसभा सदस्य अण्णासाहेब खंदारे, डॉ. अफाक खान, डॉ. सतीश दांडगे आदींची उपस्थिती होती.
आजही व्याख्यान
मोईन शाकीर व्याख्यानमालेत मंगळवारी पुन्हा डॉ. यशवंत सुमंत यांचे व्याख्यान होणार आहे. ‘पर्यावरणात्मक समाजवाद’ या विषयावर ते बोलणार असून विद्यार्थ्यांनी हजर राहण्याचे आवाहन डॉ. वाघमारे यांनी केले आहे.