आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेसाठी खूप बोलायचे होते; पण...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नव्या महानगरपालिका सभागृहात ५७ महिला प्रतिनिधी राहणार आहेत. यापूर्वीच्या सभागृहात २७ महिला सदस्या होत्या. मात्र, यापैकी मोजक्याच महिला प्रतिनिधींनी आपली मते मोकळेपणी, मुद्देसूदपणे मांडली, तर उर्वरित महिलांनी मात्र सर्वांच्या आवाजात आवाज मिसळला. यापैकी काही जणींना खूप काही बोलायचे होते, पण राहून गेले असेही झाले. यामागील कारणे शोधताना असे दिसून आले की, निवडून आल्यावर प्रतिनिधी म्हणून सभागृहात जाण्याची संधी तर मिळाली, पण संवादकौशल्य, आत्मविश्वास नसल्याने तसेच पालिकेचे नियम जाणून घेण्यात वेळ गेल्याने बोलायचे राहूनच गेले, अशी प्रतिक्रिया नगरसेविकांनी दिली.

यंदाच्या निवडणुकांनंतरही सभागृहात पहिल्यांदाच पाऊल ठेवणा-या महिलांची संख्या अधिक राहील. तेव्हा त्यांना संवादकौशल्य, आपले मुद्दे योग्य पद्धतीने मांडण्याचे तंत्र तसेच पालिका कारभाराचे शास्त्र प्रशिक्षण वर्गाद्वारे शिकवण्यात का येऊ नये? असा वर्ग घेतल्यास महिला पदाधिका-यांचे कार्य आगामी काळात अधिक ठळकपणे होईल. शेवटी शहराच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांचेच आहे. सध्याच्या महानगरपालिकेत साधना सुरडकर, प्रीती तोतला आणि रेखा जैस्वाल अभ्यासपूर्णरीत्या विषय मांडत होत्या. तर खुद्द महापौर कला ओझा यांनाही आपले मुद्दे योग्यरीत्या मांडता आले नाहीत. इतर नगरसेविका मात्र, वॉर्डाचेच मुद्दे उपस्थित करत गेल्या. अनेकींना घरचे कारभारी मुद्दे सांगत तेवढेच सभागृहात त्या मांडायच्या. काही जणींनी तर पाच वर्षांत तोंडही उघडले नाही.

प्रशिक्षण गरजेचे आहेच
नव्या सभागृहात अनेक महिला अतिशय कोरी पाटी घेऊन येतील. कामकाज समजावून घेण्यात वर्ष दोन वर्षे जातील, यापेक्षा प्रशिक्षणवर्ग घेतले तर मदत मिळेल, शेवटी शहराची मदार या ५० टक्क्यांवर आहे. महिला पदाधिका-यांकडून अधिक अपेक्षा असतील.
छाया वेताळ, नगरसेविका

तीन दिवसांचे प्रशिक्षण
ही कार्यशाळा ३ दिवसांची असावी, यामध्ये संवादकौशल्यावरही भर द्यावा, कारण मुद्दा तडीस नेण्यापर्यंत भूमिका महत्त्वाची असते. मनपापेक्षाही त्या-त्या पक्षाने ही कार्यशाळा घ्यायला हवी, कारण या नगरसेविका पक्षाची प्रतिमा मांडणा-या असतील.
सारंग टाकळकर, राजकीय अभ्यासक

सभे आधी कार्यशाळा घ्यावी
प्रत्येकीने वैयक्तिक पातळीवर अभ्यास करणे अपेक्षित आहे. याशिवाय मनपाने नव्या पदाधिका-यांसाठी पहिल्या सर्वसाधारण सभेआधी अशी कार्यशाळा घ्यावी.
रेखा जैस्वाल , नगरसेविका
पुढे वाचा.. जयभवानीनगरात तिरंगी लढतीचे चिन्ह