आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकालाचे वारे: एमटीसीईटी परीक्षेत नीरज पांडे नंबर वन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्राच्या सामायिक प्रवेश परीक्षेचा (एमटीसीईटी) निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत नारायणा इन्स्टिट्यूटच्या नीरज पांडेने 200 पैकी 194 गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळवला. 193 गुण घेऊन आनंद पाठक दुसरा आला.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने 16 मे रोजी परीक्षा घेण्यात आली. यंदा राज्यस्तरावर होणारी ही अखेरची परीक्षा होती. पुढील वर्षापासून राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षा लागू होणार आहे. राज्यातून 2 लाख 80 हजार 585 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून खुल्या प्रवर्गाचे 1 लाख 27 हजार आणि मागास प्रवर्गातून 1 लाख 28 हजार 965 उमेदवार पात्र ठरले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद अंतर्गत 16 हजार 513 विद्यार्थी पात्र ठरले आहेत, तर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड अंतर्गत 15 हजार 217 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. नीरज पांडे याने चार जिल्ह्यांतून सर्वोच्च 194 गुण मिळवले आहेत. परीक्षेत 100 पेक्षा अधिक गुण मिळविलेल्या उमेदवारांची संख्या 1 हजार 133 आहे. गुरुवारपासून अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.

अशी होईल प्रवेश प्रक्रिया
विद्यार्थ्यांना 7 ते 13 जूनपर्यंत ऑनलाइन नोंदणी करायची आहे. त्यानंतर 8 ते 14 जूनदरम्यान ऑप्शन फॉर्म भरावे लागतील. या वेळी विद्यार्थ्यांना एकदाच राउंडसाठी जावे लागेल. त्यानंतर कागदपत्रांची तपासणी होऊन मॉक इंटरव्ह्यू होईल. सर्व प्रवेश प्रक्रियेस दोन महिने लागणार आहेत. सीईटी निकालाचे स्कोअर कार्ड 13 जून रोजी त्या त्या महाविद्यालयात मिळेल.


22 जुलैला सुरुवात
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात 22 जुलैला होणार आहे, तर औरंगाबादमध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी राउंड होतील, अशी माहिती उच्च् व तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. महेश शिवणकर यांनी दिली.

थोडा छंद, थोडा अभ्यास
जास्त ताण घेऊन अभ्यास केला नाही. नियोजन करून बेसिक कन्सेप्टवर लक्ष केंद्रित केले व त्यानुसार अभ्यास केला. त्यामुळेच यश मिळाले. याशिवाय म्युझिक आणि क्रिकेटच्या छंदालाही पुरेपूर वेळ दिला, असे नीरजने सांगितले. त्याचे वडील राजेंद्र पांडे यांचे मेडिकलचे दुकान आहे. आई सुनीता गृहिणी असून नीरजला आयआयटी पवई येथून इंजिनिअरिंगचे शिक्षण घ्यायचे आहे. तो सध्या जेईई अँडव्हान्स्ड निकालाची प्रतीक्षा करत आहे.