आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन् सुभाषबाबूंनी केली स्वत:च्या छायाचित्रावर सही, मोरेंनी चाळीसगाव स्टेशनवर घेतली होती भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फोटोवर भाऊसाहेब मोरे यांनी स्वसाक्षरी घेतली होती. हा फाेटाे प्रवीण मोरे यांनी जपून ठेवला आहे. - Divya Marathi
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फोटोवर भाऊसाहेब मोरे यांनी स्वसाक्षरी घेतली होती. हा फाेटाे प्रवीण मोरे यांनी जपून ठेवला आहे.
औरंगाबाद - आझाद हिंद सेनेचे संस्थापक सुभाषचंद्र बोस हे कोट्यवधी तरुणांचे प्रेरणास्थान. ‘जय हिंद’चा नारा देऊन त्यांनी तरुणांमध्ये देशप्रेमाचा संचार केला. अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने ते तरुणांचा आयकॉन ठरले होते. त्याच काळात ‘जयभीम’चा नारा देणारे हैदराबाद मुक्तिसंग्रामातील नेते भाऊसाहेब मोरे यांची १९३९ मध्ये चाळीसगावात रेल्वेमध्ये सुभाषबाबूंशी भेट झाली. काही मिनिटांच्या या भेटीत भाऊसाहेबांनी बाबूजींच्या फोटोवर त्यांचीच स्वाक्षरी घेतली. भाऊसाहेबांचे सुपुत्र प्रवीण मोरे यांनी हा फोटो जपून ठेवला आहे.
१९३८ मध्ये सुभाषचंद्रबोस अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले. मात्र, त्यांच्या निवडीवर महात्मा गांधी नाराज झाले. काँग्रेसमध्ये जहाल विरुद्ध मवाळ असा वाद उफाळून आला. १९३९ मध्ये पुन्हा एकदा सुभाषबाबूंना अध्यक्षपद बहाल करण्यात आले. परंतु पक्षांतर्गत नाराजांची संख्या वाढली. अशा परिस्थितीत काम करण्यापेक्षा सुभाषबाबूंनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पक्षात पद मिळवण्यासाठी चढाओढ सुरू असताना सुभाषबाबूंनी मिळालेले पद त्यागल्यामुळे ते तरुणांमध्ये कमालीचे लोकप्रिय झाले. त्यातच त्यांची जहालवादी भूमिका तरुणांमध्ये सळसळत्या देशभक्तीचा संचार करायची. ते तरुणांचे प्रेरणास्थान झाले. यामुळे तरुण त्यांचे फोटो खिशात ठेवू लागले.

चाळीसगावात झाली भेट
मूळ कन्नडचे भाऊसाहेब मोरे मराठवाड्यातील पहिले दलित पदवीधर होते. त्यांच्या निमंत्रणावरून कन्नड तालुक्यातील मकरमपूर (पूर्वीचे डांग्र) येथे ३० डिसेंबर १९३८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर सभा घेतली होती. या सभेत भाऊसाहेबांनी ‘जयभीम’चा नारा दिला होता. कन्नडपासून अवघ्या ४० किलोमीटरवर असलेल्या चाळीसगावात भाऊसाहेब तरुणांचे नेतृत्व करत होते. १९३९ मध्ये सुभाषबाबू हावडा एक्स्प्रेसने चाळीसगावमार्गे अकोल्याला हिंदी विद्यालयाच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. सुभाषबाबू येणार म्हणून भाऊसाहेब तरुणांसह स्टेशनवर पोहोचले. त्यांनी सुभाषबाबूंची भेट घेतली. आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. तुमच्याप्रमाणेच बाबासाहेबही पदाची अपेक्षा ठेवता देशसेवा, समाजसेवा करत अाहेत असे ते म्हणाले. यावर सुभाषबाबूंनी भाऊसाहेबांचे कौतुक केले. रेल्वेत गर्दी झाली होती. भाऊसाहेबांनी खिशातून सुभाषबाबूंचा फोटो काढला आणि त्यांना स्वाक्षरी देण्याची विनंती केली. सुभाषबाबंूनी स्वाक्षरी करत भाऊसाहेबांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. भाऊसाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी हा फोटो जिवापाड जपून ठेवला. सध्या भाऊसाहेबांचे चिरंजीव आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक प्रवीण मोरे यांच्याकडे हा फोटो आहे.

जयहिंद.. जयभीम
सुभाषबाबू येणार हे कळताच भाऊसाहेब चाळीसगावात पोहोचले आणि त्यांची भेट घेतली. मनामनात जाज्वल्य देशभक्ती असणारे थोर लोकच हे कार्य करू शकतात. सुभाषबाबूंनी ‘जय हिंद’चा नारा दिला, तर भाऊसाहेबांनी ‘जयभीम’चा नारा दिला. अशा दोन महान हस्तींच्या भेटीची आठवण जागवणारे असे हे दुर्मिळ छायाचित्र जिवापाड जपून ठेवले आहे.-प्रवीण मोरे