आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडून आलेले उमेदवार सहलीवर, आपल्याच पॅनलच्या उमेदवारांची वर्णी लावण्यासाठी खटाटोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद - तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊन एक दिवस उलटत नाही तोच सरपंचपदासाठी दावेदार असलेल्यांनी विजयी उमेदवारांच्या पळवापळवीला सुरुवात केली आहे. त्यामुळे गावागावात आता सरपंचपदाच्या चर्चेला उधाण आल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यातच पॅनलप्रमुखांनी तसेच काही पुढाऱ्यांनी आपल्या गटाचा सरपंच व्हावा व ग्रामपंचायत आपल्या ताब्यात यावी, याकरिता अनेक ठिकाणचे विजयी उमेदवार सहलीवर पाठवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खुलताबाद तालुक्यात सरपंचपदाची निवड चांगलीच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

खुलताबाद तालुक्यातील निम्म्यावर ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका ४ ऑगस्ट रोजी पार पडल्या. मतदान प्रक्रियेनंतर कोण निवडून येणार अशी चर्चा ठिकठिकाणी होताना दिसून आली. नंतर ६ ऑगस्ट रोजी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागल्याचे निकालावरून दिसून आले, तर काही पुढाऱ्यांनी आपला गड कायम राखल्याचेही पाहावयास मिळाले.

अयशस्वी पॅनलप्रमुखांनी पराभवानंतर विजयी उमेदवारांच्या पळवापळवीचा फंडा हाती घेतला आहे. दुसरीकडे विजयी उमेदवारांच्या पॅनलप्रमुखांनीही विजयी उमेदवारांना सहलीवर पाठवले आहे. अन्य पॅनलचे प्रमुखही हाच फंडा अवलंबताना दिसून येत आहेत.
सर्वसाधारण जागेसाठी रस्सीखेच
तालुक्यात २५ सरपंचपदांपैकी १६ जागांवर सर्वसाधारण प्रवर्गातील सरपंच विराजमान होणार आहेत. यात ७ पुरुष व ९ महिलांचा समावेश असणार आहे. तर अन्य ठिकाणी विविध राखीव प्रवर्गातील सरपंच होणार आहेत. सर्वसाधारण प्रवर्गातील सरपंचपदाच्या जागेसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यामुळे निवडून आलेल्या सदस्यांची पळवापळवी सुरू असल्याचे दिसून येत आहे.
बातम्या आणखी आहेत...