आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्डे दुरुस्तीच्या मार्गात अाता नव्या वादाचे विघ्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पंधरालाख औरंगाबादकरांना छळणाऱ्या खड्ड्यांवर ठोस निर्णय घेण्यासाठी मंगळवारी (६ सप्टेंबर) आयोजित करण्यात आलेली मनपाची सर्वसाधारण सभा नगरसेवक विरुद्ध आयुक्त वादात खर्ची पडली. खड्डे दुरुस्तीच्या मार्गात वादाचे नवे विघ्न आले. अधिकारी गेंड्याच्या कातडीचे आहेत असे एका नगरसेवकाने म्हणताच संतापलेल्या आयुक्त ओमप्रकाश बकोरियांनी ‘अशी भाषा सहन करणार नाही’ असे सांगत सगळ्या अधिकाऱ्यांसह सभागृह सोडले. हा सभागृहाचा अवमान आहे, असा आरोप करत नगरसेवकांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा इशारा दिला. माफी मागणार नाही असे सांगत आयुक्तांनीही ताठर भूमिका घेतली. शेवटी अायुक्तांविना पार पडलेली ही सभा तहकूब करण्यात आली.

सभेला प्रारंभ होताच सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी औरंगाबादची ओळख खड्ड्यांचे शहर अशी झाल्याचे सांगत खड्डे बुजवणे हे प्रशासनाचे काम असताना ते होत नसल्याने लोक त्याचे खापर नगरसेवकांवर फोडत आहेत असे म्हटले. आधीच्या आयुक्तांनी आणलेल्या डांबर प्लांटचे काम झाले असते तर ही वेळ आली नसती असे सांगत अधिकाऱ्यांनीच अाधीच्या आयुक्तांच्या निर्णयात खोडा घातल्याचा आरोप केला. यानंतर रावसाहेब आमले, मनिषा मुंडे, अंकिता विधाते, मनिषा लोखंडे, जयश्री कुलकर्णी, सीमा खरात, सायली जमादार, शोभा बुरांडे, सुमित्रा हाळनोर, शिल्पाराणी वाडकर यांनीही रस्त्यांची कामे होत नसल्याबद्दल तिखट शब्दांत नाराजी व्यक्त केली.
आयुक्तांना दिला फोटोंचा गठ्ठा : शिवसेनेचेसदस्य आपापल्या वाॅर्डांतील खड्ड्यांचे फोटो घेऊन आले होते. पण सभेचा विचका झाल्याने त्यांनी जंजाळ यांच्या नेतृत्वात आयुक्तांचे दालन गाठून फोटोचा गठ्ठा त्यांना दिला. त्यावर आयुक्तांनी आठ दिवसांत हे प्रश्न सोडवतो, असे आश्वासन दिले.

विभागीय आयुक्तांकडे तक्रार : महापौर तुपे, उपमहापौर इतर पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे बकोरियांची तक्रार केली. पीठासीन अधिकारी असलेल्या महापौरांची परवानगी घेता बकोरिया सभागृह सोडून गेले. पुढील सर्वसाधारण सभेसाठी जो अधिकारी सभेला उपस्थित राहून सभेच्या निर्णयांची अंमलबजावणी करेल असा अधिकारी नियुक्त करावा असे निवेदन दिले. सायंकाळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडेही आयुक्तांची तक्रार करण्यात आली.
हे मिळाले अाश्वासन : पावणेसहा वाजेच्या सुमारास सभा पुन्हा सुरू झाली. तेव्हा अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांच्यासह पाच अधिकारी सभागृहात आले. यानंतर विरोधी पक्षनेते अयुब जहागीरदार, भगवान घडामोडेंनी पुन्हा प्रशासनावर टीका केली. त्यावर पवारांनी गणेश विसर्जन मार्गावरील खड्डे तीन ते चार दिवसांत बुजवले जातील, असे सांगितले.

अशी पडली ठिणगी : एमआयएमचे जफर बिल्डर यांनी अधिकाऱ्यांची कातडी गेंड्याची झाली आहे असे विधान करताच बकोरिया भडकून अधिकाऱ्यांसह बाहेर पडले. ते पाहून नगरसेवकांनी आयुक्तांच्या माफीची मागणी केली. महापौर त्र्यंबक तुपेंनीे सभा जारी ठेवताच तासभर चर्चा खड्ड्यांवरून आयुक्तांकडे वळली. डांबर प्लँटचा निर्णय चूक होता का हे आयुक्तांनी सांगावे, असे महापौर उपमहापौर म्हणाले. मग विभागीय आयुक्तांकडे बकोरियांच्या वागणुकीची तक्रार करण्यासाठी सभा तहकूब झाली.
आयुक्तांविषयी : खड्ड्यांच्या विषयावर निर्णय झालाच पाहिजे असे ठरवून नगरसेवक आले होते. त्याला तोंड देण्याची हिंमत नसल्यानेच बकोरियांनी मानापमानाचे नाटक केले. आता मंगळवारच्या सभेचा अहवाल आधी नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांना पाठवू. मुख्यमंत्र्यांच्या कानावरही हा प्रकार घालू. मग सर्व गटनेत्यांशी चर्चा करून अविश्वास प्रस्ताव मांडू.

...आणि खड्ड्यांविषयी : जोपर्यंत खड्ड्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्ही सभा घेत राहू. प्रशासन काय करत आहे याचा आढावा घेवू. सगळे खड्डे बुजत नाहीत तोपर्यंत ही सभा अशीच तहकूब होत राहील.
बातम्या आणखी आहेत...