औरंगाबाद - एखाद्या कुटुंबात बाळ जन्माला येते तेव्हाचा आनंद शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. त्यात जर जुळे जन्मले तर आनंदाला पारावार उरत नाही. जोगदंड दांपत्यांना हा आनंद मिळाला खरा, पण त्यांच्या श्रुती आणि सृष्टी या दोन जुळ्या मुलींपैकी सृष्टीला दृष्टिदोष होता. वेळीच उपचार केल्याने मोतीबिंदूवर मात करता आली. सहा महिन्यांच्या चिमुकलीने डोळे उघडून सृष्टी पाहिली तो क्षण सुखावून जाणारा होता, अशी भावना जोगदंड दांपत्यांनी व्यक्त केली.
चार महिने झाल्यावर श्रुतीची नजर चोहोबाजूला फिरायची, ती प्रत्येक हरकतीला प्रतिसाद देत होती, पण सृष्टी मात्र तसे काही करत नव्हती. त्यामुळे तिच्या माता-पित्यांनी घाटीच्या नेत्रविभागात धाव घेतली. तेथील डॉ. वैशाली उने (लोखंडे) यांनी गेल्या १० वर्षांमध्ये बाल नेत्र शस्त्रक्रियांच्या माध्यमातून शहर, जिल्ह्यातील अनेक बालकांना जग पाहण्याची संधी दिली. नेत्र विभागप्रमुख डॉ. भास्कर खैरे यांच्या मार्गदर्शनात अनेक नवजातांच्या डोळ्यांचे परीक्षण आणि शस्त्रक्रियाही करण्यात आल्या. या दोघांनी सृष्टीवर उपचार करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांना एनआयसीयू विभागाचे प्रमुख डॉ. एल. एस. देशमुख यांनी मोलाची मदत केली.
दोन आठवड्यांच्या बाळांवरही शस्त्रक्रिया केली जाते. रुबेला व्हायरसचा परिणाम डोळ्यांवर होतो, असे निरीक्षण आहे. गर्भधारणेपूर्वी रुबेला लस घ्यायला हवी. शिवाय शस्त्रक्रिया लवकर व्हायला हवी. निरीक्षणाखाली थांबायला हरकत नाही. त्याचा धोका काहीच नाही. डॉ.अनिरुद्ध नळगीरकर, नेत्रविभाग प्रमुख,बजाज रुग्णालय
लवकर शस्त्रक्रिया करावी
आम्ही नवजात शिशूंची मोतीबिंदू, काचबिंदू, तिरळेपणावरील शस्त्रक्रिया करतो. अनेकदा पालक उपचारासाठी थांबतात, पण हे चुकीचे आहे. समस्येचे निदान झाले की लवकर शस्त्रक्रिया करणे हितकारक आहे. डॉ.वैशाली उने-लोखंडे, नेत्रशल्यचिकित्सक,घाटी.
निरीक्षण मंदावण्याची भीती
जन्मत:मोतीबिंदू असलेल्या बाळांना शस्त्रक्रिया केल्याशिवाय अजिबात दिसत नाही. निदान झाल्यानंतर शस्त्रक्रियेसाठी उशीर लावल्यास बाळाची निरीक्षण क्षमता मंदावण्याची भीती असते.
जन्मत: मोतीबिंदूची कारणे
- आईच्यापोटात असताना ऑक्सिजन मिळाला नसेल किंवा आईकडून येणार्या अन्नघटकांतून पोषण झाले नसल्यास
- गर्भधारणेनंतर तिसर्या, चौथ्या महिन्यात आई आजारी असेल, अधिक प्रमाणात औषधे घेतल्यास
- बाळाची स्वत:ची पोषण क्षमता विकसित नसेल
- वेळेआधीच जन्मलेल्या बाळांमध्ये काही वेळा मागील पडदा विकसित होत नाही
- डोळ्याच्या अवयवांना रक्तपुरवठा व्यवस्थित झाल्यास
- रुबेला व्हायरसमुळेही बाळाच्या डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो