आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘त्या’ नवजात शिशूचा गळा आवळून खून; आजीविरुद्ध गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - घाटीत जन्मलेल्या एक दिवसाच्या नवजात शिशूचा त्याची आजी मीराबाई साहेबराव पवार हिने गळा दाबून खून केल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली. गुरुवारी सकाळी या शिशूचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला होता. शुक्रवारी अहवाल प्राप्त झाला असून, बाळाचा खून केल्याचे त्यात स्पष्ट झाले आहे. बेगमपुरा पोलिसांनी आजीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
जालना जिल्ह्यातील घाणेवाडी येथील अनिता बाळू सोनवणे या गरोदर महिलेला प्रसूतीसाठी बुधवारी दुपारी घाटीत दाखल केले होते. दुपारी तिची मुदतपूर्व प्रसूती झाली होती. प्रसूतीनंतर तिला रक्तदाबाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे शिशू आजी मीराबाई सांभाळत होती. गुरुवारी सकाळी मीराबाईने बाळ हालचाल करत नसल्याचे डॉक्टरांना सांगितले. डॉक्टरांनी तपासले असता त्याचा गळा आवळून खून केल्याचा संशय व्यक्त केला होता. मृत्यू संशयास्पद वाटत असल्याने डॉक्टरांनी बेगमपुरा पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. पंचनामा केल्यानंतर शिशूचे शवविच्छेदन करण्यात आले. शुक्रवारी घाटी प्रशासनाने शवविच्छेदनाच्या अहवालावरून गळा आवळूनच खून झाल्याचे स्पष्ट केले. घाटी चौकीतील जमादार सुधाकर चौधरी यांच्या तक्रारीवरून मीराबाईविरुद्ध गुन्हा दाखल झाला. अनिता हिची तब्येत ठीक नसल्यामुळे मीराबाई तिची सेवाशुर्शूषा करत आहे. मीराबाईचा जबाब नोंदवल्यानंतर कारण समोर येईल.