आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाळण्यापूर्वी ‘त्या’ बालिकेच्या डोक्यावर जखमेची खूण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - वाळूजलगतच्या नवीन शिवराई गावात बालिकेला रॉकेल टाकून पेटवून देऊन खून करण्यात आला होता. त्या बालिकेची ‘डीएनए चाचणी’ केली जाणार आहे. घाटीतील उत्तरीय तपासणीत बालिकेच्या डोक्याला मार लागल्याचे निष्पन्न झाले आहे, तर तिचा मृत्यू भाजल्यामुळे झाल्याचे अहवालात नमूद असल्याचे पोलिस निरीक्षक अशोक कदम यांनी सांगितले.

दिलीप कर्जुले हे नवीन शिवराई गावात कुटुंबासह राहत असून ते कंपनीत वॉचमनचे काम करतात. रविवारी (6 ऑक्टोबर) रात्री घरातील झोळीमध्ये झोपलेली बालिका अचानक पहाटेच्या वेळी गायब झाल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी घराचा परिसर पिंजून काढल्यानंतर घरापासून शंभर फुटांवर तरवटांच्या झुडपांमध्ये बालिकेचा मृतदेह आढळून आला. तिला अंगावर रॉकेल टाकून पेटवून देण्यात आले होते. मात्र, ती पूर्णपणे जळाली नाही. घटनास्थळी पोलिसांना रॉकेलसाठी वापरलेली बिसलेरी पाण्याची रिकामी बाटलीही आढळून आली. पोलिसांनी तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात हलवला होता. बालिकेला जाळणार्‍या व्यक्तीच्या बोटांचे ठसे बाटलीवर असल्याची शक्यता असल्याने बाटली फिंगर प्रिंट तपासासाठी पाठवण्यात आली आहे.

सर्व बाजुंनी तपास
बालिकेचे माता-पिता, नातलग व लगतच्या रहिवाशांचे जबाब मंगळवारी दिवसभर पोलिसांकडून नोंदवले गेले. अंधर्शद्धेसारखा अघोरी प्रकारही तपासला जात आहे.

डीएनएसाठी रक्त नमुने
बालिकेच्या रक्ताची ‘डीएनए चाचणी’ करण्यात येणार असून त्यासाठी बालिकेची आई चंदा हिच्या रक्ताचे नमुने घेण्यासाठी पोलिस लवकरच तिला घाटी शासकीय रुग्णालयात नेणार आहेत. त्यानंतर ते रक्त नमुने मुंबईला पाठवून ‘डीएनए चाचणी’ करण्यात येणार आहे. त्यासाठी बालिकेचा व्हिसेराही राखून ठेवल्याचे पोलिस निरीक्षक अशोक कदम यांनी सांगितले.