आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संरक्षक नॉन बीटीकडे पाठ, कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा हल्ला; शेतकऱ्यांसमोर नवे आव्हान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कीड, रोग आणि गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कपाशी बीटी सोबत नॉन बीटी कपाशीची लागवड करणे आवश्यक होते. संरक्षण सापळा म्हणून नॉन बीटी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. मात्र, एकाही शेतकऱ्याने त्याची लागवड केली नाही. परिणामी आता गुलाबी अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. याचबरोबर करप्या रोगामुळे उभे कपाशीचे झाड वाळून जात असल्याने कापूस उत्पादक शेतकरी कमी पर्जन्यमान व कीड व रोग असे दुहेरी संकटात सापडले आहेत.
 
बीटी तंत्रज्ञान उपयुक्त ठरले आहे. कपाशी नगदी पीक आहे. चांगला भाव मिळतो. मान्सून, हवामान अनुकूल राहिल्यास कमी खर्चात भरघोस उत्पादनाची हमी असल्याने राज्यात एकूण क्षेत्रापैकी सुमारे दीडशे कोटी हेक्टरपैकी ४० टक्के क्षेत्रावर कापूस पिकवला जातो. मराठवाडा व विदर्भ तर कापूस उत्पादनाचे आगार बनले आहे. त्यानुसार यंदा ५० टक्क्यांवर कपाशीची लागवड पूर्ण होऊन शेतात कपाशी डोलू लागली आहे. मात्र, गत अनेक वर्षांपासून बीटी बरोबर नॉन बीटीची शंभर टक्के कापूस उत्पादन शेतकरी लागवडच करत नाहीत.  उत्पादन मिळत नसल्याने शेतकरी त्याची लागवड करत नाहीत. २० टक्के रान वाया जाते. यामुळे शेतकरी संरक्षक नॉन बीटी लागवडीकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहेत. यंदा तीच भयावह स्थिती आहे.

 तसेच एप्रिल, मे पर्यंत कपाशीचे झाड उभेच ठेवतात. परिणामी गुलाबी अळीला वर्षभर खाद्य मिळत असल्याने बीटी तंत्रज्ञान जीनपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. सुप्त अवस्थेतील गुलाबी अळी यंदा लवकरच म्हणजे फुलोरा अवस्थेत अटॅक करण्यास सुरुवात केली आहे.  त्याचा बंदोबस्त केवळ नॉन बीटी बियाणेच करू शकते. तेच शेतकऱ्यांनी केलेले नसल्याने दुष्काळजन्य स्थितीबरोबरच गुलाबी अळी व करप्या रोगाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. हे नुकसान कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी कर्मचाऱ्यांच्या मदतीने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना केले.
 
उत्पादन खर्चावर ठेवा अंकुश   
शेतकऱ्यांनी बियाणे, खते, कीटकनाशकांवर अवाजवी खर्च करू नये. कृषी विभागाच्या सल्ल्यानुसारच त्याचा संतुलित वापर करावा.  मावा, तुडतुडे, फुलकिडे, रस शोषणारी किड्यांचा बंदोबस्तासाठी महागडे कीटकनाशकापेक्षा बाजारातून पिवळा व निळा कागद, पांढरे ग्रीस आणून कागदाला ग्रीस लावून ते शेतात  पिका पेखा उंचावर आठ ते दहा ठिकाणी लावावेत. यापासून ५० टक्क्यांवर कीड व रोगाचा बंदोबस्त होईल.  यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन दिवेकर आणि गंजेवार यांनी केले आहे.

...तरच संरक्षण होईल  
२००२ मध्ये बीटी तंत्रज्ञान आले आणि कापूस क्रांती झाली आहे. कपाशीच्या संरक्षणासाठी ४५० ग्रॅम कपाशी पाकिटात १२० ग्रॅम नॉन बीटी (रेफ्यूज) चे पाकीट लागवडीसाठी दिले जाते. पाकिटात ते टाकणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याची लागवड करणे प्रत्येक शेतकऱ्यांचे प्रथम कर्तव्य आहे. तरच बीटी कपाशीचे कीड, रोग, अळीपासून संरक्षण होईल अन् भरघोस उत्पादन मिळेल. अशा पद्धतीने बीटी तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशा सक्त सूचना करण्यात आलेल्या आहेत.

अशी करा उपाययोजना  
आताही नॉन बीटीची लागवड होऊ शकते. दीड बाय दीड किंवा एक बाय एक अंतरावर लागवड केल्यास गुलाबी अळीचे नियंत्रण करता येऊ शकते. अळीची प्रतीकारक्षमता कमी करण्यास मोठा फायदा होईल व नुकसान टाळता येईल. फुलोरा अवस्थेत शेतीची पाहणी करावी. २० झाडे मोजावी. २ किंवा अधिक फुलांमध्ये बोंडअळी सापडल्यास आर्थिक पातळी दर्शवते. अशा वेळी क्लोरोपायरीफॉस २.५ मिली किंवा क्विनॉलफॉस २ मिली किंवा प्रोफेनोफॉस २ मिली प्रतिलिटर, दुसरा फवारा थायोडीकरब १.५ ग्रॅम, तिसरा फवारा सायपरमेथ्रीन १ मिली किंवा लाम्बडा सहल्योथ्रीन १ मिली प्रति लिटर शेवटच्या टप्प्यात फवारावा. पांढरी माशी, मावाचा प्रादुर्भाव आढळल्यास हा फवारा टाळावा. १२० दिवसांनी फवारणी करावी. वेळेत कपाशीचे रान खाली करून रब्बी पिके घ्यावीत.
बातम्या आणखी आहेत...