आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एप्रिलपासून नव्या बांधकामांवर 21.5 टक्के मालमत्ता कर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - येत्या आर्थिक वर्षापासून मालमत्ता करात तब्बल 21.5 टक्के वाढ करण्याचा मनपाचा प्रस्ताव असून या वाढीच्या माध्यमातून मनपाच्या तिजोरीत आणखी 20 कोटी रुपयांची भर पडणार आहे. मागील दोन वर्षे करवाढ केली नसल्याचे कारण सांगत ही वाढ केली जात असली, तरी त्याचा मोठा भुर्दंड नागरिकांना बसणार आहे.

औरंगाबाद शहरातील मालमत्तांना आकारण्यात येणारा मालमत्ता कर गेल्या दोन वर्षांत वाढवण्यात आला नव्हता. या आर्थिक वर्षासाठी मनपाचे मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट 100 कोटी रुपयांचे ठेवण्यात आले होते. आता करात 21.5 टक्के वाढ सुचवण्यात आल्याने मनपाच्या तिजोरीत 20 ते 21 कोटी रुपयांची भर पडणार आहे. 1 एप्रिल 2014 पासून होणार्‍या करवाढीसंदर्भातील प्रस्ताव उद्या होणार्‍या स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात येणार असून त्यावरून वादंग होण्याची शक्यता आहे.

सर्वांचाच खर्च वाढणार
मालमत्ता कराची वाढ केवळ निवासी मालमत्तांपुरतीच नसून निवासेतर म्हणजे सरकारी, खासगी कार्यालये, शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे, व्यावसायिक म्हणजे हॉटेल्स, दुकाने, दवाखाने, मॉल, लॉन्स, हॉस्पिटल्स, कर्मशियल पेड पार्किंग, औद्योगिक म्हणजे एमआयडीसी व औद्योगिक क्षेत्र यांच्यासाठीही मालमत्ता करात वाढ सुचवण्यात आली आहे.

टॉवरचाही कर वाढणार
शहरातील बीएसएनएल आणि इतर दूरसंचार कंपन्यांच्या टॉवरसंदर्भातही नव्या कर आकारणीत स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. टॉवरसाठी भाड्याने घेतलेल्या इमारतीतील जागेचे दरमहा भाडे किंवा भाडेपट्टा करारनाम्यानुसार यापैकी जे जास्त असेल, त्याप्रमाणे कर आकारण्यात येईल. दूरसंचार कंपन्यांच्या मालकीच्या जागेत असणार्‍या टॉवरसाठी तळाच्या क्षेत्रफळानुसार 900 रु. प्रतिचौरस मीटर प्रतिमाह दरानुसार कर आकारणी केली जाणार आहे. शिवाय धार्मिक स्थळाच्या जागेवर व्यावसायिक वापर होत असल्यास, त्यास व्यावसायिक दराने कर आकारणी केली जाणार आहे.

वाढ आवश्यक होती
मनपाचा खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसवण्यासाठी ही करवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. या करवाढीमुळे तिजोरीत 20 टक्के अधिक रक्कम येणार आहे. शिवाजी झनझन पाटील, मुख्य करवसुली अधिकारी

विरोध करणार
जे नागरिक प्रामाणिक कर भरतात त्यांच्याच माथी भुर्दंड टाकणारी ही करवाढ असून त्याला स्थायी समितीत कडाडून विरोध करण्यात येईल. समीर राजूरकर, स्थायी सदस्य

नागरिकांना फटका
नव्या रेडीरेकनरचा आधार घेत शहरातील चार विभागांनुसार नोंदणी महानिरीक्षकांनी जे दर निर्धारित केले आहेत, त्याचा आधार घेत प्रस्तावित मालमत्ता करवाढ निर्धारित करण्यात आली आहे. या चारही विभागांनुसार जुना मालमत्ता कर 8 ते 11 रुपये प्रतिचौरस मीटर प्रतिमाह दराने आकारला जात होता. आता तो 10 ते 13 रुपये प्रतिचौरस मीटर प्रतिमाह दराने आकारला जाणार आहे. याचा परिणाम म्हणून नागरिकांना मालमत्ता करासाठी 21.5 टक्के जादा रक्कम भरावी लागणार आहे.