आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद आयुक्तांच्या निगराणीत नवा सायबर सेल; प्रशिक्षणानंतर निवडणार पथक प्रमुख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरात वेगाने वाढणार्‍या सायबर क्राइमला वेसण घालण्यासाठी नवा सायबर सेल (विशेष पथक) निर्माण करण्याचा नवा निर्णय पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी केला आहे. सायबर गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलिस दलात तज्ज्ञ आणि प्रशिक्षित कर्मचार्‍यांचा तुटवडा असल्याने आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी विद्यमान सायबर सेलला अनेक र्मयादा येत आहेत. ही बाब हेरून पोलिस आयुक्तांनी विशेष पथकाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. हे पथक थेट आयुक्तांच्या निगराणीत काम करेल. सध्या अस्तित्वात असलेला सायबर विभागही यात विलीन केला जाईल.

नव्या सायबर सेलमधील अधिकारी, कर्मचारी निवडण्यासाठी महिनाभरापासून तयारी सुरू होती. त्यात एका महिला कर्मचार्‍यासह दहा जणांची निवड करण्यात आली. आयुक्तालयातील चार हजार अधिकारी, कर्मचार्‍यांतून मुलाखतीद्वारे दहा जणांची निवड झाल्यावर सर्वांना गणेशोत्सवानंतर पुणे सायबर सेलच्या कार्यालयात आणि मुंबईतील सायबर सेल पोलिस ठाण्यात दहा-दहा दिवस प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येईल. निवड झालेले सर्व कर्मचारी उच्चशिक्षित आहेत. येत्या महिनाभरात आयुक्तालय परिसरातील नवीन कार्यालयात अद्ययावत सॉफ्टवेअर बसवण्यात येईल. सायबर गुन्ह्यांमध्ये सध्या मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल साइटवर आक्षेपार्ह मजकूर, छायाचित्र अपलोड करूनधार्मिक भावना दुखावणे आणि महिलांची बदनामी करण्याचे प्रकार घडत आहेत. अशा प्रकरणांत आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांना जंगजंग पछाडावे लागते. अनेक वेळा खात्याबाहेरील तज्ज्ञाला बोलावून त्याच्याकडून माहिती घेऊन आरोपींचा माग काढावा लागतो. यात बराच कालापव्यय होत असून इतर गुन्ह्यांचा तपास रखडत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. जुने सायबर सेल सुरू झाल्यापासून आयुक्तांनी शहरवासीयांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी म्हणून आतापर्यंत 30 कार्यशाळा घेतल्या आहेत, तर पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव आणि गौतम पातारे यांनी शंभरहून अधिक परिसंवाद घेऊन याविषयी जागृती केली आहे.

सायबर क्राइमची व्याख्या
इंटरपोलने केलेले वर्गीकरण
अ हॅकिंग, बेकायदेशीरपणे संगणकात प्रवेश आणि व्हायरस पाठवणे
ब. काम्प्युटर्सशी संबंधित गुन्हे : ज्यात सरळ सरळ काम्प्युटरचा हल्ला नसतो पण गुन्हय़ामध्ये काम्प्युटरचा संबंध आलेला असतो.
क. नेटवर्क क्राइमडिजिटल मीडियाचा वापर करून गुन्हे करणे, इंटरनेट वापर करून गुन्हा करणे.

तपासावर आधारित सायबर क्राइम
अ. संगणक, नेटवर्कमध्ये अनधिकृत प्रवेश करून गुन्हा करणे. उदा हॅकिंग करणे.
ब. नेटवर्किंगचा वापर करून गुन्हा करणे. डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू क्राइम. उदा. फिशिंग, इंटरनेटवरील फसवणूक.
क. ई मेलचा वापर करून गुन्हा करणे. उदा. अश्लील किंवा धमकीचा ई मेल पाठवणे.
ड. इंटरनेट रिले चॅट क्राइम. उदा. वाइव्ह चॅटिंग करताना नारकोटिक ड्रग्जची विक्री करणे, चॅटिंग करताना अश्लील गोष्टींची प्रसिद्धी करणे.

पथक केवळ डाटा सोपवणार
सायबर सेलचे विशेष पथक आरोपींना पकडण्यासाठी प्रत्यक्ष काम करणार नाही तर गुन्ह्यांसंबंधीचा डाटा तपास अधिकार्‍यांना सोपवण्याचे त्यांचे काम राहील. संगणकासंबधी गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही बाब लक्षात घेऊन अधिकाधिक कर्मचारी तज्ज्ञ असावेत म्हणून सर्वांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाणार आहे. संजयकुमार, पोलिस आयुक्त.

मोबाइल ट्रॅकरद्वारे शोध
अद्ययावत साफ्टवेअर या पथकाकडे असणार आहे. त्यात फोनचा कॉल रेकॉर्ड मिळवण्यासह इतर ऑनलाइन डाटाही मिळवण्याचे काम हे पथक करेल. मोबाइल ट्रॅकरच्या माध्यमातून एखादी व्यक्ती कुठे जाते, दिवसभर काय करते याची इत्थंभूत माहिती काढण्यात येईल. याच माहितीच्या आधारे कारवाई होईल.

प्रशिक्षणानंतर प्रमुखाची नियुक्ती
पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, गौतम पातारे हे अधिकारी पूर्वीपासून सायबर सेलमध्ये कार्यरत आहेत. आता पोलिस उपनिरीक्षक डॉ. राहुल खटावकर यांचा पथकात समावेश करण्यात आला आहे. तसेच सायबर सेलमध्ये पूर्वी कार्यरत चार कर्मचारी व इतर विविध ठिकाणांहून आणखी तीन जणांची निवड करण्यात आली आहे. प्रशिक्षणानंतर पथकाच्या प्रमुखाची निवड केली जाणार आहे. पोलिस आयुक्त आणि पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी या कर्मचार्‍यांच्या मुलाखती घेऊन निवड केली आहे.