आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Government Started Farmer Company To Stop Suside

आत्महत्या रोखण्यासाठी राज्यात ४००, तर जिल्ह्यात १४ शेतकरी कंपन्या स्थापन करण्यास सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वाढत्या शेतकरी आत्महत्या रोखणे आणि दलालांच्या साखळ्या तोडण्यासाठी आता राज्य शासनाच्या पुढाकाराने शेतकऱ्यांच्या कंपन्या स्थापन केल्या जात आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात भिवधानोरा (ता. गंगापूर), भराडी (ता.सिल्लोड), पैठण, वाकेश्वर (ता. कन्नड) येथे याची सुरुवात झाली असून राज्यात ४०० कंपन्या स्थापन केल्या जात आहेत.

उत्पादक आणि ग्राहक यांच्यात थेट संबंध प्रस्थापित करून दलालांची साखळी तोडण्याच्या दृष्टीने कंपनींचा प्रयोग यशस्वी ठरेल, असा विश्वास कृषितज्ज्ञ व्यक्त करत आहेत. या उपक्रमाला जागतिक बँकेकडून प्रति कंपनीला ७.५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य मिळणार असून अडीच लाख रुपये कंपनीचा हिस्सा असेल.

राज्यात एक कोटी ३८ लाख शेतकरी आहेत. यापैकी ७८ टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यांच्याकडे पाच एकरपेक्षा कमी शेती आहे. १८ टक्के क्षेत्र सिंचनाखाली असून उर्वरित ८२ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे.

हवामानात बदल झाल्याने वर्षाआड दुष्काळ पडत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना एकत्रित आणून गट, संघ व नंतर कंपनी स्थापन होईल. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत सर्व कंपन्या स्थापन करण्याचे काम महाराष्ट्रभर सुरू झाल्याचे विभागीय कृषी सहसंचालक जनार्दन जाधव, कृषी पणन तज्ज्ञ पुष्कर विखे यांनी "दिव्य मराठी'ला सांगितले.

अडीचशे शेतकऱ्यांची कंपनी

आत्मा विभागामार्फत अनेक शेतकरी गटांचे एकत्रीकरण करून कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रासाठी पुणे व मराठवाड्यासाठी मुंबई येथे रीतसर नोंदणी होणार. त्यानंतर कंपनीला देय असलेले अनुदान प्राप्त होईल. एका कंपनीत कमीत कमी २५० तर जास्तीत जास्त एक हजार शेतकरी असतील. जिल्ह्यात पैठण येथे अशी एक कंपनी स्थापन करण्यात आल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडितराव लोणारे यांनी सांगितले.
असा होईल फायदा
- कंपनी स्थापन झाली, तर अनेक शेतकऱ्यांना एकत्र येऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येईल.
- मागणी लक्षात घेऊन उत्पादन घेता येईल. शिवाय उत्पादन खर्च कमी व अधिक दर्जेदार उत्पादन घेणे शक्य.
- ग्रेडिंग, प्रोसेसिंग, पॅकिंग व ब्रँडिंग केल्यानंतरच शेतमालाचे विक्री व्यवस्थापन
- कंपनी स्थापन केल्यानंतर दबाव गट स्थापन करून उत्पादनाला अपेक्षित किंमत मिळवता येणार
- ग्राहकांना मागणीप्रमाणे धान्य, भाजीपाला, फळे पुरवण्यात येतील

लुटीला चाप बसेल
^ कंपन्या स्थापन झाल्यामुळे शेतकरी व ग्राहक यांचा थेट संबंध निर्माण होऊन लुटीला चाप बसेल. कंपनीत जास्तीत जास्त नफा कमावण्यावर भर दिला जाणार असल्याने शेतकऱ्यांना यात अधिक फायदा मिळणार आहे.सतीश शिरडकर, उपसंचालक, आत्मा प्रकल्प
येथे काम सुरू
भिवधानोरा (ता. गंगापूर) सन्मित्र सीड्स प्रोड्युसर, कंपनी लिमिटेड, भराडी (ता. सिल्लोड)- सिद्धेश्वर सीड्स प्रोड्युसर, कंपनी लिमिटेड, वाकोद (ता. कन्नड)- वाकेश्वर प्रोड्युसर, कंपनी लिमिटेड, पैठण- प्रतिष्ठान, कंपनी लिमिटेड
शहरात अकरा केंद्रांमार्फत भाजीपाला विक्री
उत्पादित मालाला योग्य किंमत मिळावी यासाठी जिल्ह्यात पिकवलेला भाजीपाला आणि धान्य ११ केंद्रांमार्फत ठिकठिकाणी विक्री केला जातो. यातून दलालांच्या साखळीला चाप बसून शेतकऱ्यांच्या उत्पादनांना योग्य भाव मिळतो व ग्राहकांचाही फायदा होत आहे.