औरंगाबाद - तीन वर्षांच्या अथक प्रयत्नांतून कमी इंधनात चालणारे 'समजदार श्रीकांत' हे यंत्र तयार करणारे नवउद्योजक नामदेव अणेराव यांच्या कार्याचा गौरव करत चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरच्या (सीएमआयए) वतीने एक लाखांची मदत करण्यात आली.
फॅब्रिकेशन व्यावसायिक अणेराव यांनी स्वयंप्रेरणेने तयार केलेले हे यंत्र शेतकऱ्यांसाठी बहुमोल ठरणार असून त्यामुळेच सीएमआयएच्या नवप्रवर्तन कक्षाच्या (इनोव्हेशन सेल) माध्यमातून त्यांना गौरवण्यात आले. सीएमआयएच्या या कक्षाच्या माध्यमातून नवप्रवर्तन/संशोधन आणि विकासाशी संबंधित उपक्रम राबवले जातात. नव्या कल्पनांना मूर्तरूप देणारे पिंपळनेर (ता.,जि. बीड) या गावातील रहिवासी अणेराव यांना सीएमआयएने याच उपक्रमातून आर्थिक साहाय्य केले. या गौरव सोहळ्यास नवप्रवर्तन कक्षाचे सुनील रायठठ्ठा, मिलिंद कंक, अध्यक्ष अाशिष गर्दे, मानद सचिव प्रसाद कोकिळ कार्यकारिणी सदस्य डॉ.सुनील देशपांडे आदींची उपस्थिती होती.
अणेराव १५ वर्षांपासून फॅब्रिकेशनच्या व्यवसायात आहेत. आसपासची परिस्थिती पाहून त्यांनी कमी इंधनावर चालणारे यंत्र विकसित केले. चार एचपी इंजिनला गिअर बॉक्स जोडल्याने इंजिनची क्षमता १६ एचपीपर्यंत वाढली आहे. त्यासाठी उत्पन्नाच्या १५% रक्कम त्यांनी खर्च केली असून ‘समजदार श्रीकांत’ या नावाने यंत्राची नोंदणी करून पेटंटही घेतले आहे.
मोरे यांना केंद्राचा पुरस्कार
'सीएमआयए'ने यापूर्वी अनेकांना मदतीचा हात दिला. याच उपक्रमांतर्गत पैठण येथील विलास मोरे यांना 'सेफ्टी शेविंग रेझर’च्या संशोधनासाठी सहकार्य केले होते. या संशोधनासाठी मोरे यांना केंद्राचा पुरस्कारही मिळाला आहे. तो नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री अनंत कुमार आणि राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते मोरे यांना नुकताच प्रदान झाला.