आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या रूपातील सलीम अली सरोवराचे लोकार्पण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्थलांतरित पक्ष्यांचे व त्यांचा अभ्यास करणाºया तज्ज्ञांचे हक्काचे ठिकाण म्हणून शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले सलीम अली सरोवर ओळखले जाते. यात सांडपाणी सोडण्यात आल्याने हे नामशेष होते की काय, असा प्रश्न तमाम जनतेला पडत होता. मात्र, कधीतरी चांगले काम करणाºया पालिकेने सव्वाचार कोटी रुपये खर्चून याचा कायापालट केला असून ऐतिहासिक सरोवर आता नव्या रूपात शहरवासीयांसाठी खुले झाले आहे.

आजपासून पक्षीमित्रांना पक्ष्यांचा अभ्यास करता येईल, तर ही मंडळी कसा अभ्यास करतात अन् पक्षी कसे बागडतात, हे पाहण्याबरोबरच निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा आनंद काय असतो, याचा अनुभव घेता येईल. बुधवारी हे सरोवर सर्वांसाठी नि:शुल्क होते. गुरुवारपासून दरडोई दहा रुपये शुल्क आकारण्यात येणार असून सहलीसाठी येणाºया विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्कात सवलत दिली जाणार आहे. पुढील काही महिने पालिकाच या सरोवराची देखभाल दुरुस्ती करणार असून त्यानंतर मात्र त्याचे खासगीकरण होऊ शकते, असे पालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
सभापतींचा थयथयाट अन् शिरसाटांची पाठ...
पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांचे कार्यक्रम पत्रिकेवर नाव नसल्याने स्थायी समितीचे सभापती विजय वाघचौरे यांनी सोमवारी पालिकेत थयथयाट केला. त्यानंतर महापौरांच्या आदेशावरून दुसरी कार्यक्रम पत्रिका काढण्यात आली. त्यावर शिरसाट यांच्या नावाचा समावेश करण्यात आला; पण शिरसाट यांनी बुधवारच्या दोन्हीही कार्यक्रमांकडे पाठ फिरवली. सभापती वाघचौरे मात्र उपस्थित होते.

म्हशी हाकलल्या पुन्हा आल्या चार वर्षांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या कामाची पाहणी केली होती. हा प्रकल्प चांगला होईल, असा विश्वास व्यक्त केला होता. त्याच वेळी या तलावात म्हशी चरताना दिसल्या होत्या. शिवसेनेच्याच एका नगरसेवकाच्या या म्हशी असून यापुढे त्या दिसणार नाहीत, अशी ग्वाही प्रशासनाने दिली होती. मात्र, आज त्या म्हशी तशाच चरताना दिसल्या. त्यांना येथून हटवून गावाबाहेर नव्याने होणाºया गोठ्यात नेण्यात यावे, असे आदेश खासदार खैरे यांनी दिले. त्यानुसार काही वेळ म्हशी तेथून गायब झाल्या; पण लगेच त्या पुन्हा प्रगटल्या.
सलीम अली संवर्धन समितीचा विरोध
महापालिकेने सलीम अली सरोवराचे लोकार्पण करताच सलीम अली संवर्धन समितीने मनपाचा निषेध केला आहे. संवर्धन समितीने वर्षभरापूर्वी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकवरील निर्णय प्रलंबित असताना सरोवराचे लोकार्पण करण्यात आले, अशी टीका संवर्धन समितीचे डॉ. किशोर पाठक यांनी केली आहे.

लोकार्पण कार्यक्रम सुरू असतानाच समितीचे सदस्य तेथे पोहोचले. खासदार चंद्रकांत खैरे यांची भेट घेऊन समितीने लोकार्पण समारंभास हरकत घेतली. मनपाने न्यायालयाच्या यापूर्वीच्या निर्णयाचा सोयीचा अर्थ लावून लोकार्पण केले याकडे समितीने लक्ष वेधले. त्यावर खैरे यांनी गुरुवारी आपण बैठक घेऊन चर्चा करू, असे आश्वासन समितीला दिले. या वेळी समितीचे सदस्य पंकज शक्करवार, अरविंद पुजारी, मिलिंद गिरधारी, सुभाष राठोड, सुश्रुत करमरकर उपस्थित होते.