आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • New Plan For Siddhartha Snake Garden For Development

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिद्धार्थ उद्यानातील सर्पालय हैदराबादच्या धर्तीवर सजवणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सिद्धार्थ उद्यानात सर्पालयाची जागा अत्यंत तोकडी आहे. तेथे नैसर्गिक वातावरण नाही. त्यामुळे सापांचा जीव गुदमरत आहे. त्यामुळे हैदराबादच्या धर्तीवर सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात सर्पालयाचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी एमआयटी कॉलेजच्या आर्किटेक्चर विभागाकडून आराखड्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे.

सर्पालयासाठी सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात 15 गुंठे जागा आहे. या जागेवर सापांच्या प्रजातीनिहाय 50 ते 400 स्क्वेअर मीटरचे 16 गाळे आहेत. पण त्यामध्ये छोटी झुडपे, खडक, खंदक, पाण्याचे झरे, हिरवळ, वेली, जंगलाचे वातावरण नाही. अपुरी जागा आणि एकाच गाळ्यात दहा ते बारा साप ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे सापांना नैसर्गिकरीत्या संचार करता येत नाही आणि नैसर्गिक वातावरणही मिळत नाही. परिणामी सर्पालयातील सापांची चंचलता दिवसेंदिवस मंदावत जाते. ही बाब सेंट्रल झू अँथॉरिटी समितीने मार्च महिन्यात केलेल्या पाहणीत निदर्शनास आली होती. या समितीने तत्काळ प्राणिसंग्रहालयासाठी मास्टरप्लॅन तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सिंह, वाघ, बिबट्या, हरिण आदी प्राण्यांच्या संचारासाठी कॅनडाच्या धर्तीवर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

आराखडा मिळणार कधी?
हैदराबाद महापालिकेने तेथील सर्पालयात सापांसाठी नैसर्गिक वातावरण निर्माण केले आहे. यात सापांना निवारा म्हणून झुडपे, पाण्याचे झरे, खडक आदी सुविधा निर्माण केल्या आहेत. या सर्पालयाच्या धर्तीवर सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील सर्पालयाचा विकास करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एमआयटी कॉलेजच्या आर्किटेक्चर विभागाने तीन महिन्यांपूर्वी यासंदर्भात संपूर्ण माहिती घेतली आहे. आराखडा तयार करण्याचे काम हाती घेऊन तीन महिने उलटले आहेत. पण त्यांनी अद्याप अंतिम आराखडा सादर केलेला नाही. डॉ. नाईकवाडी यांनी याबाबत विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही, असे समजते. त्यामुळे आराखडा मिळणार कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आराखडा लवकर मिळत नसल्याने सर्पालयाच्या विकासाचे काम सध्या तरी थांबले आहे. आराखडा सादर केल्यानंतर तीन महिन्यांच्या आत कामाच्या निविदा काढून मॉडर्न सर्पालय निर्माण करण्याचे काम हाती घेतले जाईल, असे डॉ. नाईकवाडी यांनी सांगितले.

प्रजातीनिहाय सापांची संख्या
गाळा सापांची जात आणि संख्या


1 विषारी 14 नाग
2 मांडूळ (बिनविषारी )
3 12 धामण (बिनविषारी )
4 अजगर (बिनविषारी )
5 अजगर
6 अजगर
7 तीन मण्यार (विषारी )
8 एक घोणस (विषारी)
9 चार गवत्यासाप (बिनविषारी )
10 चार धूळनागिणी (बिनविषारी )
11 दोन कंदोर (बिनविषारी )
12 बारा धामण (बिनविषारी )
13 घोरपड
14 चौदा विषारी नाग (7 नागिणी, 7 नाग)
15 पाच तस्कर (बिनविषारी )
16 चार कोब्रा, चार नागिणी

असे असेल सर्पालय
सर्पालयाच्या मुख्य द्वाराजवळ प्रजातीनिहाय सापांची माहिती देणारा फलक, सात फणा असलेल्या नागाच्या चित्राजवळ महादेवाची मूर्ती बसवण्यात येणार आहे. जुन्या बांधकामाला आर्किटेक्टच्या मदतीने नवीन लूक दिला जाणार आहे. सर्पालयात छोटी झुडपे, खडक, खंदक, पाण्याचे झरे, हिरवळीचे बेट, वेली, जंगल व नैसर्गिक वातावरणनिर्मिती केली जाणार आहे. एमआयटी कॉलेजच्या आर्किटेक्ट विभागाचे प्रा. दीपाली हेजीब, विभागप्रमुख प्रा. म्हस्के आणि चार विद्यार्थी यासाठी परिश्रम घेत आहेत.


हा तर गुन्हाच!
1972 च्या वन्यजीव कायद्याप्रमाणे प्राण्यांना कोंडून ठेवणे, त्यांना हुसकावणे, त्यांची हेळसांड करणे गुन्हा आहे. तत्काळ सेंट्रल झू अँथॉरिटीने केलेल्या सूचनांचे, प्लॅनचे काम सुरू करणे गरजेचे आहे. नाग हा शेड्यूल एकचा प्राणी आहे. त्या दृष्टीने सापांची निगा राखावी. ती होत नसेल तर त्यांना जंगलात सोडून द्यावे. दिलीप यार्दी, पर्यावरणमित्र

नियमांचे पालन करा
सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात प्राण्यांसाठी किती जागा असावी, त्यामध्ये काय सोयी-सुविधा असाव्यात, त्यांना खाद्य कोणते दिले जावे याबाबत सेंट्रल झू अँथॉरिटीने नियम घालून दिलेले आहेत. त्यांचे तंतोतंत पालन करावे. प्रा. विजय दिवाण, वन्यजीवमित्र


पोटभर खाद्य दिले जात नाही
सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील सापांना वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य देणे आवश्यक आहे. पण बेडूक आणि उंदीर वगळता सापांना दुसरे अन्न दिले जात नाही. तेही पोटभर मिळत नाही. त्यामुळे सापातील चंचलता नष्ट झाली असून ते मरगळलेल्या अवस्थेत पडलेले असतात. त्यामुळे पर्यटकांना साप पाहून भीती वाटण्यापेक्षा दु:ख वाटते. त्यामुळे तत्काळ मॉडर्न सर्पालयाचा विकास होणे गरजेचे आहे. डॉ. किशोर पाठक, पक्षी व सर्पमित्र