आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संथ ब्रेल लिपी आता गतिमान !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज- अंधांसाठी वरदान ठरलेली ब्रेल लिपी हाताने लिहिणे मोठे कष्टप्रद ठरते, पण आता संगणकाद्वारे ही 6 टिंबांची ब्रेल लिपी मुद्रित करता येत असल्याने ती गतिमान झाली असून अंधांच्या शिक्षणातील मोठी अडचण दूर झाली आहे.

ब्रेल लिपी कागदावर मुद्रित करण्यासाठी अंधांना खूप वेळ लागतो. हे काम कष्टदायी आहे. त्यामुळे ब्रेल लिपीत मराठी व इंग्रजी या भाषांतील पुस्तके मोठय़ा प्रमाणात येऊ शकली नाहीत. मात्र, आता संगणकाच्या व विशेष प्रिंटरच्या साहाय्याने ब्रेल लिपी मुद्रित करता येणे सहज शक्य झाले असल्याने पुस्तके व ग्रंथ छपाईच्या कामात अंधांना मोठी मदत झाली आहे. वाळूजच्या राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र द्वारा संचालित अंध मुलींचे प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्रातील दृष्टीदुर्बल असलेल्या संगणक प्रशिक्षिका सारिका संखे या अद्ययावत तंत्रज्ञानाबाबत म्हणाल्या, अंधांना ब्रेल लिपीतून शिक्षण घेण्याशिवाय पर्याय नाही, पण ती हाताने कागदावर लिहिण्यास इतर भाषांपेक्षा खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे अंध महाविद्यालयीन विद्यार्थी आतापर्यंत ब्रेलर, या टायपिंग मशीनचा उपयोग करीत होते.

शिक्षणात मोठी मदत
अंधांना ब्रेल लिपीतूनच शिक्षण घ्यावे लागते. ब्रेल लिपीत फक्त शालेय पुस्तकेच उपलब्ध आहेत. महाविद्यालयीन पुस्तके छापलीच गेली नाहीत, पण आता संगणकाच्या मदतीने ब्रेल वेगवान झाली असून मोठी पुस्तके छापली जातील. सारिका संखे, अंध संगणक प्रशिक्षिका.

अँम्बॉसर प्रिंटरमुळे शक्य
राष्ट्रीय दृष्टिहीन संघ (महाराष्ट्र) द्वारा संचालित ब्रेल पब्लिशिंग सेंटर, आळंदी (पुणे) येथील मुद्रणालयाचे व्यवस्थापक गजानन मगर म्हणाले, स्वित्झर्लंड इंडेक्स कंपनीने तयार केलेल्या अँम्बॉसर या पिंट्ररमुळे आता ब्रेल लिपी प्रिंट करणे शक्य झाले आहे. कागदाच्या दोन्ही बाजूंना ती मुद्रित करता येते. यासाठी पोस्टकार्डच्या जाडीएवढया कार्डशिटचा वापर करावा लागतो. साधारण एका तासात शेकडो पेजेस या तंत्रज्ञानामुळे छापणे शक्य झाले आहे. इंग्रजी, मराठी व गुजराती भाषेतही पुस्तके छापण्याचे काम आळंदी येथे सुरू आहे.