आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Technology Instrument In Aurangabad Hospitals

‘अपग्रेड’ होतेय आरोग्यसेवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहरातील अनेक छोट्या-मोठय़ा खासगी, ट्रस्ट व धर्मादाय रुग्णालयांमध्ये नवनवीन विभाग सुरू होत असून जागतिक दर्जाची वेगवेगळी उपकरणे दाखल झाली आहेत, तर काही येत्या महिना-दोन महिन्यांत दाखल होत आहेत. त्यातच दर सहा महिन्यांत नवीन हॉस्पिटल शहरामध्ये सुरू होत आहे. पूर्वीची रुग्णालये नवीन जागेत व नवीन उपकरणांनी सज्ज होत असल्याचेही चित्र आहे. पुढील पाच वर्षांत शहरात अजून मोठी रुग्णालये सुरू होणार, शिवाय अद्ययावतीकरणाचा ट्रेंडही सुरूच राहणार आहे.

शहरातील रुग्णसंख्या वाढतच आहे आणि मराठवाडा, विदर्भ, खान्देशातील सुमारे दहा ते बारा जिल्ह्यातील रुग्णही उपचारासाठी दररोज दोन ते तीन हजार शहरात येतात. त्यामुळे अधिकाधिक संख्येतील रुग्णांना अत्याधुनिक व दज्रेदार वैद्यकीय सेवा देण्यासाठी जागेची कमतरता जाणवत आहे. त्यातच नवीन रुग्णालये सुरू होत आहे किंवा नव्या जागेत व नवीन उपकरणांसह नवीन सेटअप दिसून येत आहेत. त्यातही रुग्णांसह सर्व दृष्टीने सोयीचे ठरत असल्यानेच वैयक्तिक क्लिनिक सुरू करण्यापेक्षा चार तज्ज्ञांनी एकत्रित येऊन रुग्णालय सुरू करण्याचा ट्रेंड आहे.

पुणे-मुंबई-नाशिकपेक्षा शहरात जागेचे भाव तुलनेने कमी असल्याने आणि ‘मेडिकल टुरिझम’ अशी ओळख निर्माण होत असल्याने भविष्यात अपोलो, वोक्हार्ट, फोर्टिस, लीला ग्रुपची रुग्णालये सुरू होऊ शकतात, असे ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चे शहराध्यक्ष डॉ. अशोक शेरकर यांनी सांगितले. शहरामध्ये बहुतेक सर्व वैद्यकीय शाखा आता सुरू झाल्या असल्याने ‘मेडिकल हब’ अशी औरंगाबादची ओळख निर्माण झाली आहे. त्याबरोबरच नजीकच्या भविष्यात ‘मेडिकल टुरिझम’ही मोठय़ा प्रमाणावर वाढण्याची आशा आहे.

सध्या दर सहा महिन्याला शहरात एखादे नवीन रुग्णालय उभे राहत असून येत्या पाच वर्षांपर्यंत ‘अपग्रेडेशन’चा ट्रेंड असाच सुरू राहणार असल्याचे ‘माणिक हॉस्पिटल’चे वैद्यकीय संचालक डॉ. उल्हास कोंडपल्ले यांनी सांगितले.

औरंगाबादमध्ये जागतिक दर्जाची उपकरणे
शहरातील विविध रुग्णालयांमध्ये अशी अनेक उपकरणे आहेत, जी अमेरिका किंवा युरोपनंतर देशामध्ये पहिल्यांदा शहरात दाखल होत आहेत. त्याचबरोबच जागतिक दर्जाची उपकरणे किंवा कॅथलॅब विविध रुग्णालयांमध्ये इन्स्टॉल करण्याचाही प्रवाह शहरात प्रामुख्याने दिसून येत आहे. हे अद्ययावतीकरण रुग्णांसाठी हिताचे ठरणार, असेही सर्वच तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, रुग्णालयातील उपचार व चाचण्यांच्या दरांवर नियंत्रण हवे, असे आग्रही मत घाटीतील डॉक्टरांनी व्यक्त केले.

रुग्णांच्या गरजेपेक्षा खाटा अजूनही कमीच
शहरात 14 लाख लोकसंख्येमागे किमान 2210 खाटा असणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात एक हजार लोकांच्या वाट्याला एक खाटसुद्धा येत नाही, असे निरीक्षणही डॉ. कोंडपल्ले यांनी नोंदवले, तर शहरातील एकूण अतिदक्षता खाटांची (आयसीयू) संख्याही अपेक्षेपेक्षा खूप कमी असल्यानेच आणखी पाच-दहा रुग्णालयांची गरज असल्याचे मत युनायटेड सिग्मा हॉस्पिटलचे संचालक डॉ. उन्मेष टाकळकर यांनी व्यक्त केले. तसेच अचूक निदानासाठी नवीन आधुनिक उपकरणे आवश्यक असून काही काळाने ती बदलणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.