आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Ward Issue In Satara Deolai Area In Aurangabad

वॉर्ड वाढण्यासाठी आता लोकसंख्येची अडचण, प्रशासनाची वाॅर्ड तयार करण्याची चिंता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा-देवळाईनगर परिषदेऐवजी या परिसराचा औरंगाबाद महानगरपालिकेत समावेश करण्यात आला असला तरी येथील लोकसंख्येनुसार येथे चार वॉर्ड होऊ शकतात. या चार वॉर्डांमुळे महानगरपालिकेचे वॉर्ड ११७ होतात. मात्र, मनपा ११५ पेक्षा जास्त वॉर्ड करू शकत नसल्याने आता प्रशासन निवडणूक आयोगाच्या आदेशाची प्रतीक्षा करत आहे.

सध्या महानगरपालिकेचे सातारा-देवळाई वगळून ११३ वॉर्ड झालेले आहेत. यात महानगरपालिकेची लोकसंख्या साडेअकरा लाख आहे. सातारा-देवळाईतील ५२ हजार लोकसंख्येचा समावेश शहरात झाल्याने शहराची लोकसंख्या १२ लाख झाली. या लोकसंख्येसाठी केवळ ११५ वॉर्डच करण्याची तरतूद घटनेमध्ये आहे. नुकतेच नवे ११३ वॉर्ड बनवताना प्रत्येक वॉर्डात बारा ते साडेबारा हजार लोकसंख्या लक्षात ठेवून वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. त्यातच सातारा-देवळाईतील ५२ हजार नागरिक लक्षात घेतल्यास त्यांच्यासाठी एकूण चार वॉर्डांची तरतूद करावी लागेल. त्यामुळे शहराचे ११३ आणि सातारा-देवळाईचे चार असे ११७ वॉर्ड होतात.
मात्र, ११५ पेक्षा जास्त वॉर्ड करू शकत नसल्याने मनपा प्रशासनासमोर संकट उभे राहिले आहे. त्यातच निवडणूक आयोगाकडून कोणतेच आदेश देण्यात आलेले नाहीत. मनपात निवडणूक विभागाकडून केवळ पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या निवडणुकीचा दुसरा टप्पा पार करण्याचे काम उरकण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे सातारा-देवळाई निवडणुकीचे काम थांबवण्यात आले असून त्यावर हरकती, दावे घेण्यात येत आहेत.

दोन वॉर्डांचा पर्याय

सर्ववॉर्डांची पुनर्रचना करण्याची योजना आखल्यास पुन्हा मनपाला पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. यासाठी सहा महिन्यांपेक्षा जास्तीचा अवधी लागू शकतो. दुसरीकडे दोनच वॉर्ड करून आसपासच्या वॉर्डांत विभागल्यास आरक्षणासह कोणतीच प्रक्रिया पुन्हा करण्याची गरज पडणार नाही. नवीन होणारा वॉर्ड हा सामान्यत: सर्वसाधारण ठेवण्यात येतो. त्यामुळे या दोन्हीपैकी एका वॉर्डात सर्वसाधारण, तर दुसरा सर्वसाधारण महिला अथवा इतर मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव ठेवता येऊ शकतो.

लोकसंख्या वाढू शकते

शहरातीलसर्व वॉर्ड नव्याने बनवून लोकसंख्या वाढवण्याचे काम केल्यास वेळ जास्त लागून सर्व कामे वाढू शकतात. त्यामुळे सातारा देवळाईलगत असलेले विटखेडा, देवानगरी, मयूरबन कॉलनी, शिवाजीनगर, भारतनगर या भागात काही प्रमाणात लोकसंख्या वाढवून सातारा देवळाई हे दोनच मोठे वॉर्ड तयार करण्याचा पर्यायही मनपासमोर आहे.

पुन्हा वॉर्डरचनेचा पर्याय

सातारा-देवळाईशहरात आल्यास तयार करण्यात आलेल्या बारा ते साडेबारा हजार लोकवस्तीचा एक वॉर्ड ही संकल्पना बदलावी लागेल. तेरा हजार लोकसंख्येचा एक वॉर्ड तयार करावा लागेल. त्यासाठी पुन्हा सर्व वॉर्डरचना आणि आरक्षण नव्याने करावे लागेल. असे केल्यावरच प्रशासनाची घडी नीट बसून नियमाप्रमाणे वॉर्ड तयार होतील.