आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • New Ward Structure, New Reservation In Aurangabad Municipal Corporation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी वॉर्डरचना, नवे आरक्षण- लोकसंख्येनुसारच ठरेल आरक्षित वॉर्ड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वॉर्ड आरक्षणाची आतापर्यंतची चक्राकार पद्धत आता बाद होत असून नवीन वॉर्ड रचनेनुसार होणा-या मनपा निवडणुकीत लोकसंख्येचा निकष काटेकोर पाळूनच आरक्षित वॉर्ड निश्चित केले जाणार आहेत. तशाच प्रकारे आरक्षणाची सोडत घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने महापालिकेला दिल्या आहेत.

९९ वॉर्डांची औरंगाबाद महापालिका आता ११३ वॉर्डांची होत असून त्यासाठी वॉर्डांची पुनर्रचना करण्यात आली आहे. नवीन वॉर्डरचना काय आहे हे अद्याप जाहीर होणे बाकी आहे. आरक्षण चक्राकार पद्धतीने घेण्याची पद्धत असली तरी आता नव्याने रचना होत असल्याने लोकसंख्या हाच एकमेव निकष लावला जाणार आहे. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आरक्षित होऊ शकणा-या वॉर्डांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे जुनी आरक्षण रचना व त्या वेळचे प्रमाण याचा विचार न करता नवीन वॉर्डातील लोकसंख्येचे प्रमाणच ग्राह्य धरण्यात येणार आहे.

मुंबईत निवडणूक आयोगाने बोलावलेल्या बैठकीत तशा आशयाचे स्पष्ट निर्देश मनपाला दिले आहेत. त्यामुळे ७ फेब्रुवारी रोजी होणारी सोडत ही शहराच्या राजकीय नकाशाची उलथापालथ करणारी राहणार असल्याची चिन्हे आहेत. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, उपायुक्त किशोर बोर्डे यांनी हजेरी लावली. दुसरीकडे मनपाने निवडणुकीची प्रशासकीय पातळीवर जोरात तयारी चालवली असून सोडतीच्या तयारीला वेग आला आहे. शिवाय मनपाचे पावणेसहाशे कर्मचारी निवडणूक कामाला लागणार आहेत.

प्रशांत देसरडांचा आक्षेप
भाजप नगरसेवक प्रशांत देसरडा यांनी वॉर्ड रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्याआधी आरक्षणाची सोडत काढण्यास आक्षेप नोंदवला आहे. आधी आरक्षण सोडत काढल्यावर नंतर प्रभाग रचनेवर आक्षेप व हरकती मागवल्या जाणार आहेत. त्यात जनगणनेचा एखादा ब्लाॅक कमी जास्त झाल्याचे समोर आल्यावर आरक्षण कोणत्या पद्धतीने दिले जाणार आहे याचा बोध होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे सात तारखेची सोडत रद्द करून नंतर ती घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.