आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरामध्ये नंबर लागेना म्हणून विद्यार्थ्यांचे ‘खेड्याकडे चला’, तिढा अकरावी प्रवेशाचा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे दुसऱ्या फेरीतही अनेक विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला नाही. पहिल्या फेरीतील विद्यार्थीही अद्याप प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. या परिस्थितीमुळे आवडीची शाखा मिळावी, पण कॉलेज करायची कटकटच नको म्हणून विद्यार्थ्यांनी आपला मोर्चा खेड्यांकडे वळवला असून ते शहराजवळच्या ग्रामीण भागातील कॉलेजांत प्रवेश घेत आहेत. एवढेच नाही तर कधी नव्हे ते ग्रामीण भागातील प्रवेश हाऊसफुल्ल झाले आहेत.
 
यंदा औरंगाबादेत अकरावीचे प्रवेश प्रथमच ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. पहिल्याच गुणवत्ता यादीतील त्रुटी आणि तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या दुसऱ्या गुणवत्ता यादीतही अनेक विद्यार्थ्यांची नावे नाहीत. त्यामुळे “सर, या फेरीतही माझे नाव नाही, आम्हाला प्रवेश, हवी ती शाखा मिळेल की नाही,’ असे प्रश्न घेऊन विद्यार्थी- पालक कॉलेज शिक्षण विभागाचे उंबरठे झिजवत आहेत. दुसरीकडे महापालिका हद्दीपुरतीच मर्यादित असलेली ही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया शहराशेजारच्या ग्रामीण भागातील कॉलेजच्या चांगलीच पथ्यावर पडली आहे. हवी ती शाखा मिळावी, कॉलेजात नियमित जाण्याची कटकटही नाही म्हणून शहरातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात प्रवेश घेतले आहेत. ग्रामीण भागातील कॉलेजचे प्रवेश फुल्ल झाले आहेत, तर शहरातील अनेक कॉलेजांतील मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. विद्यार्थ्यांची अलॉटमेंट कमीअधिक प्रमाणात होत असल्याने अनेकांना विद्यार्थ्यांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचेही शाळेशी संलग्नित असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांचे म्हणणे आहे.
 

व्यवस्थापन कोट्यावर गदा
आपल्याला हवे तसे विद्यार्थी घेता यावेत म्हणून व्यवस्थापन कोटा आणि सेल्फ फायनान्सच्या आशेवर असणाऱ्या कॉलेजांच्या आशेवर पाणी फिरले अाहे. दुसरी प्रवेश फेरी पूर्ण होईपर्यंत व्यवस्थापन कोट्याचे प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली असून या कोट्याचे ऑप्शन ब्लॉक केले आहे.
 
भिऊ नका, चौथ्या फेरीनंतर संधी
गुणवत्तायादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांनी भीती बाळगण्याची गरज नाही. चौथ्या फेरीनंतरही रिक्त जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे पहिली पसंती होती परंतु प्रवेश घेतला नाही, अशा विद्यार्थ्यांना चौथी फेरी होईपर्यंत थांबावे लागेल, अशी माहिती सहायक उपसंचालक भास्कर बाबर यांनी दिली.

अतिरिक्त होण्याची भीती
काही कॉलेज हाऊसफुल्ल तर काही ठिकाणी विद्यार्थी शोधण्याची वेळ आली आहे. दिलेल्या प्रवेश क्षमतेत जागा भरल्या गेल्या नाहीत तर पुन्हा शिक्षक अतिरिक्त होतील. त्यांच्या नोकरीवर गदा येईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
 
अशी आहे पुढील प्रक्रिया
दुसऱ्याफेरीत अलॉटमेंट झालेल्या विद्यार्थ्यांनी २४ जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करायचे आहेत. यानंतर २५ जुलै रोजी रिक्त जागांचा तपशील दुसऱ्या फेरीचे कट ऑफ संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. २६ जुलै रोजी विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम बदलणे तसेच फॉर्म यापूर्वी भरलेला नसले तर भाग एक आणि भाग दोन पूर्ण भरता येईल. २९ जुलै रोजी केंद्रीय प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...