आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 चोरटे पळाले, ग्रामस्थांनी एकाला पकडून बदडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - तालुक्यातील पिंपळवाडी (पिराची) येथे चार चोरट्यांनी धुमाकूळ घालत दोन दुकानांत चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्याला ग्रामस्थांनी शिताफीने पकडून चांगलाच चोप दिल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.  बुधवारी रात्री ही घटना घडली असून तीन चोरटे पसार झाले. येथील किराणा दुकान व कापड दुकानात मध्यरात्री चार चोरट्यांनी धुमाकूळ घालून दोन नागरिकांना  मारहाण करत ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ठाकूरसिंग अमरसिंह टाक (३२, तीर्थपुरी, ता. अंबड, जि. जालना) असे पकडलेल्या चोरट्याचे 
नाव अाहे.  

शेख सुभान याचेच पिंपळवाडी येथील मुख्य रस्त्यावर जनता नावाचे होलसेल किराणा दुकान आहे. दुकानाच्या पाठीमागे त्यांचे घर असून रात्री ते दुकान बंद करून घरी झोपले. दरम्यान, रात्री तीनच्या सुमारास त्यांना आपल्या दुकानाचे शटर उचकटण्याचा आवाज आल्याने त्यांनी घरातील आपल्या मुलांना जागे करून दुकानाकडे आले असता त्यांना दुकानाचे शटर उचकटलेले दिसले व आतमध्ये चार चोरटे चोरी करताना आढळल्याने त्यांनी आरडाओरडा केली. 

दरम्यान, चोरट्यांनी त्यांना लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. मात्र, ग्रामस्थ जमा होताच चोरटे पळण्याच्या प्रयत्नात असताना त्यांनी एका चोरट्यास पकडून ठेवले, तर तीन चोरटे पसार झाले. पकडलेल्या चोरट्यास रात्री नागरिकांनी  बेदम मारहाण केली.  घटनेची माहिती मिळताच सपोनि पायघन व पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले. तसेच चोरट्यांनी जैन स्पिनर फाटा येथील विशाल पानपट यांचेही कापडाचे दुकान फोडले होते. या चोरीतील मुद्देमालासह एक दुचाकी पोलिसांनी जप्त केली.

शेख सुभान यांच्या फिर्यादीवरून आरोपी ठाकूरसिंग अमरसिंह टाक आणि इतर तीन पसार झालेल्या चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास  फौजदार राहुल पाटील, जमादार मुश्ताक सय्यद, जाकेर शेख करत आहेत.
 
नागरिकांनी दिले पोलिसांना निवेदन
पैठण तालुक्यातील पिंपळवाडी (पिराची) परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी येथे रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी सरपंच साईनाथ सोलाट व व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पैठण एमआयडीसी पोलिसांकडे केली आहे.  याविषयी येत्या रविवारी परिसरातील व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती सरपंच  सोलाट यांनी दिली.