आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक लुटण्याचा प्रयत्न हाणून पाडला; 5 दरोडेखोर अटकेत, पोलिसांची धडाकेबाज कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिऊर - वैजापूर येथून शिऊरच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी रक्कम घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडवून त्यांच्याकडील रक्कम हडपण्याच्या कटाच्या तयारीत असलेल्या पाच दरोडेखोरांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखा व वैजापूर पोलिसांना यश आले आहे.   

बुधवार, १२ जुलै रोजी लासूर स्टेशन येथील चोरीचा तपास करत असताना वैजापूर-गंगापूर चौफुलीवर एका भेळ सेंटरच्या मागे पाच ते सात संशयित दरोडेखोर बसल्याची तसेच वैजापूर येथून शिऊर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेची रक्कम घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हल्ला चढवून त्यांच्याकडील रक्कम लुटण्याचा कट दरोडेखोरांकडून रचला जात असल्याची माहिती गुप्तहेरामार्फत वैजापूर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारून भारत लालचंद काळे, प्रदीप लालचंद काळे, बादशाह शबीर शेख (सर्व रा. अशोकनगर, श्रीरामपूर ), बाळू नंदू पवार (शिरसगाव ता. श्रीरामपूर) व लक्ष्मण मंगल चव्हाण(महाजनवाडी, ता. श्रीरामपूर) या पाच दरोडेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  सर्व आरोपींवर अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये चोरीचे गुन्हे दाखल असून त्यात त्यांना अटकदेखील करण्यात आली होती. आणखी काही दरोड्यांची माहिती पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर पोलिस अधीक्षक उज्ज्वला वनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, उपनिरीक्षक विवेक जाधव, सचिन कापुरे, भगतसिंग दुलत, रवींद्रकुमार वारंगुळे, हवालदार नवनाथ कोल्हे, गणेश मुळे, रतन वारे, संजय घुगे, रवी कीर्तिकर, रवींद्र काळे, अनिल दाभाडे आदींनी ही कारवाई केली.
 
१ लाख २८ हजारांचा ऐवज हस्तगत
दरोडेखोरांकडून एक एअरगन, चाकू, मिरची पावडर, स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी फायटर, सुती दोरी, तीन मोबाइल, दोन मोटारसायकली अशा दरोडा टाकण्याच्या साहित्यासह १ लाख २८ हजार ७५० रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच यातील एक आरोपी पसार झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...