आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबासाहेब म्हणत, मी ईश्वर नाही, माझ्या पाया पडू नका...मी तुम्हाला काम देतो, शिका आणि मोठे व्हा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिलिंद कॉलेजच्या बांधकामाच्या वेळी इंजिनिअर मेश्राम कारागीर. इन्सेट फेटा घातलेले कचरूलाल कुंजाळे. - Divya Marathi
मिलिंद कॉलेजच्या बांधकामाच्या वेळी इंजिनिअर मेश्राम कारागीर. इन्सेट फेटा घातलेले कचरूलाल कुंजाळे.
बाबासाहेब गाडीतून उतरताच आसपास जमा झालेले लोक त्यांच्या पाया पडायचे. त्यावर बाबासाहेब त्यांना म्हणत, माझ्या पाया पडू नका. मी काही देव नाही. मी तुम्हाला काम देतो, शिका मोठे व्हा...आणि त्यांनी अनेकांना मिलिंद कॉलेजचे बांधकाम करण्यासाठी कामावर घेतले. त्या काळी एक रुपया रोज दिला जात असे...हाताला काम आणि सोबत बाबासाहेबांचा सहवास, शाबासकी, त्यांचे कौतुकाचे बोल. यामुळे सारा शीण निघून जायचा. खरोखरच मंतरलेले दिवस होते ते...या आठवणी सांगितल्या आहेत बाबासाहेबांचा सहवास लाभलेले कचरूलाल कुंजाळे यांनी. आज ते ९९ वर्षांचे अाहेत. एक-एक क्षण त्यांनी मनात साठवून ठेवला आहे. प्रत्येक प्रसंग सांगताना ते त्या काळात हरवून जातात. 
 
बेगमपुऱ्यात राहणारे कचरूलाल हरिराम कुंजाळे १९५१-५२ मध्ये मिस्त्री म्हणून प्रसिद्ध होते. मिलिंद कॉलेजच्या बांधकामामध्ये त्यांचा सहभाग होता. सेंट्रिंग फर्निचरचे काम त्यांच्याच हातून झालेले आहे. त्या वेळी त्यांना दोन रुपये रोज मिळत असत. कष्ट करण्याची त्यांची वृत्ती आणि मनस्वी स्वभावाचे बाबासाहेबही त्या वेळी कौतुक करत. ती आठवण सांगताना कुंजाळे आजही म्हणतात, मानवी शरीराला काम असलेच पाहिजे. रिकामे बसलो तर अवयव निकामी होतात. त्याबाबत ते या वयातही दक्ष आहेत. आजही ते आपल्या घरासमोर किराणा दुकान चालवतात. वयोमानाने त्यांना ऐकायला कमी येते, पण त्यांचा आवाज मात्र कणखर आहे. विषय बाबासाहेब आंबेडकरांचा असेल तर ते त्यांच्या आठवणींचा खजिना, फेटा आणि दस्तऐवज लगेच आपल्यासमोर मांडतात. 

मौल्यवान कौतुकाचे बोल... 
औरंगाबादेतील एक काळ बाबासाहेबांच्या उपस्थितीमुळे मिलिंद कॉलेजमुळे गाजला. कचरूलाल सांगतात, ‘मिलिंद कॉलेजच्या बांधकामास १९५१ मध्ये प्रारंभ झाला. त्या वेळी मी ३२ वर्षांचा असेन. त्या काळी मला गवंडी किशन गायकवाडने बोलावून घेतले. बाबासाहेबांनी निझाम युसूफदिन मगरिबी यांच्याकडून ४०० एकर जमीन विकत घेतली होती. दोन रुपये रोजाप्रमाणे आम्ही काम करायला सुरुवात केली. प्रत्येक शनिवारी आम्हाला १२ रुपये मिळायचे. त्याहीपेक्षा आम्हाला बाबासाहेबांनी केलेल्या कौतुकाचे मोल जास्त वाटायचे. एक वेगळाच हुरूप यायचा. त्यामुळे आम्हीही अगदी मनापासून काम करायचो. बाबासाहेबांनी उभारलेल्या या संस्थेच्या कामात आमचा हातभार लागला यामुळे मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. 

सिलिंडर आणि शाबासकी 
कॉलेजचे बांधकाम सुरूच होते. ते अद्याप पूर्ण झालेले नव्हते, पण कॉलेज सुरू करायचे होते. त्यासाठी बाबासाहेब मुंबईला गेले आणि त्यांच्या भरवशातील लोकांना कॉलेजचे व्यवस्थापन कामकाज सांभाळण्यासाठी घेऊन आले. त्यामध्ये प्राचार्य म्हणून एम. बी. चिटणीस रजिस्ट्रार म्हणून बळवंत वराळे यांची नेमणूक करण्यात आली. बाबासाहेबांची अशी इच्छा होती की, कॉलेजच्या मोकळ्या जागेमध्ये नामांकित व्यक्तींचे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे पुतळे उभारायचे. यासाठी त्यांनी शिल्पकार मडिलगेकर यांना आणले. त्यांचे काम बाबासाहेबांना खूप आवडले. यादरम्यान, माझा बाबासाहेबांसोबत खूप जवळचा संबंध आला. एकेदिवशी त्यांना नागपूरला दीक्षा घ्यायला जायचे होते, परंतु थंडीमुळे त्यांना खूप त्रास होत होता. यासाठी ते एक मोठे ऑक्सिजन सिलिंडर सोबत ठेवत असत. कारण रात्रीच्या वेळी त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असे. नागपूरला रात्री निघताना त्यांनी मला बोलावले आणि सिलिंडर मोटारीत बसवून देण्यास सांगितले. त्यांचा ड्रायव्हर मारुती प्रयत्न करत होता, पण सिलिंडर फूट लांबीचे असल्याने ते त्याला गाडीमध्ये फिट करता येत नव्हते. मग मी आणि मारुती दोघांनी मिळून सिलिंडर थोडे तिरके केले आणि गाडीत बसवले. बाबासाहेबांनी माझी धडपड आणि काम पाहून मला जवळ बोलावले आणि शाबासकी दिली. त्यानंतरच ते प्रवासाला निघाले.’ 
 
पुढील स्लाईडवर वाचा, मिलिंद कॉलेजच्या बांधकामात सहभागी ९९ वर्षीय कचरूलाल कुंजाळेंच्या आठवणी...
 
 
 
 
 
 
 
 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...