आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधारकार्ड, मतदान कार्ड द्या, सातबारा नसेल तरी खरेदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - शासनाला तुरीचा मोठ्या प्रमाणात बफर स्टॉक तयार करावयाचा आहे. यासाठी ५ हजार ५० रुपयांचा हमीभाव देऊन शेतकऱ्यांकडून तूर खरेदी केली जात आहे. आतापर्यंत शेतकऱ्याचा सातबारा व त्यावरील पीकपेऱ्याची नोंदही बघितली जात होती. मात्र, आता सातबारा आणण्याची आवश्यकता नाही. केवळ आधारकार्ड व मतदान ओळखपत्र आणले तरीसुद्धा तूर खरेदी केली जाईल. शिवाय कोणी कितीही तूर विक्रीसाठी आणू शकतो मार्केटिंग फेडरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक राधिका रस्तोगी यांनीच शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या या निर्णयाची 
माहिती दिली.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात सुरू करण्यात आलेल्या शासकीय तूर खरेदी केंद्रास शुक्रवारी दुपारी रस्तोगी यांनी भेट दिली.  यावेळी जनरल मॅनेजर अनिल देशमुख, ए.जी. पवार, व्यवस्थापक देविदास भोकरे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी राठोड, बाजार समिती सचिव गणेश चौगुले, संचालक अनिल सोनी यांच्यासह शेतकरी, आडते, व्यापारी उपस्थित होते. रस्तोगी म्हणाल्या, हमीभावानुसार शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जावा हा नियम आहे, तो पाळलाच गेला पाहिजे. यासाठीच शासनाने तूर खरेदी केंद्र सुरू केले असून याचा जास्तीत-जास्त शेतकऱ्यांना लाभ झाला पाहिजे. राज्यात सर्वाधिक आवक जालना कृषी उत्पन्न बाजार समिती क्षेत्रात झाली आहे. मात्र, शासकीय तूर खरेदी केंद्रावर ती कमी आहे. यासाठी बाजार समितीमार्फत व्यापक प्रचार-प्रसिद्धी करण्यात यावी. खरेदी केंद्र वाढवावेत जेणेकरून शेतकऱ्यांना आपला माल तेथे आणून विकता येईल. तसेच शेतकऱ्यांनीसुद्धा तूर विक्रीसाठी आणताना ती स्वच्छ, १२ टक्क्यांपेक्षा कमी आर्द्रता आदी निकष पूर्ण करूनच आणावी.