आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहेब, पतीने माझा जबरदस्तीने गर्भ पाडला म्हणत ‘तिने’ केला गर्भपात केंद्राचा पर्दाफाश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गर्भपात केंद्राची पाहणी करताना पोलिस अधिकारी. छाया : मनोज पराती - Divya Marathi
गर्भपात केंद्राची पाहणी करताना पोलिस अधिकारी. छाया : मनोज पराती
औरंगाबाद- साहेब, पतीने पाच दिवसांपूर्वी माझा जबरदस्तीने गर्भपात केला. सहा आठवड्यांचा माझा गर्भ मारून टाकला, अशी तक्रार घेऊन २५ वर्षीय महिला पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्याकडे आली. हे बेकायदा गर्भपात केंद्र दोन वर्षांपासून जिन्सी पोलिस ठाण्यापासून २०० मीटर अंतरावरच सुरू असल्याचे लक्षात येताच यादव गंभीर झाले. त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले आणि रनमस्तपुरा भागातील या केंद्रावर बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास छापा टाकण्यात आला. एमबीबीएस असल्याचा दावा करणाऱ्या ६० वर्षीय डॉ. चंद्रकला रामराव गायकवाड (रा. राज कॉम्प्लेक्स, रोजाबाग) आणि तिची मदतनीस शांता गोकुळ सातदिवे (४६, रा. मोतीकारंजा) यांना जिन्सी पोलिसांनी अटक केली. दोन खोल्यांच्या घरातील एका खोलीत केवळ दोन हजार रुपयांमध्ये गर्भपात केला जात होता, अशी माहिती समोर आली आहे. 

सुमैयाचा (रा. किलेअर्क) गर्भ १९ मे रोजी तिचा पती सय्यद सलाहउद्दीन सय्यद शहाबुद्दीनने याच केंद्रात नेऊन पाडला. त्यानंतर तिने या केंद्राचा भंडाफोड करण्याचे ठरवले होते. तिने आईवडिलांना सोबत घेऊन थेट पोलिस आयुक्तांची भेट घेतली. यादव यांच्या आदेशावरून जिन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्यामसुंदर वसूरकर, उपनिरीक्षक वर्षा काळे यांनी सापळा रचला. 

बनावट रुग्ण म्हणून गेलेल्या कर्मचाऱ्यांनी इशारा करताच बाहेर दबा धरून बसलेल्या पथकाने छापा मारून गायकवाड, सातदिवेला ताब्यात घेऊन गर्भपातासाठी वापरले जाणारे सर्व साहित्य जप्त केले. सुमैयाचा पती सय्यद सलाहउद्दीनविरुद्ध बळजबरीने गर्भपातास भाग पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितले. हे मोठे रॅकेट असून त्यात शहरातील अनेक डॉक्टरांचा सहभाग असावा, असा संशयही त्यांनी व्यक्त केला. 

पाच-सहावर्षांपासून सुरू होता गैरप्रकार
रनमस्तपुऱ्यातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड गेल्या पाच ते सहा वर्षांपासून व्यवसाय करतात. हे घर त्यांनी भाड्याने घेतले होते. काहींना त्याची माहिती होती, परंतु कोणीही पोलिसांकडे तक्रार केली नव्हती. गर्भपात केंद्रासमोरील औषधी दुकानदारही या गोरखधंद्यात सहभागी असावा असा संशय आहे. तीन महिन्यांपूर्वीच रनमस्तपुरा रस्ता रुंदीकरणात डॉ. गायकवाड यांच्या दवाखान्याच्या दोन खोल्या पडल्या. त्यामुळे त्यांनी दवाखान्यालगतच्या दोन खोल्या भाड्याने घेतल्या. 

जीवघेणाप्रकार, सोयी-सुविधा नाहीत
दोनखोल्यांच्या गर्भपात केंद्रातील समोरील खोलीत केवळ एक पलंग, तर मागील खाेलीत गर्भपातासाठी लागणारा बेड, त्यासमोर स्टूल त्यावर एक बादली इतकेच सामान होते. ऑक्सिजन सिलिंडर किंवा संकटकाळी आवश्यक यंत्रणा नव्हती. 

कारवाईत यांचा सहभाग 
राहुल श्रीरामे, सहायक पोलिस आयुक्त ज्ञानोबा मुुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्यामसुंदर वसूरकर, उपनिरीक्षक वर्षा काळे, शेख रफिक, सहायक फौजदार अय्युब पठाण, हवालदार संपत राठोड, संजय गावंडे, पंढरीनाथ जायभाये, सुनील जाधव, पोलिस नाईक बाळू थोरात, ज्ञानेश्वर बाविस्कर यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली. 

गर्भवती नसतानाही सांगितले गर्भवती आहे 
काळेयांच्यासोबतच्या डमी रुग्णाची तपासणी करावीच लागेल, असे गायकवाड यांनी सांगितले. परंतु डमी रुग्ण गर्भवती नसल्याने सापळा निष्फळ जाईल अशी भीती काळेंना होती. पण गायकवाड यांनी ती दीड महिन्याची गर्भवती असल्याचे सांगितले तेव्हा काळेंना धक्काच बसला. 

अतिशय गजबजलेल्या भागात हे बेकायदा गर्भपात केंद्र सुरू होते. त्यामुळे आरोपींना निसटून जाण्याची संधी मिळू नये म्हणून पोलिस उपनिरीक्षक वर्षा काळे गर्भवती असल्याचे सांगत त्या केंद्रात पोहोचल्या. त्यांनी या घटनेचे केलेले वर्णन असे : मी बनावट रुग्णाची भावजय असल्याचे सांगून डॉ. गायकवाड यांची मंगळवारी भेट घेतली. गर्भ पाडायचा आहे. त्यासाठी किती रुपये लागतील, असे विचारले. तेव्हा त्यांनी एका क्षणाचाही विलंब लावता दोन हजार रुपये सांगितले. शिवाय काही औषधी घेऊन याव्या लागतील, असेही म्हणाल्या. मग मी विचारले, गर्भ पाडण्यासाठी केव्हा यावे लागेल? त्यांनी उत्तर दिले, काही मिनिटांतच गर्भ पाडता येईल. पण एवढ्या कमी वेळात माझी तयारी नसल्याचे सांगून मी तेथून बाहेर पडले. आणि बुधवारी सकाळी पोहोचले. त्या वेळी तेथे एका २५ वर्षीय युवतीचा गर्भपात सुरू होता. मग डॉ. गायकवाड यांनी मला दुसऱ्या एका महिलेला प्रिस्क्रिप्शनवर लिहिलेले इंजेक्शन, औषधी आणण्यास सांगितले. मी ते खरेदी करून पुन्हा केंद्रात गेले. तत्पूर्वी पोलिस पथकाला इशारा केला होता. 

गर्भाची विल्हेवाट स्वच्छतागृहात 
प्राथमिक चौकशीत गर्भपात केल्यानंतर गर्भ नातेवाइकांकडे दिला जाई असे समोर आले आहे. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दवाखान्यातील स्वच्छतागृहात (बाथरूम) गर्भाची विल्हेवाट लावली जात होती. दररोज पाच ते सहा महिला येथे तपासणीसाठी येत होत्या. 
बातम्या आणखी आहेत...