आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध तीन भिषण अपघातात तिघे ठार, दुचाकी चारचाकी जळून खाक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुचाकी, चारचाकी खाक - Divya Marathi
दुचाकी, चारचाकी खाक
सिल्लोड - कार व दुचाकीची जोरदार धडक होऊन पालोद फाट्यानजीकच्या वळणावर झालेल्या अपघातात शिक्षक फुलचंद चिंतामण पाटील जागीच ठार झाले. अपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला फेकले जाऊन वाहनांनी पेट घेतल्याने जळून खाक झाली. 
 
अजिंठा लेणी पाहण्यासाठी जात असलेल्या मित्रांच्या कारची ( क्रमांक एम. एच. २१ ए. एक्स २३८६) जोरदार धडक लिहाखेडी येथून सिल्लोडकडे येत असलेल्या फुलचंद चिंतामण पाटील (५७ ,रा. शिक्षक कॉलनी ) यांच्या दुचाकीस क्रमांक (एम. एच. २० बी. के. ४३३९) रविवारी (दि. १०) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पालोद येथील वळणावर जोराची धडक बसली. फुलचंद पाटील जागीच ठार झाले. मुर्डेश्वर विद्यालय लिहाखेडी येथे शिक्षक होते. लिहाखेडी येथील काम आटोपून घराकडे सिल्लोड येथे येत असताना अपघात घडला.दोन्ही वाहनांची धडक एवढी जोरदार होती की वाहने रस्त्याच्या बाजूला फेकली जाऊन त्यांनी पेट घेतला. यात दोन्ही वाहने जळून खाक झाली.याप्रकरणी फुलचंद पाटील यांचे भाऊ उत्तम गोविंदा शिंदे पाटील (रा. ओझर तालुका चाळीसगाव) यांनी सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशनला तक्रार दिली. 
 
दुचाकीच्या अपघातात ठार 
बिडकीन आैरंगाबाद - पैठण रोडवर बिडकीन येथील कैलास हॉटेलसमोर दुचाकी ( एमएच २० बीएक्स ४९३०) तसेच चारचाकी ( एमएच २० ईई ९२८२) यांची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीस्वार गणेश दादासाहेब गरड (२०, रा.धूपखेडा) जागीच ठार झाला. ही घटना रात्री वाजेदरम्यान घडली. चारचाकी औरंगाबादकडे तर दुचाकीस्वार धूपखेड्याकडे जात असताना ही घटना घडली. धडक इतकी जोरात होती की दुचाकीचा चुराडा झाला. चारचाकी जागेवर उभी करून चालकाने पोबारा केला. याप्रकरणी बिडकीन पोलिस पुढील तपास करत आहेत. 
 
रुग्णवाहिकेवरील डॉक्टर उशिरा पोहचल्याने जखमीचा मृत्यू 
खुलताबाद - तातडीची वैद्यकीय सेवा पुरवण्याचा दावा करणाऱ्या १०८ रुग्णवाहिकेवरील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या दिरंगाईमुळे नाहक अपघातग्रस्ताचा मृत्यू झाला. रावसाहेब म्हसरूप (६५) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे नातेवाइकांसह लोकप्रतिनिधींनी संताप व्यक्त करत संबंधित बेजबाबदार डॉक्टरला निलंबित करण्याची मागणी केली आहे. 
 
वेरूळ येथे मोटारसायकलवरून जात असलेल्या रावसाहेब शंकर म्हसरूप (६५) वर्षे त्यांच्या पत्नी तुळसाबाई रावसाहेब म्हसरूप (६५, राहणार पळसवाडी, ह. मु. खुलताबाद) यांच्या गाडीला एका कन्नडकडून येणाऱ्या कार (क्रमांक एम.एच. २६ के. ३८२५) हिने वेरूळ लेणीसमोर रविवारी सकाळी नऊच्या सुमारास जोरदार धडक दिली. या अपघातात दोघे पती -पत्नी गंभीर जखमी झाले. 
 
नागरिकांनी अपघाताचा आवाज होताच अपघात स्थळाकडे धाव घेतली. याच वेळी औरंगाबादकडे जाणारे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अवचित वळवळे यांनी आपले वाहन थांबवून जखमींना खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. 
 
तेथील वैद्यकीय अधिकारी संतोष नाईकवाडे यांनी प्रथमोपचार केले. मात्र अपघातग्रस्तांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना तातडीने औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. रुग्णालयात उपस्थित असलेल्या नातेवाईक मनोहर लाळे, फकीरचंद काळे यांनी १०८ रुग्णवाहिका विभागाला साडेनऊ वाजता फोन करून याच रुग्णालयात उभी असलेली १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची विनंती केली. अपघातग्रस्तांची प्रकृती रक्तस्राव होत असल्याने आणखी खालावत चालल्याने रुग्णवाहिकेच्या चालकाने तातडीने अपघातग्रस्तांना घेण्यासाठी रुग्णालयासमोर आणून उभी केली. 
 
परंतु रुग्णवाहिकेवरील नेमलेले वैद्यकीय अधिकारीच उपस्थित नसल्याने अपघातग्रस्तांना औरंगाबाद घाटी रुग्णालयात नेण्यास अडचण झाली. एका तासानंतर वैद्यकीय अधिकारी आरामशीरपणे या ठिकाणी आले. रुग्णवाहिकेत टाकलेल्या अपघातग्रस्तांना तपासताच रुग्णवाहिकेत समोरील सीटवर बसून ती औरंगाबादकडे नेली. घाटी रुग्णालयात नेण्यासाठी या सर्व प्रकारामुळे दोन तास उशीर झाल्यामुळे प्रवासादरम्यान जखमी रावसाहेब म्हसरूप यांनी रुग्णवाहिकेतच दम तोडला. 
बातम्या आणखी आहेत...