आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुमीत राघवनने शिवसेनेवर ठपका टाकणाऱ्या व्हिडिओनंतर रंगमंदिरासाठी शिरसाटांचे 20 लाख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नाट्यकलावंत सुमीत राघवनने दोन दिवसांपूर्वी संत एकनाथ रंगमंदिराची दुरवस्था दाखवणारा आणि थेट शिवसेनेवर ठपका टाकणारा व्हिडिओ आणि त्यानंतर स्थानिकांनी थेट उद्धव ठाकरेंच्या कानावर पोहाेचवलेली माहिती यामुळे शिवसेना आमदार खासदारांना दट्ट्या लावला गेला. आमदार संजय शिरसाट यांनी सोमवारी रंगमंदिरात धाव घेत दुरुस्ती कामासाठी आपल्या निधीतून २० लाख रुपये देण्याची घोषणा केली तर मनपा आयुक्तांनी १५ आॅगस्टपासून दुरुस्तीच्या कामासाठी महिनाभर रंगमंदिर बंद ठेवण्याचे आदेश दिले. 
 
संत एकनाथ रंगमंदिराच्या दैन्यवस्थेची लक्तरे वारंवार वेशीला टांगली जात आहेत. नाट्यकर्मी रसिकांनी आंदोलन करूनही मनपाचा हत्ती हलला नाही. काही महिन्यांपूर्वी नाशिकच्या एका नाट्यसंचाने रंगमंदिराची अवस्था मांडली होती. तर दोनच दिवसांपूर्वी नाट्य अभिनेते सुमीत राघवन यांनी रंगमंदिराच्या स्टेज, ग्रीन रूम कलावंतांच्या स्वच्छतागृहांची भयानक अवस्था दाखवणारा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला होता. त्यात सुमीतने शिवसेनेला जबाबदार ठरवत टीकाही केली. ही पोस्ट व्हायरल झाली. त्यावर अतिशय तीव्र प्रतिक्रियाही उमटल्या. 
 
या नंतर रंगमंदिराच्या दुरवस्थेबाबत लढा उभारणाऱ्या ‘नावासाठी नाही तर कामासाठी’ या ग्रुपच्या सदस्यांनी सुमीत राघवनचा व्हिडिओ रंगमंदिराच्या एकूणच दुरवस्थेबद्दल सारा तपशील थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कार्यालय यांना पाठवला. त्यानंतर आज धडाधड सूत्रे हलली. आज आमदार संजय शिरसाट यांनी रंगमंदिराला भेट दिली. या वेळी मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर हेही होते. शिवाय प्रसिद्ध अभिनेते मूळचे औरंगाबादकर मंगेश देसाईही होते. या शिवाय उपमहापौर स्मिता घोगरे, नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, प्रेषित रुद्रावार,शीतल रुद्रावार, दत्ता जाधव, संदीप सोनार, सारंग टाकळकर यांचीही उपस्थिती होती. 
 
या सर्वांनी रंगमंदिराच्या स्टेजची इतर दुरवस्थेची पाहणी केल्यानंतर आमदार शिरसाट यांनी आपल्या निधीतून तत्काळ २० लाख रुपये देण्याची घोषणा केली आयुक्तांना तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश दिले. आयुक्त मुगळीकर यांनी शाॅर्ट टेंडर काढून हे काम करण्यात येईल त्यावर उद्याच निर्णय घेतला जाईल असे सांगितले. १५ आॅगस्टपासून दुरुस्तीचे काम सुरू होणार असून या कामासाठी रंगमंदिर एक महिना बंद राहणार आहे. 
 
डीपीडीसीतून निधी मागणार : आमदार शिरसाट म्हणाले की, रंगमंदिराच्या संपूर्ण कामासाठी दीड कोटी रुपयांचा निधी लागणार असून डीपीडीसीतून निधी मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. 
 
आज खैरे भेट देणार 
दरम्यान, खासदार चंद्रकांत खैरे हे उद्या सकाळी साडेदहा वाजता रंगमंदिराची पाहणी करणार आहेत. तेदेखील रंगमंदिराचे काम तातडीने मार्गी लावावे यासाठी मनपा प्रशासनाला निर्देश देणार आहेत. 
 
‘स्मार्ट सिटी’तून निधी, उत्कृष्ट रंगमंदिर करू 
मनपाच्या मालकीच्या संत एकनाथ रंगमंदिराच्या दुरवस्थेचे धिंडवडे राज्यभर निघाल्यानंतर पालिका प्रशासनाला पुन्हा एकदा जाग आली. आता तातडीने याची रंगरंगोटी केली जाईल आणि स्मार्ट सिटी प्रकल्पातून निधी मिळवून पूर्ण दुरुस्ती करू, असे आयुक्त दीपक मुगळीकर यांनी स्पष्ट केले. या नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी चार वेळा निविदा काढण्यात आली, परंतु पैसे मिळण्याची शक्यता नसल्याने ठेकेदार समोर आला नाही. परिणामी ही अवस्था झाली आहे. त्यामुळेच स्मार्ट सिटीतून निधी उपलब्ध करू म्हणजे ठेकेदार कामाला लागेल, असेही मुगळीकर म्हणाले. नाट्यकर्मी सुमीत राघवन याने रविवारी या दुरवस्थेची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केल्याने सर्वांचेच याकडे लक्ष वेधले गेले. सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनपासमोर निदर्शने केली, तर आमदार सतीश चव्हाण यांनीही याकडे लक्ष वेधले. मुगळीकर यांनी संत एकनाथची अवस्था अत्यंत वाईट असल्याचे मान्य केले. ते म्हणाले, दुरुस्तीसाठी पूर्वीही प्रयत्न केले होते, परंतु ठेकेदारच समोर आले नाहीत. काम केल्यानंतर पैसे मिळणार नाहीत, असे त्यांना वाटले असावे.
 
११ ऑगस्टला स्मार्ट सिटी योजनेच्या समितीची बैठक आहे. त्यात संत एकनाथचा प्रस्ताव ठेवला जाईल. निधी मंजूर होताच नव्याने निविदा काढली जाईल. तोपर्यंत साफसफाई, रंगरंगोटीचे काम हाती घेतले जाईल. त्यासाठी स्मार्ट सिटीच्या निधीची प्रतीक्षा करणार नाही. त्यानंतर मोठी कामे केली जातील. हे नाट्यगृह उत्कृष्ट नाट्यगृह केले जाईल, असा दावाही त्यांनी केला. -
बातम्या आणखी आहेत...