आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धडाडीचा नेता, गरिबांचा आधार; चळ‌वळीतील ढाण्या वाघ आणि मानवतेचा दूत गेला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- बीड येथील मानवी हक्क अभियानाचे प्रमुख अॅड. एकनाथ आव्हाड यांच्या आकस्मिक निधनामुळे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय विश्वात शोककळा पसरली. त्यांच्या निधनामुळे मानवतेचा दूत, परिवर्तनाच्या चळवळीतील ढाण्या वाघ गेला असल्याची शोकसंवेदना विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केली आहे.
अॅड. आव्हाडांच्या निधनाबद्दल मान्यवरांच्या शोकसंवेदना
- अॅड. एकनाथ आव्हाडांनी कधीही आपल्या कुटुंबीयांचा विचार करता सतत समाजासाठी आयुष्य जगले. मानवी हक्क या त्यांच्या अभियानाच्या माध्यमातून त्यांनी मानवता प्रस्थापित करण्याचे काम बीडसारख्या प्रतिगामी जिल्ह्यात केले. त्यानंतर त्यांनी मानवतेचा कधीही पराभव होऊ दिला नाही. मानवतेचे ते दूत होते. त्यांनी जगलेले आयुष्य वर्तमान स्थितीतील कार्यकर्त्यांनी प्रेरणा घेण्यासारखे आहे. त्यांच्या स्मृतींना माझा सलाम.
गंगाधर गाडे, पक्षाध्यक्ष, पँथर्स रिपब्लिकन पार्टी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा धगधगता स्वाभिमान उराशी बाळगून काम करणारा सच्चा कार्यकर्ता गेला. वेळेआधीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. गोरगरिबांचा आधार आणि धडाडीचा नेता गेल्यामुळे आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे.अॅड. आव्हाड यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली आहे.
अॅड. रमेश खंडागळे, महासचिव, भारिप
- आंबेडकरी चळवळीतील संघर्षशील नेतृत्वाचा अंत झाला आहे. अत्यंत विपन्न अवस्थेतून त्यांनी जीवनाला सुरुवात केली. बुद्ध-फुले-शाहू आणि आंबेडकरी चळवळीचा संस्कार त्यांनी मातंग समाज बांधवावर केला. मातंग समाजातील अंधश्रद्धा, वाईट रूढींना त्यांनी नेस्तनाबूत केले.
डॉ. अरविंद गायकवाड, अधिष्ठाता, विभागीय कर्करोग रुग्णालय
- रूढी परंपरा विरुद्ध निकराने झुंजणारा, समाज परिवर्तनाच्या चळवळीतील ढाण्या वाघ गेला आहे. ज्या काळात अस्पृश्यता जातीयतेत रूपांतरित झालेली होती. अत्याचारांनी उग्र रूप धारण केलेले होते. अशा काळात अॅड. आव्हाडांनी रूढी परंपरांना नेस्तनाबूत करण्यासाठी निष्ठापूर्वक झुंज दिली. सामाजिक सौहार्दासाठी त्यांनी तहयात प्रयत्न केले. मानवी मूल्यांची घसरण होणाऱ्या काळात आव्हाडांनी मूल्य जाणिवा आणि निष्ठेची पताका कधीही खाली पडू दिली नाही. समतेचा विचार, बुद्धतत्त्वज्ञान त्यांनी प्रत्येकांच्या कृतीत उतरवण्यासाठी प्रयत्न केला.
डॉ. ऋषीकेश कांबळे, प्रसिद्ध साहित्यिक
- मातंग समाजात अनेक वाईट परंपरा संपवण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला आहे. पोतराजांचे केस कापून त्यांना सामान्य जीवन जगण्यास त्यांनी भाग पाडले. आमावास्येविषयी मातंग समाजात असलेले चुकीचे समज त्यांनी काहीअंशी काढून टाकले आहेत. दलित समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले.
चंद्रभान पारखे, सचिव, प्रदेश काँग्रेस समिती
- अॅड. आव्हाड अत्यंत अभ्यासू चिकित्सक व्यक्तिमत्त्व होते. कायद्याचा अभ्यासक असल्यामुळे त्यांनी त्याला व्यावसायिक स्वरूप देण्याऐवजी कायद्याच्या ज्ञानाचा वापर समाजाच्या हितासाठी केला. वर्तमान स्थितीतील ते एक समाजसुधारक म्हणूनच नावारूपाला आले होते. त्यांच्या निधनामुळे समाज परिवर्तनाच्या चळवळीची मोठी हानी झाली आहे.
डॉ. बी. ए. चोपडे, कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
बातम्या आणखी आहेत...