आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"नांमका'च्या पाण्यापासून गंगापूरचे शेतकरी वंचित, अवैध उपसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगापूर - नांदूर-मधमेश्वर कालव्यातून टंचाईग्रस्त गंगापूर व वैजापूर तालुक्यासाठी सोडलेले पाणी पाच दिवसांपूर्वी वैजापुरात दाखल झाले होते, परंतु वैजापूरच्या शेतकऱ्यांकडून अवैधपणे होत असलेल्या पाण्याच्या उपशामुळे हे पाणी गंगापुरात पोहोचत नसल्याच्या तक्रारीवरून नांमका प्रशासनाने अशा शेतकऱ्यांवर रविवारपासून गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

गंगापूर - वैजापूर तालुक्यांतील लाभधारक शेतकऱ्यांसाठी खरीप पिकांच्या आवर्तनासाठी नांदूर-मधमेश्वर कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी ४ आॅगस्ट रोजी वैजापूर तालुक्यात दाखल झाले. हे पाणी ‘टेल टू हेड’ या न्यायाने गंगापूरला पाच किंवा सहा आॅगस्टपर्यंत प्रथम मिळणे अपेक्षित होते. मात्र, वैजापूर तालुक्यातील नांमका क्षेत्रातील शेतकरी नांमका यंत्रणेशी संगनमत करून अवैधपणे शेकडो मोटारी, जनरेटर्स व कालव्याला छिद्रे पाडून या पाण्याचा उपसा करीत आहेत. सहा दिवस होऊनही गंगापूरच्या लाभधारक शेतकऱ्यांना एक थेंबही पाणी न मिळाल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून गंगापूर तालुक्यातील शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात होते. यासंबंधी रामेश्वर मुंदडा, मनीष वर्मा, सुरेश दारुंटे, नीळकंठ जंगम यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या तक्रारींवरून आमदार प्रशांत बंब यांनी नांमकाचे कार्यकारी अभियंता आर. एस. फुलंब्रीकर यांच्याशी संपर्क साधला असता फुलंब्रीकर यांनी पाण्याचा वेग कमी असल्याचे सांगितले होते.परंतु खरे कारण वेगळेच असल्याने गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी याप्रकरणी शनिवारी नांमकाचे कार्यकारी अभियंता फुलंब्रीकर यांना सोबत घेऊन वैजापूर तालुक्यात होत असलेला अवैध पाणी उपसा उघड केला. गंगापूरकरांची तक्रार योग्य असल्याचे सांगून प्रथमदर्शनी सबळ पुरावा असलेल्या आठ जणांवर उद्या पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन फुलंब्रीकर यांनी दिले. वैजापूर तालुक्यातील अवैधपणे शेकडो मोटारी, जनरेटर्स व कालव्याला छिद्रे पाडून या पाण्याचा उपसा करीत आहेत.
तातडीने पाणी देण्याच्या सूचना
या प्रश्नावर शनिवारी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी गंगापूर येथे नांमका लाभधारक शेतकरी व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीने पाणी देण्याच्या सूचना केल्या. या वेळी पाटपाणी समितीचे अॅड. कृष्णा ठोंबरे, विजय पानकडे, संदीप पानकडे यांच्यासह लाभधारक शेतकरी उपस्थित होते.
गंगापूरसाठी पाणी सोडणार
नांदूर-मधमेश्वर कालव्याच्या पाण्याचा अवैधपणे उपसा करणाऱ्यांवर उद्यापासून पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. या कामी सहकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. आज,दि. ९ पासून दहा दिवस गंगापूरसाठी पाणी सोडण्यात येईल.
आर. एस. फुलंब्रीकर, कार्यकारी अभियंता, नांमका