आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जे विकते तेच पिकवतात 6 राज्यांतील 1 लाख 3 हजार शेतकरी; फायद्याच्या शेतीतून आर्थिक सुबत्ता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पारंपरिक शेतीला फटा देऊन ६ राज्यांतील १ लाख ३ हजार शेतकरी जे विकते तेच शेतीत पिकवत आहेत. मागणी, मिळणारा भाव व बाजारपेठ लक्षात घेऊन मालाचे ब्रँडिंग, ग्रेडिंग, पॅकिंग करून सेंद्रिय भाजीपाला, कडधान्य, फळे व दूध ग्राहकांना घरपोच विक्री करत आहेत. विशेष म्हणजे राज्यातील ७३ हजारांपैकी २५०० शेतकरी मराठवाडा -विदर्भाचे आहेत.  

लहरी पावसावर होणारी बेभरवशाची शेती आणि त्यामुळे संकटात सापडणारा शेतकरी ही अडचण लक्षात घेऊन पुणे येथील राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शेतकरी उद्योजक ज्ञानेश्वर बोडखे यांनी एका एकरात फायद्याच्या शेतीचे तंत्र शेतकऱ्यांना शिकवले आहे. या शेतीसाठी अभिनव ग्रुपच्या माध्यमातून शेतकरी जोडतात. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, तेलंगण, राजस्थानातील शेतकऱ्यांचे गट फायद्याची शेती करत आहेत.
 
अशी केली जाते फायद्याची शेती 
गटामधील प्रत्येक शेतकऱ्याकडे देशी गायी आहेत. सेंद्रिय शेतीसाठी शेण कामी येते. गोमूत्र, शेणाच्या गवऱ्या, दूध विक्रीला प्राधान्य दिले जाते. लागवड कधी करावी, कोणते पीक घ्यावे, काय भाव मिळेल याबरोबरच शून्य उत्पादन खर्च तत्त्वावर शेतीच्या पद्धती सांगितल्या जातात. पॉलिहाऊस, शेडनेट तंत्रज्ञानाचा अवलंब करून ऑफ सीझनमध्ये भाजीपाला पिकवण्यावर भर दिला जातो. कीटकनाशकाऐवजी गोमूत्र, कडुलिंबाचा पाल्याची फवारणी केली जाते. एक शेतकरी दोन एकरात कमीत कमी खर्च वजा जाता ४ लाख रुपयांवर उत्पन्न मिळवतो, असे शेतकरी नीलेश चव्हाण, ज्ञानेश्वर शेंद्रे म्हणाले.
 
दलाली कायमची संपुष्टात 
औरंगाबादेतील तिरुपती पार्क, रंजनवन सोसायटी, सहकारनगर, ज्योतीनगरसह पुणे, मुंबई, नाशिक सोलापुरातील २५६ हाउसिंग सोसायट्यांतील ग्राहकांच्या मागणीनुसार शेतमाल, दूध घरपोच पुरवले जाते. यामुळे दलाली संपुष्टात आली. हैदराबाद, दिल्ली, बंगळुरूमध्येही फळे, भाज्याही पुरवल्या जात आहेत.  
 
अॅपद्वारे आगाऊ बुकिंग
विक्री व्यवस्थापन, तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी पूर्वनियोजनानुसार शेती पिकवतात. सेंद्रिय भाजीपाला, फळे, दूध, कडधान्य विक्रीसाठी अॅप तयार केले. ग्राहक हवे त्या मालाची ऑनलाइन बुकिंग करतात. त्यानुसार ३ हजार कृषी पदवी, पदव्युत्तर मुली,  १०३ पॅक हाऊस, १३६० महिला बचत गटांद्वारे ब्रँडिंग, ग्रेडिंग आणि पॅकिंग करून शेतमाल पोहोचवला जातो.  
 
पुढील स्‍लाईडवर वाचा, आरोग्यदायी भाजीपाला - सुरेखा धनवई  
 
बातम्या आणखी आहेत...