आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजिंठा लेण्यातील चित्रकृतींचे आयुष्य वाढणार, अत्याधुनिक हेपा एअर फिल्टर बसवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अजिंठा लेण्यातील चित्रकृतींना आर्द्रता, उष्णता, धूलीकण आणि किटकांपासून मोठा धोका आहे. यामुळे चित्रकृतींचे थर उखडून त्या खराब होतात. तर  घामाच्या दुर्गंधीने पर्यटक त्रस्त होतात. मात्र, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या विज्ञान शाखेने यावर उपाय शोधला असून देशात प्रथमच लेण्यांत अत्याधुनिक हाय इफिशीयन्सी पर्टिक्युलेट अरेस्टेन्स म्हणजेच हेपा एअर फिल्टर बसवले आहेत. दूषीत हवा आणि दुर्गंधी शोषूण शुद्ध लेण्यात हवा सोडण्याचे काम हे यंत्र करतय. यामुळे चित्रकृतींचे संवर्धन होऊन त्यांचे अायुष्य वाढणार आहे. 
 
अजिंठा लेण्यांवरील शिल्पे, चित्रकृती तीन थरात आहेत. सर्वात खाली दगडाची भिंत आहे. त्यावर मातीचा थर म्हणजेच मड प्लास्टर आहे. सर्वात वर खडबडीत भिंत एकरूप करण्यासाठी चून्याचा गिलावा लावण्यात आला आहे. चून्याच्या थरावर चित्रे आहेत. मड प्लास्टरसाठी काळी माती, गडीची पांढरी माती, तलावातील चिकन मातीमध्ये बेलफळ, बेल, हिरडा, डिंक, बेहडा, तांदळाच्या सालीचा भुसा, घोड्याची लीद आणि शेण हे सेंद्रिय पदार्थ मिसळले जातात.  वातावरणातील बदल, उष्णता, आर्द्रतेमुळे मड प्लास्टरमधील पदार्थांचे विघटन होत आहे. हवा, पर्यटकांचे कपडे आणि सामानासोबत येथे मोठ्या प्रमाणात धूळ येते. पक्षी येथे घरटे करतात. तर लहान भेगांमध्ये पक्षी अळ्या, किटके टाकतात. पक्षी, किटाणूंचे मलमूत्र तसेच किटकांची वाढ झाल्याने पेटींगचे पापुद्रे निघतात. यावर उपाय शोधण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या औरंगाबादेतील विज्ञान शाखेचे उपअधिक्षक पुरातत्व रसायणज्ञ श्रीकांत मिश्रा, दिपक गुप्ता आणि त्यांची टीम उपाय शोधत होती. यातूनच रूग्णालयांमध्ये बसवले जाणारे हाय इफिशीयन्सी पर्टिक्युलेट अरेस्टेन्स म्हणजेच हेपा एअर फिल्टर बसवण्याची कल्पना सुचली.
 
सात थरात होते फिल्टर
हवेतून पसरणारे किटाणू, धुलीकण शोषूण त्यावर प्रक्रिया करत शुद्ध हवा सोडण्यासाठी हेपा फिल्टरचा वापर होतो. हे फिल्टर सात थरात हवेतील घाण शोषते. पहिल्या थरात मोठे िकडे, किटाणू जमा होतात. तर त्यापुढील थरात ०.३ मायक्रॉनपर्यंतचे धुलीकण शोषले जातात. पुढील दोन थरातील कार्बन फिल्टरमध्ये दुर्गंधी, स्मॉग, व्हीओसी तसेच बॅक्टेरीया जमा होतात. या ठिकाणी असणारा अल्ट्रा व्हायोलेट लॅम्प हवेतील बॅक्टेरिया, व्हायरस नष्ट करतो. निकल फिल्टर दूषीत हवेवर प्रक्रिया करून शुद्ध हवा बाहेर सोडतो.
 
दुर्गंधीचा नायनाट
लेण्यात घाणीसोबत पर्यटकांच्या घामाचा, मोज्यांचा वास येतो. हेपा फिल्टरमुळे ही दुर्गंधी कायमची गेली आहे. सद्या पेटींग असणाऱ्या १,२,१६ आणि १७ मध्ये हे फिल्टर ठेवण्यात आले आहे. एका लेणीत ५ या प्रमाणे २० हेपा फिल्टर आहेत. एकाची किंमत १५ हजार रूपये आहे. लेणी उघडण्यापासून बंद होईपर्यंत ते सुरू असते. कालांतराने यातील फिल्टर पेपर बदलावा लागतो. याच्या निरीक्षणातून लेण्यात धुळीचे प्रमाण, किटकांची जात याची माहिती मिळू शकते. पुढे त्यावर उपाययोजना करण्यासाठी ही निरीक्षण उपयोगी ठरतील. हेपाचा आवाज, कंपने होत नसल्याने ते लेणीचे नुकसान करत नाही.
 
खतरनाक सिल्वर फिश
लेेण्यांमध्ये सर्वाधिक त्रास सिल्वर फिश नावाच्या किटाणूचा आहे. राखाडी, हल्का निळा, चमकदार रंग आणि माशासारख्या आकारामुळे यास सिल्वर फिश म्हंटले जाते. याचे शास्त्रीय नाव लेपिस्मा सच्चारिना असे आहे. पाणीदार प्रदेशात ते आढळतात. अजिंठा वाघूर नदीच्या काठावर असल्याने हे किटाणू मोठ्या प्रमाणात सापडतात. त्यांचे खाद्य साखर आणि स्टार्च असे कार्बाेहायड्रेट असणारे पदार्थ आहेत. मड प्लास्टरच्या थरात हे पदार्थ सहज मिळत असल्याने किटाणू मोठ्या संख्येने लेण्यात येत होते. त्यांना पुरातत्व शाखेच्या भाषेत सायलेंट किलर असेही म्हंटले जाते. आता मात्र त्यांचा प्रवेश पूर्णपणे बंद झाल्याचे दिपक गुप्ता यांनी सांगीतले.
 
आयुष्य वाढवण्यासाठी आवश्यक
आम्ही प्रिव्हंेटीव्ह आणि अॅक्टीव्ह अशा दोन पद्धतीने लेण्यांचे संवर्धन करताे. हेपा फिल्टर बसवण्याचा निर्णय प्रिव्हेंटीव्ह प्रकारातील आहे. लेण्यातील शिल्पे, चित्रांचे नुकसान होण्यापूर्वीच घेतलेली ही काळजी आहे. हे बसवतांना कलाकृतींना नुकसान होणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली. अनेक चाचण्या घेतल्यानंतर हेपा फिल्टर बसवण्यात आले. यामुळे कलाकृतींचे वय वाढणार आहे.- श्रीकांत मिश्रा, उपअधिक्षण पुरातत्व रसायनज्ञ, एएसआय, सायन्स ब्रॅन्च, औरंगाबाद
 
भारतात प्रथमच प्रयोग
लेेण्यातील सर्व प्रकारच्या प्रदूषकांपासून कलाकृतींचे रक्षण करण्याकरीता हेपा फिल्टर बसवण्यात आले आहे. भारतातील पुरातन वास्तूत प्रथमच असा प्रयोग करण्याचे ठरवल्यामुळे अनेक उपकरणांचा अभ्यास करण्यात आला. याचा आवाज, कंपने यामुळे काही नुकसान होणार नाही, असे उपकरण शोधावे लागले. अजिंठ्यातील यशस्वी प्रयोग संपूर्ण देशासाठी रोल मॉडेल बनला आहे.
-दिपक गुप्ता, सहायक उपअधिक्षक पुरातत्व रसायनज्ञ, एएसआय , सायन्स ब्रॅन्च, औरंगाबाद
 
पुढील स्लाईडवर बघा, या बातमीशी संबंधित फोटो.....