आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजिंठा लेणीत पर्यटकांसाठी ‘रोप वे’चा पर्याय विचाराधीन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या वृद्ध पर्यटकांना डोंगर चढताना त्रास होतो. त्यामुळे तेथे पर्यायी मार्ग म्हणून रोप वे, एस्केलेटर (सरकता जिना) उभारता येईल काय, याची चाचपणी करण्याची सूचना राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांनी जिल्हाधिकारी निधी पांडे तसेच एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांना केली. त्यानुसार याबाबत संबधित विभागाची बैठक घेऊन त्याचा अहवाल पर्यटन सचिवांना देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी पांडे यांनी दिली आहे.
वेरूळ महोत्सवानिमित्त मुख्य सचिव क्षत्रीय औरंगाबादमध्ये आले होते. यावेळी त्यांनी अजिंठा लेणीची पाहणी केली. तब्बल चार तास त्यांनी पर्यटकांना काय सुविधा देता येतील तसेच अजिंठा येथे पर्यटक वाढीसाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत चर्चा केली. जिल्हाधिकारी पांडे यांनी सांगितले की, अजिंठा लेणी पहायला येणाऱ्या पर्यटकांना डोंगर चढून जावे लागते. वयोवृद्ध व्यक्ती, विकलांग व्यक्ती तसेच गरोदर महिलांना चढण्यासाठी अवघड जाते. त्यामुळे पर्यटक थकतात. त्यामुळे त्यांना लेणी पाहणे सहज आणि सोपे व्हावे यासाठी मुख्य सचिवांशी प्राथमिक चर्चा झाली आहे. याबाबत सरकते जिने, शिडी, रोप वे यापैकी काय करता येतील का, याची चाचपणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रोप वे चे पर्यटकांना मोठे आकर्षण असते. त्यामुळे तेथे रोप वे उभारणे शक्य आहे का, याचा प्रथम विचार करण्यात येणार आहे. त्यासाठी संबधित एमटीडीसी तसेच उपविभागीय अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांची बैठक लवकरच घेण्यात येणार आहे. त्यानंतर त्याचा अहवाल तयार करून पाठवण्यात येणार असल्याचे पांडे यांनी सांगितले.

रेल्वेस्टेशनवर मिळणार माहिती
विमानतळावर आल्यानंतर पर्यटकांना कोठे जायचे याची फारशी माहिती नसते. त्यामुळे विमानतळ, रेल्वे स्टेशन या ठिकाणी पर्यटकांसाठी माहितीपत्रक तसेच इतरही पर्यटनस्थळांची माहिती देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच गाईड्सना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...