आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरांसह ग्रामीण भागातही वाढणार भाजपचा जाेर; अस्तित्व टिकवताना दाेन्ही काँग्रेसच्या ‘नाकी नऊ’! (महाकौल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हा परिषदा, पंचायत समिती व महापालिकांच्या दाेन टप्प्यांतील मतदानाची प्रक्रिया मंगळवारी पार पडली. लाेकसभा- विधानसभा, नगरपालिका निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीत  ग्रामीण व शहरी भागात वर्चस्व वाढविण्यात भाजपला बऱ्यापैकी यश येईल, असा प्राथमिक अंदाज राज्यभरातील मतदानाच्या अाकडेवारीवरून काढता येईल.
 
गेल्या वेळी जिल्हा परिषदांमध्ये क्रमांक एकवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र यंदा हे अव्वल स्थान राखणे अशक्य असल्याचे दिसते. काँग्रेसच्याही जागा घटण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी  राष्ट्रवादीच्या तुलनेत त्यांचे नुकसान कमीच असेल. शिवसेनेच्या जागा मात्र वाढण्याची चिन्हे स्पष्ट दिसत अाहेत.
 
अाैरंगाबादेत भगवाच फडकणार; काँग्रेस, राष्ट्रवादी प्रबळ अाशावादी
दत्ता सांगळे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मदतीने सध्या काँग्रेस आघाडीच्या ताब्यात असलेल्या औरंगाबाद जिल्हा परिषदेत सत्ता परिवर्तन होणार अन् ही स्थानिक स्वराज्य संस्था युतीच्या ताब्यात जाणार यावर काँग्रेस आघाडीलाही सद्य:स्थितीत शंका नाही. मात्र, शिवसेना व भाजप यांच्यातील नात्यांमध्ये निर्माण झालेल्या दुराव्याच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचा ‘निकाल’ लागल्यानंतर सत्तेचे जुगाड कसे जमवायचे, याची काहींना चिंता आहे. दुसरीकडे दोघांनीही मनोमिलनाची मानसिक तयारी सुरू केल्याचे दिसते. युती तुटल्यानंतर जिल्हाभरात शिवसेना विरुद्ध भाजप असेच चित्र होते. काँग्रेस व राष्ट्रवादीतही तशीच परिस्थिती होती. त्यांनाही उमेदवार भेटले नाहीत. परंतु त्यांनी एक राजकीय चाणाक्षपणा दाखवला. तो म्हणजे जेथे तगडे उमेदवार आहे तेथे मैत्रीपूर्ण लढती तर जेथे आपण कमी पडतोय अशा ठिकाणी त्यांनी आघाडी केली. याचा त्यांना फायदा होईल. पोलिसांच्या गुप्तचर विभागाने दिलेला अहवालाचा कल युतीच्याच बाजूने दिसताे. शिवसेना सर्वात मोठा पक्ष राहील, असे दिसते. अर्थात गेल्या वेळी त्यांचे १९ सदस्य होते. या वेळीही ते त्या संख्येच्या आसपास राहतील. दुसरीकडे भाजपची सदस्यसंख्या १५ च्या आसपास जाईल, असा अंदाज आहे. म्हणजेच या निवडणुकीत कोणाचा फायदा होईल, असा प्रश्न उपस्थित झाला तर त्याचे उत्तर म्हणजे भाजप. 
 
जालना : भाजपला फटका, जिल्ह्यात शिवसेना मारणार मुसंडी
कृष्णा तिडके -
जालना जिल्हा परिषदेसाठी या वेळेला प्रथमच सेना-भाजपचे तुल्यबळ उमेदवार मैदानात असल्याने अनपेक्षित निकालाची शक्यता आहे. तथापि, जिल्ह्यात शिवसेनेच्या जागा वाढतील. भाजप तिसऱ्या क्रमांकावर जाऊ शकते. गत निवडणुकीत शिवसेना-भाजपला प्रत्येकी १५, काँग्रेसला ३, मनसेला १, तर राष्ट्रवादी काँग्रेसला १६ जागा मिळाल्या. आपल्या १६ जागा राखण्यात राष्ट्रवादी यशस्वी होईल, तर भाजपच्या तीन जागा कमी होतील; तर काँग्रेसला ६ जागा मिळू शकतील, अशी शक्यता आहे. शिवसेनेला तब्ब्ल २० जागा मिळू शकतात. विशेष म्हणजे प्रथमच प्रत्येक तालुक्यात शिवसेनेचे खाते उघडले जाईल. जालना तालुका शिवसेनेचे प्राबल्य असलेला तालुका आहे. मात्र, होम पीचवर सेनेच्या दोन जागा कमी होतील, असा अंदाज आहे. या तालुक्यातील ८ पैकी सहा जागा सेनेला, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळेल ,अशी शक्यता आहे.
 
बीड : भाजपची मदार मित्रपक्षांवर!काँग्रेस-राष्ट्रवादीचा लागणार कस
दिनेश लिंबेकर -
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील जिल्हा परिषद आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने चांगलाच जोर लावला असला तरी काकू-नाना विकास आघाडीसह, शिवसेना, भारतीय संग्राम परिषदेची मदत घ्यावी लागेल.  जिल्हा परिषदेच्या ६०, पंचायत समितीच्या १२० गणांच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युती व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी न झाल्याने सर्वच पक्ष स्वबळावर एकमेकांच्या विरोधात लढल्याने कस लागला. गेवराई, बीड, वडवणी, शिरूर या तालुक्यात शिवसेनेच्या प्रभाव क्षेत्रात व शिवसेनेचे उमेदवार विजयी  होण्याचे संकेत आहेत. संदीप क्षीरसागर यांच्या काकू-नाना विकास आघाडीने बीड तालुक्यातील सात गटांत उमेदवार उभे करून राष्ट्रवादीला आव्हान दिले आहे. त्यामुळे आघाडी, शिवसेना व भारतीय संग्राम परिषद या तीनही पक्ष आघाडी व संघटनांच्या भूमिकेवरच भाजप व राष्ट्रवादी जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करू शकेल. 
 
लातूर : काँग्रेस-भाजपला विजयाची समान संधी
अनिल पाैलकर-
जिल्हा परिषद आजपर्यंत एकहाती काँग्रेसच्या ताब्यात राहिली आहे. मात्र, या वेळच्या निवडणुकीत जिल्ह्यात भाजपची ताकद वाढल्यामुळे काँग्रेसला प्रत्यक्ष निवडणुकीत झगडावे लागले. राष्ट्रवादीसोबत आघाडी करूनही काँग्रेसला बहुमत मिळेल, असे याच पक्षाचे नेते ठामपणे सांगू शकत नाहीत, अशी स्थिती आहे. भाजपची जि.प.मधील ताकद वाढेल, परंतु राष्ट्रवादीच्या मदतीने काँग्रेस काठावर का होईना सत्ता राखण्यात यशस्वी होईल, असे दिसते. काँग्रेस पक्षाला २४ ते २८ जागा मिळू शकतात, तर भाजप २२ ते २५ जागांपर्यंत मजल मारू शकतो. राष्ट्रवादी पक्षाला ६ ते ८ जागांवर विजय मिळवता येईल आणि शिवसेना ४ ते ६ जागा जिंकेल, अशी चिन्हे दिसतात. काँग्रेस आणि भाजपला विजयाची समसमान संधी असल्याचे दिसले.
 
उस्मानाबाद : सेनेतील बंडाळी राष्ट्रवादीच्या पथ्यावर
चंद्रसेन देशमुख -
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात नंबर एकवर गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा हाच करिष्मा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत चालण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीचा फायदाही राष्ट्रवादीसह भाजपला होण्याची चिन्हे आहेत. उस्मानाबाद जिल्हा परिषदेत १० वर्षांपासून काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता आहे. काँग्रेसकडे २०, शिवसेनेकडे १५, राष्ट्रवादीकडे १७, तर भाजपकडे २ जागा आहेत.  काँग्रेस-सेनेचा घराेबा या वेळी तुटल्यासारखा वाटत असला तरी काही ठिकाणी आतून सख्य दिसून आले. त्यामुळे काही ठिकाणी काँग्रेसला, तर काही ठिकाणी सेनेला फायदा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी तसेच भारतीय जनता पक्षाने स्वबळावर निवडणुका लढवल्याने दोन्ही पक्षाला अस्तित्व दाखवण्याची संधी मिळाली.
 
नांदेड : निकालानंतरच होणार या वेळीही युती, आघाडी
विलास इंगळे -
नांदेड जिल्ह्यावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे वर्चस्व आहे. निकालानंतरच सत्ता स्थापनेवेळी राष्ट्रवादी अाणि काॅंग्रेसमध्ये आघाडी होण्याची शक्यता आहे. मागील वेळी स्वतंत्रपणे निवडणुका लढवून जिल्हा परिषदेच्या ६३ जागांपैकी काँग्रेसने सर्वाधिक २५ जागा जिंकल्या होत्या. त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसने १८ जागा जिंकल्या. या वेळी काँग्रेसच्या जागा वाढणार नसल्या तरी राष्ट्रवादीच्या कमी होण्याची शक्यता आहे. या जागा भाजपकडे वळतील. मागील वेळी भाजपला चार जागांवर समाधान मानावे लागले होते. या वेळी भाजपने जोरदार प्रचार माेहीम राबवली. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह मुख्यमंत्र्यांनीही हजेरी लावली. परिणामी भाजपची सदस्यसंख्या दोन आकडी होऊ शकते. या वाढलेल्या जागा भाजपने राष्ट्रवादीकडून खेचलेल्या असू शकतील. 
 
परभणी : त्रिशंकू अवस्था निर्माण हाेणार...
प्रवीण देशपांडे - सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली घसरण तर काँग्रेस, शिवसेनेसह भाजपचाही वाढता आलेख या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी भाजप वगळता दोन्ही काँग्रेस व शिवसेना दोलायमान स्थितीत राहणार असल्याने बहुमताचा आकडा कोणीही गाठू शकणार नाही. मावळत्या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार वारे असतानाही पक्ष बहुमतासाठी २७ चा जादुई अाकडा गाठू शकला नव्हता. विजयाची घोडदौड २५ वर थांबल्याने भाजप व शेकापच्या साहाय्याने राष्ट्रवादीने सत्ता स्थापन करून पाच वर्षे जिल्हा परिषदेवर वर्चस्व राखले. मात्र, विधानसभेनंतर राष्ट्रवादीतील गटबाजी प्रकर्षाने पुढे आल्यामुळे या वेळी राष्ट्रवादीचे संख्याबळ घटण्याची शक्यता आहे. जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी, विजय भांबळे (जिंतूर), डॉ.मधुसूदन केंद्रे (गंगाखेड) या तिघांनी या वेळी आपआपल्या प्रभावक्षेत्रात ताकद पणाला लावली असली तरी देखील राष्ट्रवादीची घसरण मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. गतवेळी ११ सदस्यांवर असलेली काँग्रेस वरपुडकर, बोर्डीकरांमुळे तीन ते चार अधिकच्या जागा मिळवू शकेल, असे चित्र आहे. सर्वच ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांनी चुरस निर्माण केल्याने संख्याबळ वाढण्याची चिन्हे अाहेत. आतापर्यंत सभागृहात दोनच सदस्य असलेल्या भाजपच्या संख्येत थोडीफार वाढ होईल. अर्थातच शिवसेना-भाजप हे दोन्ही एकमेकांच्या मतविभागणीस कारणीभूत ठरणार आहेत.
 
अहमदनगर : काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीच मारणार बाजी
मिलिंद बेंडाळे -
काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचा बालेकिल्ला असलेल्या जिल्हा परिषदेत भाजपला ४० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा दावा पालकमंत्री राम शिंदे यांनी केला. मात्र, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेस पक्षाची मोट अधिक घट्ट केल्याने भाजपच्या पदरात फारसे काही पडेल, याबाबत शंकाच आहे. जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीच बाजी मारणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. नगर तालुक्यात काँग्रेसने चक्क शिवसेनेला बरोबर घेत प्रचार केला. भाजप मात्र प्रचारादरम्यान एकाकी पडला होता. श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील मुख्यमंत्र्यांची सभा वगळता भाजपला प्रचारात आघाडी घेता अाली नाही. याउलट काँग्रेस- राष्ट्रवादीने मात्र सुरुवातीपासूनच जेथे आघाडीची गरज आहे तेथे आघाडी, तर जेथे महाआघाडीची गरज आहे, तेथे महाआघाडी करत प्रचारात आघाडी घेतली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पुन्हा निवडणूक रिंगणात उतरल्याने निवडणुकीवर काँग्रेसचाच वरचष्मा दिसून आला. भाजप- शिवसेनेला मात्र जागा वाढीशिवाय दुसरी कोणतीही अपेक्षा या निवडणुकीकडून नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अध्यक्षपदावर काँग्रेस की राष्ट्रवादी याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे.
 
नागपूर विभागात भाजपला प्रथम संधी
अतुल पेठकर - नागपूर विभागात चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली जिल्हा परिषदांसाठी १६ फेब्रुवारीला मतदान झाले. गडचिरोली जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी, वर्धा आणि चंद्रपूर जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आहे. या दोन्ही ठिकाणी सत्तास्थापनेत भाजपला प्रथम संधी आहे. मात्र, गडचिरोली जिल्हा परिषदेत सत्तेच्या साठमारीत धनुष्यबाण, कमळ उखडू शकते.  गडचिरोली जिल्हा परिषद स्थापनेपासून काँग्रेसच्या ताब्यात राहिली. कालांतराने राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाली. सुरुवातीच्या अडीच वर्षांत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप युती झाली. नंतर ही युती तुटल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी सत्तेत आली. बदललेल्या हवेत भाजपची जागा सेना घेऊ शकते. म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी युती राहण्याची शक्यता आहे. पण आता काँग्रेस-राष्ट्रवादी व भाजप-सेना हे स्वतंत्र लढत असल्याने भाजपचा सत्तेचा दावा नाकारता येत नाही. वर्धा जिल्हा परिषदेत पुन्हा भाजपची सत्ता रिपीट होईल, असे चित्र आहे. येथे भाजप क्रमांक एक व काँग्रेस दुसऱ्या स्थानी राहील. वर्धा येथे सुरुवातीच्या अडीच वर्षांत राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीची सत्ता होती. लोकसभा निवडणुकीनंतर दत्ता मेघे ‘हात’ झटकून भाजपत गेल्याने आघाडीतील त्यांचे समर्थक जिल्हा परिषद सदस्य भाजपत गेले. काँग्रेस येथे विखुरलेली आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेतही दुसऱ्यांदा भाजपला अनुकूल वातावरण असल्याचे दिसते. चंद्रपूर महापालिकेत भाजपचा महापौर व काँग्रेसचा सत्ता पक्षनेता आहे. येथेही काँग्रेस गटातटात वाटलेली आहे.
 
जळगाव : भाजपचे स्वप्न भंगणार
विजय राजहंस - भाजपने जलसंपदामंत्री गिरीश महाजनांच्या नेतृत्वात ‘४० +’चा नारा दिला. तर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने सर्व जागांवर उमेदवार दिले. काँग्रेस-राष्ट्रवादीने अाघाडी करत सत्ताधारी पक्षाला थाेपवण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीनंतर मतदारांकडून अालेल्या अंदाजानुसार भाजपचे स्वबळाचे स्वप्न भंगणार असले तरी भाजप २७ ते २९ जागांसह पहिल्याच क्रमांकावर राहील.  राष्ट्रवादी अणि शिवसेनेची स्थिती पूर्वीसारखीच राहणार असून काँग्रेसला या वेळी जबर फटका बसण्याची शक्यता अहे. गेल्या पंचवार्षिकला ६० टक्के मतदान झाले हाेते. या वेळी ६२.८९ टक्के मतदान झाले. ६७ गट अाणि १३४ गणांसाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे, सुरेश जैन, गुलाबराव देवकरांसह अाजी-माजी खासदार, अामदारांनी अापापल्या कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा पणाला लावली. 
 
नाशिक : शिवसेनेला ‘अॅडव्हान्टेज’
प्रदीप गायकवाड - जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी सर्वच ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्या. एकूणच जिल्ह्याचा विचार करता शिवसेनेला अॅडव्हान्टेज मिळण्याची शक्यता व्यक्त हाेत अाहे, सध्या सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीला दुसऱ्या क्रमांकावर रहावे लागू शकते. मालेगाव व सिन्नर वगळता इतरत्र भाजपची माेठी पीछेहाट शक्य अाहे. सिन्नर तालुक्यात खरा सामना भाजप व शिवसेनेत दिसून अाला. तालुक्यातील सहा पैकी चार गटात सेनेचे तर दाेन गटात भाजपचे उमेदवार विजयी हाेण्याचे अंदाज बांधले जात अाहेत. मालेगाव तालुक्यात सेना-भाजपमध्ये चुरशीचा सामना असून दाेन्ही पक्षाला दाेन- दाेन जागा तर राष्ट्रवादी-काँग्रेस अाघाडीला एक जागा मिळण्याची चिन्हे अाहेत. येवला तालुक्यात राष्ट्रवादीच्या ताब्यात पाच पैकी चार गट अाहेत. मात्र यावेळी येथे शिवसेना बाजी मारणार असे दिसते. 
बातम्या आणखी आहेत...