आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांना जेरीस आणणाऱ्या २५० गुन्हेगारांची झाली परेड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरात दररोज किमान चार दुचाकी, दहापेक्षा अधिक मोबाइल चोरी होतात. सरासरी दोन घरे फोडली जातात. भररस्त्यात चाकूहल्ला करून खून पाडला जातो. वाढत्या गुन्हेगारीच्या या घटनांमुळे पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. चार्ली, बीट मार्शल, पोलिस मित्र अशा अनेक प्रयत्नांनंतरदेखील गुन्ह्यांचे सत्र थांबत नसल्यामुळे अखेर पोलिसांनी १६ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील घरफोडी, चोरी, खून, दरोडे, हाणामारी असे विविध गुन्हे असलेल्या २५० पेक्षा अधिक गुन्हेगारांना सोमवारी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करून ताब्यात घेतले.

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्वत: मंगळवारी दुपारी दीड ते चार वाजेपर्यंत या २५० गुन्हेगारांची चौकशी केली. पकडून आलेल्या बहुतांश गुन्हेगारांवर कलम ११०, १०७ नुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. या वेळी पोलिस उपायुक्त संदीप आटोळे, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती, मधुकर सावंत सर्व पोलिस ठाण्यांचे पोलिस निरीक्षक उपस्थित होते. सकाळी ११.३० च्या सुमारास प्रत्येक पोलिस ठाण्याच्या प्रमुखांनी त्यांच्या हद्दीतील २० गुन्हेगार आयुक्तांसमोर हजर केले. आयुक्तांनी त्यांची कसून चौकशी केली.

कोटापूर्ण करण्यासाठी धडपड : १६पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सुमारे १५०० रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. कोम्बिंग ऑपरेशन करून प्रत्येक पोलिस ठाण्यातील किमान २० गुन्हेगार हजर करावेत, असे आदेश आयुक्तांनी दिले होते. मात्र अनेक अधिकाऱ्यांनी कोटा पूर्ण करण्यासाठी दहा वर्षांपूर्वी गुन्हे दाखल असलेले गुन्हेगारसुद्धा उचलून आणले होते. जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा भाजी विक्रेत्याचा खून झाला होता. याच पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अनेक सराईत आणि हिस्ट्रीशीटर गुन्हेगार पोलिसांना सापडले नाहीत. दौलताबाद येथील चंद्रकांत जाधव खून प्रकरणातील आरोपींनादेखील हजर करण्यात आले नाही. या दोन्ही ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना गुन्हेगार दोन दिवसांच्या आत हजर करण्याचे आदेश देण्यात आले.

चार्लींची गस्त वाढणार
शहरातचार्ली असूनही दुचाकी, मोबाइल चोरी आणि घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. ही गस्त अधिक कडक करण्यासाठी वाढीव १६० कर्मचाऱ्यांची नियुक्ती चार्ली पथकासाठी करण्यात आली असून इतर गस्तीसाठी ८० कर्मचारी वाढवले आहेत. शहरात सार्वजनिक ठिकाणी दारू सेवन करण्यात येणाऱ्या २० ठिकाणांवर कारवाई करण्यात आली, तर ३० ठिकाणांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. दहाच्या आत दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मी शांतता समितीचा सदस्य : मुकुंदनावाच्या आरोपीला आयुक्तांनी विचारले, तुझ्यावर किती गुन्हे आहेत? तेव्हा तो म्हणाला, साहेब, मी शांतता कमिटीचा सदस्य आहे. तुमच्या एका पोलिस निरीक्षकाच्या मेव्हण्याने आमच्या गावात एक कोटीचा अपहार केला म्हणून मी त्याच्या विरोधात तक्रार केली. त्यात तो निलंबित झाला. त्याचा बदला म्हणून माझ्यावर गुन्हे दाखल केले. आयुक्तांनी त्याचे म्हणणे एेकून घेतले, मात्र तत्काळ त्याला शांतता कमिटीच्या सदस्यपदावरून हद्दपार केले.

आरोपी नाष्टा करण्यासाठी गेला
एमआयडीसीवाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १६ गुन्हेगारांना आणण्यात आले होते. आयुक्तांसमोर हजेरी लावल्यानंतर विकी नावाचा आरोपी गायब झाला. याच वेळी त्याची आई आणि नातेवाइकांनी आयुक्तालयाच्या आवारात जोरजोरात रडणे सुरू केले. गुन्हेगार गायब झाला, हे पाहून निरीक्षक रामेश्वर थोरात यांच्या तोंडचे पाणी पळाले. काही वेळाने त्याच्या नातेवाइकांनी आरोपीशी संपर्क साधला असता मला भूक लागली होती, मी नाष्टा करण्यासाठी आलो असल्याचे त्याने सांगितले.
बातम्या आणखी आहेत...