आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा अध्यक्षांच्या चित्तेपिंपळगावात योजनांचा पाऊस, तत्काळ मंजुरीही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या गावातील (चित्तेपिंपळगाव) महिला ग्रामसभेला केवळ बावीसच महिला उपस्थित असल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’त गुरुवारी प्रसिद्ध होताच गुरुवारी मनरेगाच्या विशेष ग्रामसभेत विभागीय पातळीवरून सरकारी यंत्रणा हलली. बीडीओ असिस्टंट, जे.ई., ग्रामसंपर्क अधिकारी वेळेआधीच ग्रामसभेत पोहोचले आणि ग्रामस्थांवर योजनांचा वर्षाव केला. कुणाला शेततळे हवे, विहीर हवी का, अशी विचारणा करत गट विकास अधिकाऱ्यांनी योजनांचे वाटपही सुरू केले. दुसरीकडे सरंपचांनीही गाव १५ ऑगस्टपर्यंत हागणदारीमुक्त करण्याची घोषणा केली. बुधवारी महिलांच्या ग्रामसभेत तासभर उशिरा आलेले ग्रामसेवक मनरेगाच्या सभेला मात्र वेळेवर हजर होते. सरपंचही पोहोचले. मनरेगाच्या सभेच्या वेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) संगीता सानप तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ग्रामसभेची माहिती ग्रामसेवकांसह इतर अधिकाऱ्यांना फोनद्वारे विचारली जात होती. ही सभा तब्बल सव्वादोन तास चालली. बारा वाजता सभा सुरू झाली. ग्रामसंपर्क अधिकारी शकील पटेल, सरपंच सहदेव बागडे, ग्रामसेवक डी.बी.क्षीरसागर उपस्थित होते. सुरुवातीला ग्रामसेवक आणि ग्रामसंपर्क अधिकाऱ्यांनी योजनांची माहिती दिली. त्यानंतर गटविकास अधिकारी सभेत दाखल झाले.
 
चला शेततळे हवंय का कुणाला ?
बीडीओ विठ्ठल हारकळ आणि असिस्टंट जे. ई. इसलवाल यांनी योजनांची माहिती दिली. कुणाला काय हवे, याची विचारणा करत त्यांनी योजनांचे वाटप केले. गावात शौचालयांची माहिती घेतली असता गावकऱ्यांनी २५ टक्केच शौचालय असल्याचे सांगितले. त्यावर सुभद्राबाई शिंदे यांनी यापूर्वी शौचालय बांधले मात्र त्याचे अनुदान मिळाले नाही, असे सांगताच हारकळ यांनी मनरेगामधून सर्वांना शौचालय देण्याचे घोषित केले. तसेच वैयक्तिक विहीर कुणाला हवी, याची विचारणाही केली.
 
ग्रामस्थ चक्रावले
योजना सहज मिळत असल्याने ग्रामस्थही चक्रावून गेले. योजनांच्या नियमात बसणाऱ्यांची लगेच नावे लिहून घेतली गेली. त्यातच एका ग्रामस्थाने चित्ते नदीच्या बंधाऱ्यात गाळ अडकला असल्याची माहिती देताच या कामालादेखील मान्यता देण्यात आली. गटविकास अधिकाऱ्यांनी ‘दिव्य मराठी’च्या भूमिकेचे कौतुक केले.
 
अशा मिळाल्या योजना
३२५ शोषखड्डे, २० सिंचन विहिरी, १२ शेततळे, फळबाग लागवड १७, रोपवाटिका ०९, निर्मल शौचालय ५०, व्हर्मी कंपोस्ट ०८, तसेच चित्ते नदीच्या बांधावरील गाळ काढणे.
 
गाव हागणदारीमुक्त करणार
गावात २५ टक्के लोकांकडेच शौचालय आहे. आम्ही मनरेगा तसेच इतर योजनेतून काम करत पंधरा ऑगस्टपर्यंत गाव हागणदारीमुक्त करण्याचा निश्चय केला आहे.
सहदेव बागडे, सरपंच, चित्तेपिंपळगाव
 
हे सारे ‘दिव्य मराठी’मुळे घडले
‘दिव्य मराठी’च्या वृत्ताचा चांगला परिणाम झाला. ग्रामस्थांसाठी इतक्या योजना असतात याची माहितीच नव्हती. ग्रामसभेत पहिल्यांदाच एवढ्या योजनांची माहिती मिली. मात्र आज अधिकारी आल्यामुळे गावकऱ्यांना योजनांचा फायदा मिळाला आहे.
श्रीधर लंगाडे, ग्रामस्थ, चित्तेपिंपळगाव
 
हा बातमीचाच परिणाम
आजची सभा व योजनांचा पाऊस हा ‘दिव्य मराठी’च्या बातमीचा परिणाम आहे. ग्रामस्थांना योजनांची माहिती नव्हती. लोकांपर्यत योजना येतच नाहीत.
कैलास धुळे, ग्रामस्थ चित्तेपिंपळगाव
 
 
पुढील स्लाईडवरवाचा, विधानसभा अध्यक्ष बागडेंच्या गावी ग्रामसभेला केवळ 22 महिला उपस्थित...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...