आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएम कोरडे: काॅलेज प्रवेशासाठी लागणारी रक्कम बँकांत रांगा लावून घ्यायची का?- पालकांचा सवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील एटीएम गेल्या महिनाभरापासून कोरडे पडले आहेत. एकीकडे कॅशलेससाठी आवश्यक असणाऱ्या ई-पॉस मशिन्स नाहीत. दुसरीकडे एटीएममध्ये नोटाच नाही. मग मुलांच्या शाळा, महाविद्यालय प्रवेशासाठीची रक्कम कुठून मिळवायची? त्यासाठी बँकेत रांगा लावायच्या का, असा पालकांचा सवाल आहे. नोटबंदीचा असर इतका मोठा असेल, याची कल्पनाही केली नव्हती, असे त्यांचे म्हणणे आहे. 
 
सध्या औरंगाबादेतील ८० टक्के एटीएम शोभेच्या वस्तू झाल्या आहेत. रकमेचा भरणा करणाऱ्या एजन्सींना बँकांकडून यापूर्वी दररोज दहा ते २० लाख रुपये दिले जात होते. सध्या फक्त एक ते दीड लाख रुपये दिले जात आहेत. ते तासाभरातच संपून जात आहेत. परिणामी नागरिकांची भयंकर परवड सुरू आहे. शहराची एटीएमची रोजची गरज २०० कोटी रुपये आहे. प्रत्यक्षात १० ते ११ कोटी रुपयांचाच भरणा होत आहे. येत्या चार दिवसांत आरबीआय (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) कडून रक्कम उपलब्ध होईल, असा दावा बँकांकडून केला जात आहे. 

दोन हजारांची नोट गायब 
बँकेत सुरुवातीला दिली जाणारी दोन हजारांची नोट व्यवहारात कमी झाली आहे. तसेच बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पैसे जमा करणाऱ्यांकडूनही दोन हजारांच्या नोटा येत नसल्याने चलनटंचाई वाढली आहे. बँकेत रक्कम भरणा करणाऱ्यांची संख्या गेल्या महिनाभरात ५० टक्क्यांनी घटल्याचाही परिणाम होत आहे. 
 
काही प्रमुख शाळा, महाविद्यालयांची स्थिती अशी 
नाथ व्हॅली स्कूल :
रोख रकमेची गरज नाही. धनादेश, डी.डी. स्वीकारले जातात. 
एलोरा स्कूल : रोख रकमेचा अाग्रह, पण चेकही स्वीकारतात. 
पोद्दार स्कूल : चेक स्वीकारले जातात. 
जैन इंटरनॅशनल स्कूल : ईपीओएस मशीन आहे. चेकही घेतात. 
शारदा मंदिर कन्या प्रशाला : चेक घेतात. 
मौलाना आझाद कॉलेज : ईपीओएस मशीन आहे. डीडी, ऑनलाइन बँकिंग आणि चेकद्वारे फी घेतली जाते. 
शिवछत्रपती कॉलेज : ऑनलाइन पद्धतीने फी स्वीकारली जाते. 
विवेकानंद कॉलेज : रोख रक्कमच घेतली जाते. 
देवगिरी कॉलेज : ऑनलाइन रक्कम भरण्याची सुविधा आहे. 
वसंतराव नाईक कॉलेज : डीडी, चेकने दिली तरी चालते. 
 
उत्तर मिळाले, संबंधित खात्याकडून माहिती मागवू 
दरम्यान, एटीएमविषयी रिझर्व्ह बँक अाॅफ इंडियाकडे ‘दिव्य मराठी’ने मेलद्वारे विचारणा केली. तेव्हा याबाबत अापण अनभिज्ञ असून यासंदर्भात संबंधित खात्याकडून माहिती मागवण्यात येईल, असे उत्तर देण्यात अाले. नाेटाबंदीनंतर केवळ ७० टक्के राेख रक्कमच बँकिंग यंत्रणेत उपलब्ध झाली अाहे. रिझर्व्ह बँकेकडून राेख रकमेचा पुरवठा कमी हाेत असल्याने टंचाई समस्या कायम अाहे. अाता शहरांबराेबरच ग्रामीणमध्ये त्याचे चटके जाणवू लागले असल्याचे अाॅल इंडिया बँक्स एम्प्लाॅइज असो. उपाध्यक्ष विश्वास उटगी म्हणाले. 

पालक म्हणाले, मनस्ताप होत आहे 
वैभवी पाटील म्हणाल्या की, कॅशलेस व्हा, असे म्हणणे सोपे आहे; पण आम्हाला जो मनस्ताप सहन करावा लागत आहे त्याला जबाबदार कोण? प्रवेश, शालेय साहित्य खरेदीसाठी रोख रक्कम लागते. ती काय दरवेळी बँकेत रांगा लावून काढायची का? तर कैलास इंगळे म्हणाले की, एटीएम नागरिकांच्या सुविधेसाठी आहेत. पण त्यात नोटाच नसल्याने माझ्यासारखे हजारो पालक त्रस्त झाले आहेत. 

बँकेत या, पैसे घ्या 
- एटीएममध्ये पैसे नसले तरी बँकेत पैसे मिळत आहेत. त्यामुळे नागरिकांनी तसेच पालकांनी बँकेत जावे. तेथे पुरेशी रक्कम उपलब्ध आहे. तसेच नागरिकांनी सीडीएममध्येदेखील पैसे भरावेत. त्यामुळे एटीएमवर रक्कम उपलब्ध होईल. आय.राजू, ए.जी.एम, एस.बी.आय. 
काही शाळा, महाविद्यालयांत ऑनलाइन शुल्क भरण्याची सुविधा असली तरी छोट्या शाळांमध्ये रोख रकमेचाच आग्रह धरला जातो. शिवाय वह्या, पुस्तके, गणवेश खरेदीसाठीही रक्कम लागतेच. ती पालकांना एटीएममधून मिळत नाही. 
बातम्या आणखी आहेत...